संजय बुधवंत
Share Market Astrology Predictions 2025-26 : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार १८ मार्च २०२५ रोजी सुस्थितीत आला होता. अनेक दिवस नुकसान सहन करणाऱ्या गुंतवणूकदारांनी त्यादिवशी मोठा नफा कमावला. ९०० अंकांच्या उडीसह सेन्सेक्स ७५,००० अंकांच्या पुढे गेला. बाजार सुस्थितीत दिसत असला तरी हीच स्थिती पुढेही राहील असे सांगता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत शेअर बाजारात काय घडेल याचा अंदाज वर्तवणे अवघड ठरेल. तर याचबद्दल आपण ज्योतिषी संजय बुधवंत यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेली मंदी किंवा घसरण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंतही थांबलेली नाही. बजेटमध्ये सरकारने चांगल्या घोषणा केल्या तरीही त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झालेला अजिबात दिसला. रिझर्व बँकेने रेपोरेट व्याजदर कपात केली, बँकांची तरलता वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या तरीही शेअर बाजारात घसरण सुरूच आहे आणि भारतीय चलन रुपयांचे अवमूल्यन सुरूच आहे. अमेरिकन नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडाकेबाज निर्णयांची सरबत्ती चालूच आहे. त्यामुळे जगभरातील अनेक अर्थव्यवस्था व शेअर बाजार डळमळीत होऊन प्रचंड नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. या व्यापार युद्धाची परिणती अंतिमतः अमेरिकेस अत्यंत मारक ठरू शकते. अमेरिकेत २००८ साली आलेल्या महामंदीच्या इतिहासाची पुनरावृत्ती २०२६ मध्ये होऊ शकते आणि १८ वर्षांनी राहूचे कालचक्र पुन्हा अनुभवायास येऊ शकते.
भारताच्या वृषभ लग्नकुंडलीनुसार मित्रस्थानात राहू-नेपच्युनची युती होत असल्याने मित्रांकडून खोटी आश्वासने मिळणे आणि फसवणूक संभवते. तसेच हा योग २८ फेब्रुवारी २०२५ पासून संपला असून, आगामी काळात भारताच्या मित्रदेशांना भारताचे महत्त्व समजणार आहे. पुन्हा मंडळी मित्राप्रमाणे वागू लागतील, शनी लग्नस्थानात येणार असल्याने जुने मित्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील.
१९९२ सारखी शेअर मार्केटची स्थिती होऊ शकते (Share Market Astrology Predictions)
मंगळाचे मेच्या अखेरपर्यंत होणारे कर्क राशीतील गोचर भ्रमण शेजारील देशांशी संघर्ष व तीव्र मतभेद निर्माण करणारे ठरू शकतात. अंतर्गत व बाह्य असे दोन्ही प्रकारचे शत्रू त्रासदायक ठरतील. त्यामुळे हिंसा संभवते, काही मंत्रांच्या विवादास्पद टिप्पणींमुळे जागतिक स्तरावरदेखील भारत सरकार अडचणीत येऊ शकते. त्यामुळे जूनपर्यंत परिस्थिती अतिशय संयमाने हाताळावी लागेल. एकूणच राशिचक्रामध्ये एप्रिल व मे २०२५ मध्ये खूप मोठे बदल घडणार आहेत. एप्रिलमध्ये नुकताच मीनमध्ये आलेला शनी हा राहूबरोबर युती करणार आहे. म्हणून एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात शेअर निर्देशांक मोठी उसळी घेऊ शकतो. समुद्रामध्ये नैसर्गिक तेल व वायू यांचे मोठे साठे सापडू शकतील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच परकीय चलनसुद्धा वाचणार आहे. शनी-शुक्राची युती लाभदायक सिद्ध होऊ शकते. ३३ वर्षांनंतर होणाऱ्या शनी-नेपच्युनच्या योगातून १९९२ सारखी शेअर मार्केटची स्थिती होऊ शकते. मे २०२५ मध्ये होणारे राहू-केतू व गुरूचे राशिबदल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत…
१) राहूचा कुंभ राशीत प्रवेश – कृत्रिम बुद्धिमत्ता व अवकाश विज्ञान शास्त्र यांसारख्या अत्याधुनिक शास्त्रांचा विकास पुढील दीड वर्ष उत्तमरीत्या होणार आहे. पण, मानवजातीला मानवरहित युद्धाचा धोका मात्र निर्माण होऊ शकतो.
२) केतूचा सिंह राशीतील प्रवेश – ‘सिंह’ या राजस राशीत आलेला केतू उन्मत्त झालेल्या राजा / हुकूमशहा / सरकार यांना वठणीवर आणणारा ठरेल . जगभरातील बुद्धिवादी लोकांच्या व सामान्यजनांच्या रोषाला राज्यकर्ते बळी पडून योग्य बदल संभावतात.
३) गुरूचा मिथुन राशीतील प्रवेश – संवाद (communication),आयटी (IT) या क्षेत्रांसाठी गुरूचा मिथुन राशीतील प्रवेश अत्यंत शुभ ठरणार आहे . मे २०२५ ते जून २०२६ पर्यंतच्या काळात या क्षेत्रात भरभराट संभवते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, पवनऊर्जा, अवकाश विज्ञान या क्षेत्रांमध्येही भरभराट अपेक्षित आहे.
४) षट ग्रहाबाबत – एप्रिलमध्ये एकाच वेळी सहा ग्रह मीन राशीतून भ्रमण करणार आहेत आणि तेथेच सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होणार आहेत. याआधी अशी स्थिती मकर राशीत २०२० मध्ये आली होती. त्यामुळे कोरोना महामारीचा सामना पूर्ण जगाला करावा लागला होता. या वेळीही असेच काही महाभयंकर होणार आहे, असे अनेक तज्ज्ञ, ज्योतिषी समाजमाध्यमांवर सांगत आहेत. पण, अफवांवर विश्वास ठेवू नका. अशी काही महाभयंकर महामारी येणार नाही; पण समुद्राच्या अंतरंगात मोठी ढवळाढवळ होऊन त्सुनामी, भूकंप, प्रलयंकारी वादळे यांचा सामना मात्र अनेक देशांना करावा लागू शकतो. शेअर मार्केटमध्ये खूप मोठे बदल संभवतात. मार्केट किमान आठ टक्के वर जाऊ शकते.
५) मीनेत शुक्र वक्री झाल्याने महागाई निर्देशांक वाढेल. लोक काटकसरीने वागू लागतील. विवाहेच्छुक लोकांसाठी १४ एप्रिलपर्यंत शुक्र अनुकूल असणार नाही. सगळे विवाह मुहूर्त त्यानंतरच आहेत.
६) बुद्ध शुक्राचे सहचर्य- बुध व शुक हे दोन्ही ग्रह ‘मीन’ राशीत बराच काळ एकमेकांबरोबर अंशात्मक युतीत राहणार आहेत. ते दोन्ही वक्री असताना खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या अनेक संस्थांबाबत रिझर्व बँक अत्यंत कडक धोरणे अमलात आणू शकते. दादागिरी करण्याच्या अमेरिकन वर्चस्ववादी राजकारणाचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकेल. तसेच जगातील बहुतांशी देश याविरोधात आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी अमेरिकेस आपल्या अतिजहाल राष्ट्रवादी विचारसरणीत मवाळपणा व लवचिकता आणावी लागेल. जगामध्ये शक्ती व सत्ता यांचा योग्यरीत्या समतोल साधला न गेल्यास तिसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली जाण्याचा जागतिक धोका संभवतो.
७) समुद्रावर व त्यातील बेटांवर, मोक्याच्या ठिकाणांवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी अनेक महासत्तांमध्ये संघर्ष – वादविवाद संभवतात. याचा समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावर अनुचित परिणाम होण्याचा धोका राहील. काही देशांत आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण होऊन महागाई व टंचाई वाढेल.