– उल्हास गुप्ते 

Shivsena And Uddhav Thackeray Astrology: उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली आणि त्यांची वाटचाल सुरू झाली. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोविड महासाथीने सरकारची परीक्षाच पाहिली. त्यानंतर वेगात घडलेल्या घडामोडींनंतर त्यांचे सरकारही पायउतार झाले. एरवी सरकार पायउतार होणे तसे राजकारणाला काही नवीन नाही. मात्र मोठ्या संख्येने पक्षात उभी फूट पडली आणि मोजकेच आमदार- खासदार आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. प्राप्त परिस्थितीत उद्धव ठाकरेंची एकूणच राजकीय ताकद कमी झालेली दिसते आहे. उद्धव ठाकरे आता संपले, पुन्हा उठून उभे राहणे शक्यच नाही. शिवसेनाही संपल्यात जमा अशी चर्चा जनमानसात सुरू आहे. पण खरोखरच ही वस्तुस्थिती आहे का, काय सांगते आहे उद्धव ठाकरे यांची कुंडली, या घडामोडींचे हलाहल ठाकरे पचवू शकणार का… ते जाणून घेऊयात!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंची कुंडली आणि ग्रहांची स्थिती

राजकारणात सामाजिक कार्यात आपल्याला संकटात टाकणारी माणसे आपल्या आजूबाजूची जीवाभावाची असतात. मनात नसतानाही मुख्यमंत्रीपद घेण्याचा आग्रह नी त्यानंतर अचानक संकटांची मालिका सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तो दिवसही त्यांना फारसा चांगला नव्हता पण त्यावेळेच्या घाईगडबडीत शपथविधी होणे खूप गरजेचे होते. काही गोष्टी आयुष्यात टाळता येत नाहीत, त्यांच्या पत्रिकेत षष्टेश शनि चतुर्थात वक्री अवस्थेत त्यामुळे स्थावर इस्टेटीची भांडणे कोर्टकचेरीच्या पायरीपर्यंत गेली त्यांना त्यातून खूप मनस्ताप झाला.

मंत्रीपद स्वीकारल्यानंतर विरोधी पक्षांच्या प्रश्नांचा भडीमार – त्यात करोना काळ त्यात खूप धावपळ झाली. चतुर्थात गोचरीचे शनी- केतू मानसिक व शारिरीक स्वास्थ बिघडवत होते. कालांतराने पक्षात फूट पडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षचिन्ह व शिवसेना पक्षही दूर गेला, अशा करूण अवस्थेत स्वत:ला सावरून ते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसले. त्यांच्या रक्तातील ही धीरोदात्त मानसिकता त्याच्या सिंह राशीतून प्रकट होते. खरं तर शिवसेना संघटनेला त्यांनी एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला. संघटनेचे स्वरुप बदलून राजकारणात त्यांनी उत्तम प्रगती साधली. विविध जातीधर्माची माणसे उद्धवजी ‘आपला माणूस’ म्हणून त्यांच्याकडे पहात होती. ही किमया त्याच्या दशमातील चतुरस्त्र बुधाने केली होती. उद्धव ठाकरे राजकीय प्रवासातून लोकांच्या मनांत पोचले आहेत; त्यांना लोकांच्या मनातून काढणे खूप कठीण असेल. आमदार खासदारापेक्षा त्यांच्यापाठीमागे जी जनशक्ती आहे तीच त्यांची मोठी ताकद ठरेल.

उद्धव ठाकरेंच्या भाग्यातील शनीनेच..

त्याच्या पत्रिकेतील द्वादशेश एकादशात रवि आहे. त्यांच्या जवळची माणसे वाटेल तसे बोलून त्यांना अधिक संकटात टाकत आहेत. त्यांच्या भिडस्थ स्वभावामुळे ते स्पष्ट बोलू शकत नाहीत. त्यांच्या नवमान भाग्यात असलेला अष्टमेश मंगळ हा हिनबली वृषभ राशीत आहे. त्यामुळे हृदयाविषयी आजार तर षष्टात केतू व षष्टेश चतुर्थात वक्री शनी त्यांना मणक्यांचा आजार दाखवतो. पण या सर्वांवर मात करून आपलं शारीरिक- मानसिक दु:ख बाजूला सारून ते हसतमुखाने हात जोडून जनतेसमोर येतात. खरं तर ही ताकद हे बळ चतुर्थातील स्वराशीचा गुरु त्यांना देत आहे. त्यांच्या मूळ जन्म पत्रिकेत षष्ठात केतू आहे त्याच्या जोडीला १७ जानेवारीला शनी आला आहे त्यामुळे या दोघाच्या बळावर ते येणाऱ्या संकटाला सामोरे जातील. आता तर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेगटाला दिले आणि पक्षाचे शिवसेना हे नावसुद्धा देऊन टाकले. आयुष्यभर उरापोटाशी जपलेला पक्ष ठाकरे यांच्यापासून दूर झाला. उद्धव ठाकरे पोरके झाले पण खरा बाणेदार माणूस रडत बसत नाही, तो लढतो हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले. खरं तर शून्यातून उभे राहून पुढे जाण्याची ताकद हे षष्टातील शनि केतू देतील तर व्ययातील चंद्र राहू मानसिक त्रासही देतील.

उद्धव ठाकरे भविष्य: वादविवाद, रटाळ फुशारकी..

हे सारे चंद्र राहू ग्रहण योगातून घडेल पण यातूनच उद्याची घडणारी शिवसेना निर्माण होईल आणि २०२४ ला गुरु ग्रहाचे आगमन त्यांच्या नवम स्थानात होत आहे. तर गुरुच्या महादशेत लाभस्थानातला रवि पुन्हा उदयास येईल आणि महाराष्ट्राला सूर्यदर्शन होईल. तेव्हा आता वादविवाद टाळून नवीन दौऱ्यांतून, नव्या पिढीचे कार्यकर्ते शोधा ते विश्वासू सापडतील, असे त्यांची पत्रिका सांगते आहे.

हे ही वाचा<< शिवसेना नाव गेलं, चिन्हही गेलं, आता उद्धव ठाकरेंसमोर पुढचं संकट असणार.. ज्योतिष तज्ज्ञांनी वर्तवली भविष्यवाणी

२०२५ नंतर ठाकरेंचे भाग्य पालटणार?

कृष्णपक्षातील षष्ठी ते शुक्ल पक्षातील दशमीपर्यंत चंद्रबळ क्षीण असते, तसेच हा चंद्र सिंहराशीत व्यय स्थानात बसला आहे. त्याबरोबर राहू व प्लुटो युती करत आहेत. एकूण ग्रहांची ही स्थिती मानसिक त्रासात भर घालणारी आहे. पण चतुर्थातील स्वगृहीच्या गुरूचे पाठबळ खूपसा दिलासा देईल. त्यातून परिश्रम, मेहनत यातून यशाचा मार्ग दिसू लागेल. विशेष म्हणजे गुरू महादशेत भाग्यातील मंगळाची महादशा खूपशी मानसिक स्थिरता देईल. २५ जून २०२५ ते १ जून २०२६ या काळात नवे विचार, नवीन प्रेरणा, नवीन दिशा उद्धव ठाकरे यांना सापडेल आणि त्यातून संघटनेला वेगळे बळ नक्कीच प्राप्त होईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackrey under threat by shani till 2025 jyotish ulhas gupte predicts astrology ahead of budget session svs