Sankashti Chaturthi August 2022: हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. यंदा श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही १५ ऑगस्ट २०२२ ला असून या दिवशी एक खास योग जुळून आला आहे. दिनदर्शिकेनुसार १५ ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशाचे व श्रावणी सोमवार निमित्त गणरायाचे पिता महादेव शंकराची पूजा करून आपण या दोघांनाही प्रसन्न करू शकता. संकष्टी हा गणपतीच्या भक्तांसाठी खास दिवस असतो. यादिवशी स्त्री व पुरुष दोघेही उपवास करतात, रात्री चंद्रोदयानंतर घरातील देवाला नैवेद्य दाखवून मग दिवसभराचे व्रत सोडले जाते.
साधारणतः एका वर्षात १२ आणि अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. जर का संकष्टी चतुर्थी मंगळवारी असेल तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यंदा ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी व चंद्रोदयाची वेळ आपण जाणून घेऊयात..
संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त व चंद्रोदय
पंचांगानुसार, श्रावण कृष्ण पक्ष संकष्टी चतुर्थीची तिथी १४ ऑगस्ट रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुरु होऊन सोमवार १५ ऑगस्टला रात्री ९ वाजून १ मिनिटांपर्यंत असेल. मात्र संकष्टीचे व्रत हे १५ ऑगस्टलाच केले जाईल.
शुभ मुहूर्त- दुपारी ११ वाजून ५९ मिनिट ते दुपारी १२ वाजून ५२ मिनिट
चंद्रोदय- रात्री ९ वाजून २७ मिनिट (विविध शहरांमध्ये चंद्रोदयची वेळ काही फरकाने बदलू शकते)
संकष्टी चतुर्थी पूजा विधी
- एका पाटावर लाल कापड पसरून त्यावर गणरायाची मूर्ती किंवा प्रतिमा मांडावी
- पाटाच्या बाजूने रांगोळी काढून हळद कुंकू वाहावे
- मूर्तीवर हळद कुंकू- अक्षता, वाहाव्यात
- गणेशाच्या आवडीचे जास्वंदीचे फुल, दुर्वा व शमीचे पाने सुद्धा अर्पण करावीत.
- पूजेसमोर पानाचा विडा व सुपारी ठेवावी.
- यादिवशी सात्विक जेवणाचा नेवैद्य गणपतीला अर्पण करावा.
- चंद्रोदयानंतर ही पूजा करून मग आपणही आपले व्रत सोडू शकता.
शास्त्र असतं ते! नैवेद्याचं पान वाढताना कशी असावी मांडणी? जाणून घ्या
हिंदू पंचांगानुसार, यादिवशी गद व धृती हे दोन शुभ योग सुद्धा जुळून येत आहेत. तसेच चंद्र सुद्धा गुरु ग्रहासह मीन राशीत प्रभावी असेल त्यामुळेच या राशीच्या लोकांसाठी विशेष गजकेसरी नामक एक राजयोग सुद्धा तयार होत आहे.
(टीप- सदर लेख हा गृहीतके व सामान्य माहितीवर आधारित आहे)