Shravan Somavar 2023 : श्रावण महिना हा चातुर्मासाचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्याला सर्वात पवित्र महिना म्हटले जाते. हिंदू धर्मानुसार, श्रावण महिन्याला अध्यात्मिक महत्त्व आहे. अनेकजण श्रावण महिन्यातील सोमवार या दिवशी उपवास करतात. अधिक महिन्यामुळे यंदा श्रावण महिन्यात आठ सोमवार आहे मग आठही सोमवारी उपवास करायचा का ? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. याविषयी पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सविस्तर माहिती दिली
पं.गौरव देशपांडे सांगतात, “१८ जुलै ते १६ ॲागस्ट या काळात श्रावण महिना हा अधिक महिना आलेला आहे. याआधी २००४ या वर्षी म्हणजे १९ वर्षांपूर्वी श्रावण हा अधिक महिना आलेला होता व पुढे २०४२ साली परत श्रावण हा अधिक महिना येईल. अधिक महिन्याची योजना आपल्या पूर्वाचार्यांनी फार विचारपूर्वक केलेली दिसते.”
हेही वाचा : Chanakya Niti : चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांना नियमित यशासाठी ठरू शकतात फायदेशीर
अधिक महिना म्हणजे काय?
पं.गौरव देशपांडे पुढे सांगतात, “खगोलशास्त्रानुसार सौरवर्ष ३६५ दिवसात पूर्ण होते. याकाळात चांद्रवर्ष ३५४ दिवसात पूर्ण होऊन वरती अजून ११ दिवस उरतात. दरवर्षी सौर वर्ष व चंद्र वर्ष यामध्ये अकरा दिवसांचे अंतर पडते व हे अंतर जेव्हा एक महिन्या इतके होते तेव्हा अधिक महिना येत असतो. ज्या चांद्रमासामध्ये सूर्याची संक्रांती होत नाही अर्थात सूर्य रास बदलत नाही त्या महिन्याला अधिक महिना असं म्हणतात.
अधिक महिन्यालाच मलमास, पुरुषोत्तममास, मलिम्लुचमास अशी अनेक नावे आहेत. ज्योतिष कालगणनेनुसार मध्यम मानाने अधिक महिना हा 32 महिने १६ दिवस व ४ तास इतक्या कालावधींनी येतो. “
अधिकमासामध्ये कोणती कामे वर्ज्य करावीत?
“अधिकमासामध्ये काम्यकर्मे वर्ज्य करून निष्कामकर्मे करावीत असे शास्त्र सांगते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात विवाह, उपनयन, उत्सव, कोणत्याही व्रताचे उद्यापन, गृहप्रवेश, वास्तुशांती, प्रथम तीर्थस्नान, प्रथम देवदर्शन, देवांची प्राणप्रतिष्ठा, नवीन कामास प्रारंभ, नारायण-नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, नवीन कोणतेही पदग्रहण, नवीन वस्त्रे व दागिने धारण करणे यांसारखी कामे देखील वर्ज्य करावीत असे शास्त्रात सांगितलेले आहे.” पं. देशपांडे यांनी सविस्तर माहिती दिली.
हेही वाचा : Lucky People : ‘या’ तीन महिन्यांत जन्मलेले लोक सर्वांत जास्त असतात नशीबवान; तुम्ही यात आहात का?
आठही सोमवारी उपवास करायचा का ?
पं.गौरव देशपांडे सांगतात, “यावर्षी श्रावण महिना अधिक महिना आल्यामुळे श्रावणात एकूण आठ सोमवार आलेले आहेत व आठही सोमवार ‘सोमवारचा उपवास‘ करायचा का ? अशा पद्धतीचा संभ्रम लोकांमध्ये पसरलेला आहे. परंतु कोणतेही काम्य(कामनेने केले जाणारे) व्रत अधिक महिन्यात करू नये असे शास्त्र असल्यामुळे अधिक महिन्यातील सोमवारी श्रावणी सोमवारचा उपवास करू नये तर अधिक महिन्यानंतर येणाऱ्या निजश्रावणातील सोमवारीच फक्त श्रावणी सोमवारचा उपवास करावा.
दिनांक १७ ॲागस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत असलेल्या ‘निज श्रावण‘ महिन्याच्या कालावधीतच ‘सोमवारचा‘ उपवास करावा. या श्रावणाच्या कालावधीत ४ सोमवार आलेले आहेत ते म्हणजे २१ ॲागस्ट, २८ ॲागस्ट, ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर. या चार दिवस सोमवारचे व्रत करावे.”