Solar Eclipse 2023 : सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेमध्ये असताना चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. या घटनेला विज्ञानासह धर्म-ज्योतिषशास्त्रामध्येही खूप महत्त्व आहे. यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी दिसणार आहे. हिंदू पंचांगानुसार, वैशाख अमावस्येला यंदाच्या वर्षातील पहिले ग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणाची सुरुवात २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.०४ वाजता होणार आहे. दुपारी १२.२९ वाजता ग्रहण संपणार आहे. या ग्रहणाचा कालावधी पाच तास २४ मिनिटांचा असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने या कालावधीत सुतक पाळण्याची गरज नाही. असे असले तरीही, या सूर्यग्रहणामध्ये काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणकाळात वातावरणामध्ये हानिकारक किरणे पसरत असतात. या किरणांमुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटातील गर्भाला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून या कालावधीत त्यांनी घराबाहेर पडू नये असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त आणखी ठरावीक गोष्टी पाळाव्या लागतात.
१. या कालावधीत गर्भवती महिलांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. हानिकारक सूर्यकिरणांपासून रक्षण व्हावे हे यामागील उद्दिष्ट असते.
२. गरोदरपणामध्ये महिलांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सूर्यग्रहण पाहू नये. सूर्यग्रहण पाहिल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तसेच त्यांची शारीरिक स्थिती बिघडू शकते.
३. गर्भवती महिलांनी या काळात उपवास करावा. भूक लागल्यास फलाहार करावा. फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यावीत.
४. ग्रहणकाळामध्ये गर्भवती महिलांनी झोप घेणे टाळावे.
५. सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कधीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये. कारण असे केल्याने त्यांच्या बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते असे मानले जाते.
६. ग्रहण असताना गर्भवती महिलांनी भाजीपाला चिरणे, कपडे शिवणे आणि तीक्ष्ण किंवा धारदार हत्यारे वापरणे टाळावे. यामुळे मुलामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात. सेफ्टी पिन, हेअर पिन यांचा वापर करणे टाळावे.
७. सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी जिभेवर तुळशीचे पान ठेवावे. बेडवर बसून शांतपणे हनुमान चालीसा, दुर्गा स्तुतीचे पठण करावे.
(टीप : इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)