सोनल चितळे
Capricorn Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: मकर राशीचा स्वामी शनी आहे. कष्ट, मेहनत, चिकाटी, सातत्य यांचा शनी कारक ग्रह आहे. शनीचे बरेच गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या व्यक्ती खूप मेहनत घेणाऱ्या असतात. तासन् तास कष्ट घेण्याची त्यांची तयारी असते. आपल्या सुखापेक्षा त्यांना इतरांना सुख देण्यात अधिक आनंद मिळतो. बऱ्याचदा लहानमोठ्या संकटाने मकरेच्या व्यक्ती खचून जातात. निराश होतात. पण निरीक्षणांती असे दिसून येते की, या व्यक्तींची संकटे झेलण्याची नेहमी तयारी असते. अडचणीतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या मकर राशीच्या व्यक्ती फारच जिद्दीच्या असतात. भरपूर संयम त्यांच्या ठायी असतो. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ हे त्यांच्या जीवनाचे तत्व असते. अशा या मकर राशीला २०२४ हे वर्ष कसे असेल याचा आढावा घेऊया.
यंदा द्वितीय स्थानातील कुंभ राशीत वर्षभर शनी भ्रमण करेल. कामकाज, आर्थिक स्थिती यांच्या दृष्टीने शनी लाभदायक ठरेल. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, याचा प्रभाव देखील पडेलच. एप्रिल अखेरपर्यंत गुरू चतुर्थातील मेष राशीतून भ्रमण करेल. या कालावधीत गुरुबल कमजोर असेल. कामे मनाजोगती पूर्ण करणे कठीण जाईल. १ मे रोजी गुरू पंचम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. आता उत्तम गुरुबल लाभेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. संपूर्ण वर्षभर राहू आणि नेपच्यून तृतीय स्थानातील मीन राशीतून भ्रमण करतील. हिमतीने पुढे जाल. भावनिक समतोल राखाल. भाग्य स्थानातील कन्या राशीतून केतू वर्षभर भ्रमण करेल. काही बाबतीत लाभात उणीव राहील. मेहनतीला अपेक्षित यश मिळणार नाही. मकर राशीत प्लुटो वर्षभर भ्रमण करेल. संबंधित व्यक्तींना एकत्रित करून भरीव काम करण्यात आपल्याला रस वाटेल. मे अखेरीपर्यंत हर्षल चतुर्थ स्थानातील मेष राशीत भ्रमण करेल. १ जूनला पंचमातील वृषभ राशीत हर्षल प्रवेश करेल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. त्या संबंधित शिक्षण घेण्याची संधी मिळेल. अशा या महत्त्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार आणि अभ्यास करता मकर राशीला वार्षिक ग्रहफल कसे असेल याचा अंदाज घेऊया…
मकर राशीचे वार्षिक भविष्य (Capricorn Yearly Horoscope 2024) :
जानेवारी (January Horoscope) :
नव्या वर्षाच्या सुरुवातीला कामकाज फार वेगाने पुढे जाणार नाही. परंतु काम पूर्ण थांबण्यापेक्षा कमी वेगाने का होईना पण पुढे जाणे नक्कीच चांगले आहे. हिमतीने आणि धीराने घ्यावे. नोकरी व्यवसायात आशेचे किरण दिसतील. प्रवास योग चांगले आहेत. कामानिमित्त प्रवास कराल. विद्यार्थी वर्गाचे मन विचलित होऊ देऊ नका. अभ्यासातील सातत्य टिकवलेत तरच आपला निभाव लागेल. विवाहोत्सुक मंडळींनी थोडे धीराने घ्यावे. विवाहित दाम्पत्यांच्या वैवाहिक जीवनावर इतर व्यक्तींचा प्रभाव पडेल. नात्यातील सहजता कमी होईल. सत्य परिस्थिती जाणून घ्यावी. जोडीदाराच्या वागण्याचा खरा अर्थ शोधावा. घराबाबतचे निर्णय घाईघाईने घेऊ नका. गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल.
फेब्रुवारी (February Horoscope) :
वैचारिक ओझे वाढेल, निर्णय घेणे कठीण जाईल. अशा वेळेस खरे पाहता कोणताही निर्णय न घेता शांत डोक्याने पुन्हा एकदा परिस्थितीचा विचार करावा. नोकरी व्यवसायातील अडथळे कायमस्वरूपी नाहीत. आपल्या अनुभवातून खूप शिकाल. विद्यार्थ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. हतबल न होता तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घ्यावे. विवाहोत्सुक मुलामुलींनी योग्य विचारांती निर्णय घ्यावा. विवाहित दाम्पत्यांच्या समस्या चर्चेने सुटतील. एकमेकांची साथ खूप महत्त्वाची असते याचे भान असू द्यावे. मालमत्तेच्या बाबतीत प्रश्न अधिक क्लिष्ट होतील. गुंतवणूकदारांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. हाडे, सांधे आणि फुप्फुसे यांचे आरोग्य जपावे.
मार्च (March Horoscope) :
साडेसातीचा प्रभाव जाणवेल, सुरळीतपणे चालणारी कामे मध्येच रखडतील. मंगळामुळे हिंमत मिळेल. समस्यांवर उपाय शोधाल, त्यावर अंमलबजावणी कराल. विद्यार्थी वर्गावर परीक्षेचे दडपण येईल. खचून न जाता पालकांच्या मदतीने पुढे चला. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. चांगली संधी उपलब्ध होईल. स्वतःला सिद्ध करू शकाल. विवाहितांचे सहजीवन सुरळीतपणे सुरू राहील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली प्रथा,परंपरा सांभाळाल. प्रॉपर्टीची कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. गुंतवणूक करताना मोठी जोखीम महागात पडेल. श्वसन
संस्था आणि डोक्यासंबंधी विकार बळावतील.
एप्रिल (April Horoscope) :
न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका, साहाय्यकांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अट्टहास करणे हितकारक नाही. विद्यार्थी वर्गाने मोठया परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांची विशेष तयारी करावी. शनी कर्मकारक ग्रह असल्याने तो आपल्या मेहनतीचे योग्य फळ देईलच. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. त्यातून यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल. नव्या पर्वाची लवकरच सुरुवात होणार आहे. धीर सोडू नका. मालमत्तेच्या संबंधातील गुंतवणूक वाढेल. मतैक्य होण्यासाठी अजून वाट बघावी लागेल. अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. डोकेदुखी, चक्कर
येणे या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक ठरेल.
मे (May Horoscope) :
१ मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू असला तरी या गुरुबलामुळे आपणास मोठा आधार मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाने उच्च शिक्षणाच्या अभ्यासावर, परीक्षांवर विशेष लक्षकेंद्रित करावे. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. विवाहोत्सुक मंडळींनी वधूवर संशोधनास सुरुवात करावी. विवाहितांच्या नातेसंबंधात प्रेम, जिव्हाळा वाढेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने गुरूचा राशी प्रवेश हिताचा ठरेल. छंदातून आर्थिक उत्पन्न मिळवाल. तंत्रज्ञान, कला, साहित्य यात प्रगती कराल. गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळाल्याने नव्या आर्थिक वर्षात उत्साह वाढेल. गुडघा, सांधे यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
जून (June Horoscope) :
१ जून रोजी हर्षल पंचम स्थानातील वृषभेत प्रवेश करेल. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी चालना देणारा असा हा राशीबदल असेल. १ मे रोजी मंगळ चतुर्थातील मेष राशीत प्रवेश करेल. जमीनजुमला, मालमत्ता, प्रॉपर्टी या बाबतच्या गोष्टींना पुष्टी मिळेल. खरेदी विक्रीच्या दृष्टीने नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेले कष्ट फळास येतील. मनाजोगता अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रवेश मिळेल. नोकरी व्यवसायात स्वतःच्या हिमतीच्या जोरावर अडथळे पार करत यशाचे झेंडे फडकवाल. हार मानणाऱ्यातील आपण नव्हेच! कठोर परिश्रम आपल्या रक्तातच भिनलेले आहेत. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल.
जुलै (July Horoscope) :
आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाठ, मणका, गुडघा यांचे संकेत डावलू नका. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासात रस घेऊन योग्य मेहनत घ्यावी. नोकरी व्यवसायात उत्कर्षकारक घटना घडतील. नवे करार करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. छुप्या अटी, अलिखित गोष्टी यांचा पुरेपूर विचार करावा. विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदार संशोधनाचे कार्य सुरू ठेवावे. ओळखीतून, मैत्रीतून नाते संबंध जुळण्याची शक्यता आहे. घराच्या बाबतची कामे वेग घेतील. गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा योग्य परतावा मिळेल.
ऑगस्ट (August Horoscope) :
साडेसातीच्या प्रभावाचा अनुभव येत असतानाच गुरुबळाची महती देखील प्रत्ययास येईल. त्यामुळे केलेले प्रयत्न आणि घेतलेली मेहनत मुळीच वाया जाणार नाही. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरील एकाग्रति वाढवावी. वेळापत्रकाप्रमाणे वागल्यास, स्वयंशिस्त अंगिकरल्यास यश नक्कीच मिळेल. नोकरी व्यवसायात अनेक समस्या पुढ्यात उभ्या राहतील. न डगमगता विचारपूर्वक कृती कराल. विवहितांनी एकमेकांना साथ देणे गरजेचे ठरेल. प्रॉपर्टीशी संबंधित कामामुळे नातेसंबंध बिघडू देऊ नका. गुंतवणूक करताना मागील अनुभव मार्गदर्शक ठरतील. नुकसान टाळावे. स्नायू आखडणे,
लचक भरणे असे त्रास संभवतात.
सप्टेंबर (September Horoscope) :
सणवार, समारंभ उत्साहात साजरे कराल. नोकरी व्यवसायातील कामकाजात महत्वाची भूमिका बजावाल. आपले निर्णय भविष्यातही लाभदायक ठरतील. विद्यार्थी वर्गाला अनेक प्रलोभने विचलित करतील. अभ्यासात एकाग्रता होणार नाही. विवाहोत्सुक मंडळींच्या अपेक्षित भेटीगाठी होतील, चर्चा रंगतील. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन आनंदाचे असेल. एकमेकांच्या कलाने घ्यायला शिकाल. घराच्या, प्रॉपर्टीच्या प्रश्नांना कायदेशीर उत्तरे मिळतील. पुढे जाण्याचा मार्ग निश्चित होईल. गुंतवणूकदारांना परतावा चांगला मिळेल. पैशाने पैसा वाढेल. पायात गोळे येणे, मांड्या, पोटऱ्या भरून येणे अशी लक्षणे दिसतील. विश्रांतीची आवश्यकता भासेल.
ऑक्टोबर (October Horoscope) :
कोणाच्या सांगण्याकडे किती लक्ष द्यायचे हे आपण ठरवावे. आपले निर्णय आपल्या अनुभवानुसार घ्यावेत. नोकरी व्यवसायात बुध, शुक्राची चांगली साथ लाभल्याने कामे वेळेवर मार्गी लागतील. विद्यार्थी वर्गाची या महिन्यात खरी कसोटी आहे. भाग्य स्थानातील रवी, केतूमुळे अनपेक्षितपणे अभ्यासात अडथळे येतील. विवाहोत्सुक मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळण्यास ग्रह साथ देतील. विवाहित दाम्पत्यांनी आपल्या भावना योग्यप्रकारे व्यक्त करणे, शब्दात मांडणे गरजेचे आहे. काही न बोलता जोडीदाराने आपल्याला समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही. पोट, पचन आणि डोळ्यांचे आरोग्य सांभाळावे.
नोव्हेंबर (November Horoscope) :
दशमातील नीच राशीच्या रवीमुळे नोकरी व्यवसायात अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागेल. साडेसातीचाही प्रभाव असल्याने मन द्विधा होईल. मात्र गुरूच्या साथीने परिस्थितीतून मार्ग निघेल. धीर सोडू नका. विद्यार्थी वर्गाने नेटाने आणि जिद्दीने अभ्यासात लक्ष घालावे. सराव आणि उजळणीचा खूप फायदा होईल. विवाहोत्सुक मंडळींनी आता सज्ज राहावे. विवाहितांच्या बाबतीत समज- गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. घर, प्रॉपर्टीचे काम लांबणीवर पडेल. गुंतवणूक करताना फारच सावधगिरी बाळगावी लागेल. हातचे सोडून पळत्यापाठी जाऊ नका. उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त भार पडेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.
डिसेंबर (December Horoscope) :
वर्षाचा शेवटचा महिना. यात वर्षभराचा लेखाजोखा मांडाल. जी कामे पूर्ण झाली नाहीत ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्याल. वैयक्तिक बाबी, प्रवास, भेटीगाठी यांची आखणी कराल. विद्यार्थी वर्गाला गुरुचे साहाय्य असल्याने मेहनत, कष्ट फळास येतील. मेहनतीला पर्यायी मार्ग, पळवाट नसते हे आपण जाणताच. नोकरी व्यवसायात सत्य परिस्थिती धीटपणे मांडाल. लपवाछपवीला थारा नाही. विवाहोत्सुक मुलामुलींना आपला जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांचे सूर जुळतील. १३ डिसेंबरला हर्षल वक्र गतीने मेष राशीत प्रवेश करेल. घर, प्रॉपर्टीच्या बाबत अंतिम निर्णय घेणे कठीण जाईल. गुंतवणूक करणे, लाभ होणे याबाबतीत ग्रहांचे पाठबळ मिळेल.
एकंदरीत २०२४ हे वर्ष साडेसातीच्या अंतिम टप्प्यातील आहे. एप्रिलपर्यंत रखडलेली अनेक कामे मेपासून पुढे मार्गी लागतील. उत्तम गुरुबल प्राप्त झाल्याने विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह ठरतील. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना आनंदवार्ता समजतील. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. परदेशातील अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण कराल. हाडे, सांधे, मणका आणि स्नायू यांची विशेष काळजी घेतल्यास २०२४ हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना आनंदाचे जाईल.