पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोनवेळा आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत. २०२४ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशात निवडणुकांची तयारी सुरूही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी भाजपाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. आमचे ३५ पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असं मविआने म्हटलं आहे. शरद पवार यांनीही २०२४ ची निवडणूक भाजपासाठी सोपी नसेल असं वक्तव्य केलं आहे. सी व्होटर्सच्या सर्वेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. आता मंदीच्या संकटाला मोदी कसं तोंड देतील? याबाबत ज्योतिषी उदयराज साने यांनी उत्तर दिलं आहे.
जगभरातील मंदीचा मोदींवर काय परिणाम होणार?
उदयराज साने यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जगात मंदीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत, भारतात देखील ही मंदी येईल. त्या काळातच नव्या वर्षातील परीक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावी लागणार आहे. जून ते नोव्हेंबरच्या शेवटास होत असलेला राहू-प्लुटो केंद्रयोग, निसर्ग कुंडलीच्या लग्न दशमस्थानातून हा योग होत असल्याने जगभर मंदी जोर पकडणार आहे, त्याचे पडसाद भारतात सुद्धा नक्कीच उमटणार आहेत. यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेत घसरगुंडी होऊ शकते, पण मेषेतील गुरुचे सहाय्य त्याची तीव्रता कमी करण्यासाठी नक्कीच मदतीस येईल.
गुजरातसह राज्यांच्या निवडणुकीत काय होणार?
२०२३ वर्षात अनेक महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने या मंदीचा तेथील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. मोदींच्या कुंडलीत तृतीय व षष्ट स्थानातून हा योग होत असल्याने त्यांना त्यांच्या आरोग्याबरोबरच विघातक शक्तींपासून स्वतःला दूर ठेवावयास हवे. जगभर दंड सत्तांचे लोकसत्तेला आव्हान मिळत असताना, भारतापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना, विशेषतः बेरोजगारी-वाढती लोकसंख्या-देशाचे संरक्षण या प्रमुख मुद्द्यांमधून सरकारला वाट काढावी लागणार आहे. या समस्येवरील उपाय योजना आणि याचे समाधानकारक उत्तर आज मितीस कुणाकडेही नाही असंही उदयराज साने यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षाच्या शेवटी मोदींना एक प्रकारे परीक्षेलाच सामोरं जावं लागणार आहे असं म्हणता येईल. या समस्येतून त्यांना मार्ग काढता आला नाही तर त्याचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरही होऊ शकतो.