Ashadhi Wari 2024 Rashi Bhavishya: हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना म्हणजे आषाढ. यंदा ६ जुलैला आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे व ४ ऑगस्टपर्यंत आषाढ महिना कायम असणार आहे. ५ ऑगस्टपासून श्रावण सुरु होणार आहे. हिंदू धर्मात आषाढ महिन्याला प्रचंड महत्त्व आहे. या महिन्यातील एकादशी निमित्त महाराष्ट्रातील पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा जमतो. जगभरातून विठुरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक येतात. आषाढी एकादशीचे महत्त्व म्हणजे या तिथीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. या महिन्यापासून देव चार महिने विश्रांती घेतात, म्हणूनच या चातुर्मासात शुभ कार्य टाळले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, आषाढ महिन्यात पूर्वाषाढ व उत्तराषाढ नक्षत्र जागृत असते व या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र या दोन्ही नक्षत्रांच्या मधोमध असतो. या वर्षी आषाढात ग्रह व नक्षत्रांची स्थिती विशेष पद्धतीने जुळून येत आहे परिणामी ३० दिवस सहा राशींना विठोबा रखुमाईचे वरदान लाभणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

आषाढ महिन्यातील नशीबवान राशी

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीला आषाढ महिन्यात करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. उच्च पदावरील लोकांशी गाठीभेटी वाढतील. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. आपले कर्म योग्य असेल असे पाहा कारण या कालावधीत आपल्याला कर्माचेच फळ मिळणार आहे. दुसऱ्याबाबत वाटणारी ईर्षा,नकारात्मक विचार तुमचे नुकसान करू शकतात. व्यावसायिकांना या काळात फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारू शकते, कौटुंबिक आयुष्यात आनंद येईल. संततीच्या माध्यमातून सुख अनुभवता येण्याची शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीसाठी पुढील ३० दिवस अत्यंत शुभ असणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग दृढ होतील. आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून धनप्राप्ती होणार आहे परिणामी नेहमीपेक्षा अधिक अर्थाजन होऊ शकते. रोजगाराच्या नवीन संधी आपल्याला प्राप्त होतील. करिअरमध्ये वेगळी वाट धुंडाळायला लागेल. वैवाहिक आयुष्यातून संकटे दूर होतील. यात्रेचे योग आहेत.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सुरु केलेल्या कामात यश हाती येऊ शकते. धन, पद, पैसे आपल्याकडे येण्याचा मार्ग शोधतील. जुन्या प्रश्नावर तोडगा निघेल. अडचणी दूर होतील. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम व्हाल. कौटुंबिक जीवनात काही निवांत क्षण जगता येतील. धर्म- कर्माची आवड वाढेल.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

स्वतःला सिद्ध करण्याचे बळ प्राप्त होईल परिणामी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आपल्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. भौतिक सुख प्राप्त होईल. संपत्ती, वाहन खरेदीचे योग आहेत. नोकरदार मंडळींना एखाद्या अन्य कंपनीकडून मोठ्या पगाराची ऑफर येऊ शकते. आपल्याला प्रामाणिकपणाचे फळ मिळू शकते. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा महिना लाभदायक सिद्ध होउ शकतो. खासगी आयुष्यात स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यावर भर असेल. स्वतःची साथ आनंददायी ठरेल.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीचा बँक बॅलन्स वाढवणारा हा आषाढ महिना असणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून पैसे प्राप्त होऊ शकतात. जीवनात काही गोष्टींचीही नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. प्रेम संबंध सुधारतील. विवाह इच्छुकांना लग्नासाठी चांगले स्थळ सांगून येऊ शकते. संपत्तीच्या खरेदीचे योग आहेत.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीसाठी सर्व बोटं तुपाच्या कढईत असतील असा हा कालावधी आहे. आपले आर्थिक बळ पती किंवा पत्नीच्या कामामुळे वाढू शकेल. प्रेमाच्या नात्यांना वेगळी ओळख मिळू शकते. ऊर्जा वाढेल. आनंदी राहाल. जीवनात काही नवीन सुखसुविधा आल्याने थोडा खर्च सुद्धा वाढू शकतो पण याकडे गुंतवणूक म्हणून पाहणे आवश्यक आहे. नोकरीच्या बाबत सतत तक्रार करणे सोडून द्यावे, वरिष्ठांशी थोडे जुळवून घेतल्यास पगारवाढ व पदोन्नतीचा योग आहे. वाणीवर नियंत्रण असणे आवश्यक असेल.

हे ही वाचा<< २४ जून पंचाग: इंद्रदेव मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींच्या कुंडलीत पाडणार सुखाचा पाऊस; धनवृद्धीने सुरु होईल आठवडा

आषाढ महिन्यात कुणी राहावे सावध?

उर्वरित राशींपैकी कर्क, वृश्चिक, धनु, कुंभ यांनी मात्र आषाढ महिन्यात थोडं सावध राहण्याची गरज आहे. या मंडळींना वाहन चालवताना विशेष काळजी घ्यायला हवी. वादात पडणे टाळावे. अतिरेक करू नये. करिअर व खासगी आयुष्यात थोडे विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.

(टीप: वरील लेख गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)