March 2024 Monthly Horoscope Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. प्रत्येक ग्रहाच्या भ्रमणाचा वेग वेगळा असल्याने त्यांना राशी व नक्षत्र परिवर्तन करण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा कमी जास्त असू शकतो. पण साधारणतः ३० दिवसांनी ग्रहांमध्ये काही ना काही स्वरूपात बदल होत असतो, यानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांच्या हालचाली होत असतात. येत्या मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वपूर्ण ग्रह गोचर करून भ्रमण करणार आहेत. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ७ मार्चला शुक्र व बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. तर दुसऱ्या आठवड्यात १४ मार्चला सूर्य मीन राशीत गोचर करणार आहे. लगेचच १८ मार्चला शनी देवाचा उदय होणार आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून हे सर्व बदल महत्त्वाचे असल्याने याचा मोठा प्रभाव मेष ते मीन राशीवर होणार आहे. हा येणारा मार्च महिना तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे हे पाहूया. प्रसिद्ध ज्योतिषतशास्त्र अभ्यासक सोनल चितळे यांच्या माहितीनुसार मार्च महिन्यातील १२ राशींचे भविष्य खालीलप्रमाणे:
३१ मार्चपर्यंत मेष ते मीन राशींपैकी कुणाच्या भाग्यात लाभ, कुणाला कष्ट?
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
१५ मार्चपर्यंत मंगळाचे बळ उत्तम आहे. धाडसाची, धैर्याची कामे तोपर्यंत पूर्ण कराल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. गुरुबल चांगले आहे त्यामुळे हिमतीने आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाच्या परीक्षेचा काळ उत्तम असेल. शांत चित्ताने, एकाग्रतेने परीक्षेस सामोरे जावे. केलेल्या अभ्यासाची उजळणी करत राहा. नक्की लाभ होईल. नोकरदार तसेच व्यावसायिक मंडळींनी महत्वाची कामे महिन्याच्या पूर्वार्धात पूर्ण करावीत. विवाह जुळणे शक्य आहे. प्रयत्न सोडू नका. भेटीगाठी यशस्वी ठरतील. कामानिमित्त लहान मोठे प्रवास कराल. सरकारी कामकाज लांबणीवर पडेल. भावंडांमधील मतभिन्नता मर्यादेतच राहू द्यावी.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
१९ मार्च रोजी शनी उदय झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी सावरण्यास मदत होईल. मीन राशीतील नीच बुध आणि त्याच्या सोबत असलेला राहू यामुळे मित्र मदतीची अपेक्षा करतील. कोर्टकचेरीतील कामात चातुर्याने डावपेच खेळावे लागतील. काही गोष्टी मनाविरुद्ध असल्या तरी त्या स्वीकाराव्या लागणार आहेत. विद्यार्थी वर्गाने आता मनोनिग्रह करणे आवश्यक आहे. आसपास अनेक प्रलोभने आहेतच. त्यापासून स्वतःला दूर ठेवावे. नोकरी व्यवसायात आपली खरी कसोटी आहे. जवळच्या व्यक्तीवर देखील अंधविश्वास ठेवू नका. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. त्यामुळे हक्काचा आधार मिळेल. खचून जाऊ नका. हाडे, स्नायू आणि स्नायूबंध यांचे आरोग्य जपावे.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
या महिन्यातील ग्रहमानाचे फळ संमिश्र असेल. दशम स्थानातील राहू, बुध, नेपच्यून गूढ परिस्थिती निर्माण करेल. काय करावे, कसा निर्णय घ्यावा याबद्दल प्रश्न उभे राहतील. विद्यार्थी वर्गाची आता खरी कसोटी आहे, धीराने घ्यावे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा उत्तम लाभ होईल. डावपेच शिकायला मिळतील, आपले अनुभवही कामी येतील. विवाहित मंडळींनी जोडीदारासह मोकळेपणाने संवाद साधल्यास रुसवेफुगवे दूर होतील. नात्यातील गोडवा जपण्यासाठी तत्वज्ञान दूर ठेवावे. नात्याला अधिक प्राधान्य द्यावे. घरासंबंधीत कामे काही कारण नसताना रेंगाळतील. पित्त विकार बळावल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
आपल्या बोलण्यात स्पष्टपणा असावा, अन्यथा लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतील. खबरदारी घ्यावी. कौटुंबिक समस्या चर्चेने सोडवाल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कोणतीही पळवाट शोधू नका. आजचे यश आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. नोकरी व्यवसायातील गुंता सोडवताना धोरणी विचार कराल. त्यात आपले आणि इतरांचेही हित साधण्याचा आपला प्रयत्न असेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना दमछाक
होईल. एकमेकांवरील प्रेमाखातर आपण काहीही करण्याची तयारी दाखवाल. गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठी जोखीम पत्करू नये. सावधगिरी बाळगावी. पडझड होऊन जखम झाल्यास त्यात पू होईल. दुखणे बरेच दिवस पुरेल.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
मित्र मंडळींना मदतीचा हात पुढे करताना दिलदारपणा दाखवाल. राजा जसा प्रजेची काळजी घेतो तसे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडाल. विद्यार्थी वर्गाची आता खरी कसोटी जवळ आली आहे. परीक्षा जवळ आल्यावर नेटाने अभ्यास करण्यापेक्षा महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायातील चढउतार , राजकारण यांचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. नव्या जोमाने नव्या कार्यक्षेत्रातही आपला ठसा उमटवाल. आधीच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल. गुंतवणूकदारांच्या लाभावर अंकुश लागेल. त्यामुळे फार अपेक्षा ठेवणे इष्ट नाही. १५ मार्चच्या आत जमीन, प्रॉपर्टी संबंधित कामकाजात यश मिळेल. कोर्टकचेरीची कामे चालू असल्यास आपल्या बाजूने निकाल लागेल. पित्त, पुळ्या, उष्माघात यांचा त्रास वाढेल.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
महिन्याचा पूर्वार्ध हा उत्तरार्धापेक्षा चांगला असेल. उत्तरार्धात एका पाठोपाठ एक प्रश्न उदभवतील. सप्तमतील रवी ,राहू, नेपच्यून आपल्या नातेसंबंधात गैरसमज निर्माण करतील. या काळात प्रेमाची खरी कसोटी असेल. विद्यार्थी वर्गाने प्रसार माध्यमाच्या प्रलोभनापासून दूर राहावे. अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायात अत्यंत शिताफीने आणि चातुर्याने आपले मुद्दे मांडावेत. असे केल्यासच वरिष्ठांचे पाठबळ मिळवू शकाल. घर, मालमत्ता यासंदर्भात पुढचे पाऊल पडेल. गुंतवणूकदारांना मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. येथे मोठी जोखीमही पत्करावी लागेल. पचन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांचे आरोग्य जपावे.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
बुद्धीला चालना मिळेल अशा घटना घडतील. बुद्धी लढवून प्रश्नांची उकल करणे आपल्याला आवडतेच. विद्यार्थी वर्गाला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. गुरुबल चांगले असल्याने एकेका गोष्टींचा साकल्याने विचारकरून मार्गी लावाल. नोकरी व्यवसायात आपली मते, विचार सर्वांसमोर निर्धारपूर्वक मांडाल. इतरांवर आपला प्रभाव पडेल. विवाहोत्सुक मुलामुलींना मनपसंत जोडीदार शोधण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. विवाहित मंडळींनी एकमेकांच्या सुखाचा विचार केल्याने त्यांचे सूर उत्तम जुळतील. घर, वाहन यांच्या खरेदीसाठी चांगला कालावधी आहे. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूकीवर मर्यादित परतावा मिळेल. जास्त नुकसान झालेले नाही यातच समाधान मानावे.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
आर्थिक वर्ष संपताना कामाचा बोजा वाढेल, त्याचा ताणही वाढेल. नोकरी व्यवसायातील कामामुळे रक्तातील घटक वरखाली होतील. आरोग्याची काळजी घेणे फक्त आपल्याच हाती आहे हे ध्यानात असू द्यावे. विद्यार्थी वर्गालाही अभ्यासाचा, परिक्षेचा तणाव जाणवेल. म्हणून सुरुवातीपासूनच वेळापत्रक आखा आणि त्याचे काटेकोर पालन करा. विवाहोत्सुक मंडळींनी अतिचिकित्सा करू नये. संशोधन चालू ठेवावे. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांना लहानमोठ्या कामात मदत करावी. अशाने एकमेकांचा आधार वाटतो, नाते दृढ होते. घराच्या, मालमत्तेच्या बाबतीत कायदेशीर मार्गाने पुढे जावे. सत्याच्या बाजूने राहा. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक भरपूर लाभ मिळवून देईल.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
मनाविरुद्ध घटना घडल्यास अतिचिडचिड करण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करावा. त्यासाठी कोणाला कारणीभूत न मानता आपल्याच मनाशी संवाद साधावा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचे वेळापत्रक काटेकोर पाळावे. नियमितपणा आणि सातत्य राखल्यास उत्तम प्रचिती येईल. नोकरी व्यवसायातील कामे पूर्णत्वास जात असल्याचे समाधान मिळेल. दिलेला शब्द पूर्ण कराल. नैतिक मूल्ये जपाल. विवाहोत्सुक मंडळींना गुरुबल अपुरे पडेल. अजून थोडा धीर धरावा लागेल. विवाहित मंडळींना एकमेकांच्या सहवासाची संधी मिळेल. प्रेम व्यक्त करणे ही देखील एक कला आहे, हे ध्यानात असावे. लहानमोठे मतभेद दुर्लक्षित करावेत. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जपून व्यवहार करावेत.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
साडेसातीचा प्रभाव जाणवेल, सुरळीतपणे चालणारी कामे मध्येच रखडतील. मंगळामुळे हिंमत मिळेल. समस्यांवर उपाय शोधाल, त्यावर अंमलबजावणी कराल. विद्यार्थी वर्गावर परीक्षेचे दडपण येईल. खचून न जाता पालकांच्या मदतीने पुढे चला. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. चांगली संधी उपलब्ध होईल. स्वतःला सिद्ध करू शकाल. विवाहितांचे सहजीवन सुरळीतपणे सुरू राहील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली प्रथा,परंपरा सांभाळाल. प्रॉपर्टीची कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. गुंतवणूक करताना मोठी जोखीम महागात पडेल. श्वसन संस्था आणि डोक्यासंबंधी विकार बळावतील.
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
आर्थिक वर्ष पूर्ण होताना गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. मेहनत आणि अभ्यास यांचे चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेला तोड नाही, त्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत. नोकरी व्यवसायात आपली कामगिरी आणि दक्षता विशेष उल्लेखनीय असेल. काही महत्त्वाच्या बाबी निर्भीडपणे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल. विवाहोत्सुक मंडळींनी सुयोग्य जोडीदार निवडण्याची चळवळ सुरू ठेवावी. विवाहित दाम्पत्यांच्या दृष्टीने हा महिना आनंदाचा असेल. सहवासाने प्रेम वाढेल. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. घर, मालमत्ता याबाबतची बोलणी सुरू होतील. आपले मत स्पष्टपणे मांडाल. उष्णतेचे विकार बळावतील. उत्सर्जन संस्थेवर ताण येईल.
हे ही वाचा<< १८ वर्षांनी बुध-राहू युती बनल्याने एका झटक्यात ‘या’ ५ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही होणार कोट्याधीश?
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
महिन्याचा पूर्वार्ध फार चांगला जाईल. महत्वाच्या कामात यश मिळेल. काही निर्णय लांबणीवर पडले तरी ते हितावह ठरतील. विद्यार्थी वर्गासाठी हा परीक्षेचा काळ अतिशय महत्वाचा असेल. मन चंचल होईल. पण घाबरू नका. आधी घेतलेल्या मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कार्यप्रणाली मध्ये झालेले बदल अंगिकारायला वेळ लागेल. व्यवसायात हिरीरीने निर्णय घ्याल. व्यवसाय वृद्धीसाठी भविष्यात हे निर्णय लाभकारक ठरणार आहेत. गुंतवणूकदारांना योग्य परतावा मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढेल. आर्थिक परिस्थिती उंचावेल. विश्वसनीय व्यक्तींपाशीच घराच्या बाबत बोलणी करावीत. आपल्या चांगुलपणाचा इतर लोक लाभ उठवतील. सावधान! व्यवहारात भावनिक गुंतागुंत नको.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)