Tulsi Vivah 2023: भाऊबीज, पाडवा झाला की दिवाळी संपली असे अनेकांना वाटते पण असे असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. भगवान विष्णू आषाढी एकादशीनंतर चार महिने निद्रा अवस्थेत असतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या काळात कोणतीही शुभ कार्य, लग्न समारंभ सहजा करू नये अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरूवात केली जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात. यंदा कार्तिकी एकादशी, तुळशीचे लग्न कधी असणार आहे तसेच त्याचे शुभ मुहूर्त व महत्त्व जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळशी विवाहचे २०२३चे महत्व

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विवाहित महिला या दिवशी आपल्या पती आणि कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी उपवास करतात. महिला देवी लक्ष्मीची पूर्ण भक्तिभावाने प्रार्थना करतात. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते.

हेही वाचा- Daily Rashi Bhavishya : ‘या’ राशीच्या व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता, पाहा तुमचे भविष्य 

तुळशीच्या विवाहाची तारीख व मुहूर्त

लोकसत्ताला याबाबत माहिती देताना अवधूत शेंभेकर गुरुजी यांनी सांगितले की,”एकादशी ते पोर्णिमा या काळात तुळशीचे लग्न पार पडते. दिवसभरात कधीही तुळशीचे लग्न लावता येते. काही ठिकाणी सकाळी ,काही ठिकाणी संध्याकाळी तर काही ठिकाणी रात्री लग्न लावतात.”

द्रिक पंचांगानुसार यंदा कार्तिक एकादशी २३ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुळशीचे लग्न लावतात. “तुळशीचे लग्न २३ नोव्हेंबरपासून सकाळी ६:५१ वाजेपासून सुरु होतील. २७ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे दुपारी २:४६ वाजेपर्यंत तुळशीचे लग्न लावले जातील.” असे शेंभेकर गुरुजी यांनी सांगितले.

हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक एकदशी २३ नोव्हेंबरला गुरुवारी सायंकाळी २१.०२ वाजता सुरू होणार आहे. कार्तिक महिन्याची पौर्णिमा रविवार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३:५३ वाजता सुरू होत आहे तर सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२: ४५ वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होईल.

हेही वाचा – ३० नोव्हेंबरला ‘या’ राशीची होणार चांदी? शुक्रदेवाच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता

तुळशीच्या लग्नाची आख्यायिका
पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असूरांचा राजा जालंधरशी लावण्यात आले होते. दृष्ट जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असूरांचा राजा जालंधरचा पराभव केला. मात्र वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने वृंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य, तुळशीचे पान घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीचं लग्न लावणार्‍याला कन्यादानाचे पुण्य लाभते असेही मानले जाते.

तुळसी पूजन मंत्र-
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi vivah 2023 date time and muhurt tulsi marriage auspicious time auspicious yoga and significance snk