Tulsi Vivah 2024 Date Time Puja Vidhi: आपल्याकडे दिवाळीची जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते, तितक्याच आतुरतेने तुळशीच्या लग्नाचीही वाट पाहिली जाते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योग निद्रेत जातात, जे कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशीला निद्रावस्थेतून बाहेर येतात. या संपूर्ण चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तुळशीच्या लग्नानंतर शुभ कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, म्हणून तुळशीच्या लग्नाची लोक आतुरतेने वाट पाहतात. यंदा कार्तिकी एकादशी, तुळशीचे लग्न कधी असणार आहे तसेच त्याचे शुभ मुहूर्त व महत्त्व जाणून घेणार आहोत.
तुळशी विवाह कधी आहे?
पंचांगानुसार कार्तिक एकदशी तिथी ११ नोव्हेंबरला, सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ नोव्हेंबर, मंगळावारी संध्याकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जाईल. तसेच तुळशी विवाहानंतर पौर्णिमेपर्यंतही अनेक जण तुळशी विवाह साजरा करतात.
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे.
तुळशी विवाहाचे महत्त्व
हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. असं म्हणतात, ज्या घरात तुळशीचा वास असतो तिथे देवी लक्ष्मी सदैव वास करतात, त्यामुळे तुळशी विवाहालाही विशेष महत्त्व आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप आणि श्री बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान शालिग्राम यांचा विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते.
तुळशीच्या लग्नाची आख्यायिका
पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असुरांचा राजा जालंधरशी लावण्यात आले होते. दुष्ट जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते, म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असुरांचा राजा जालंधरचा पराभव केला. मात्र, वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने वृंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले.
हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य, तुळशीचे पान घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्तीला वैकुंठाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीचं लग्न लावणार्याला कन्यादानाचे पुण्य लाभते, असेही मानले जाते.
तुळशी पूजन मंत्र
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।