Tulsi Vivah Unknown Facts: भगवान विष्णूच्या, कृष्णाच्या आणि पांडुरंगाच्या पूजेच्यावेळी तुलसीचा हार घालतात. भागवत संप्रदायात तुलसीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वैष्णव लोक आणि वारकरी तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ तयार करून ती आपल्या गळ्यात ठेवतात. वारकरी महिला पंढरीच्या वारीला जाताना डोक्यावरून पितळेचे वृंदावन नेतात. सर्व देवांच्या पूजेत तुलसीपत्र अर्पण करतात. पावित्र्य, देवत्व प्राप्त झालेल्या या रोपाला तुळस नाव पडण्यामागे खास कारण आहे. तुलसीमाहात्म्यातील एका श्लोकात तुळशीच्या नावाची कथा सांगण्यात आली आहे. पंचांगकर्ते आणि खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी तुळशीच्या नावाविषयी व जन्माविषयी दिलेली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. यंदा २४ नोव्हेंबरपासून तुळशीच्या लग्नाचे मुहूर्त सुरु होत असल्याने ही परंपरा नेमकी कुठून सुरु झाली हे ही पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळस हे नाव आलं कुठून?

तुलसीचे मूळ नाव तुळस असावे. तुलसी हे त्या नावाचे संस्कृतीकरण झाले असावे असे व्यत्पत्तिकोशात म्हटले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात ‘तुलसी‘ हे नाव का मिळाले ते सांगितले आहे.

नरा नार्यश्च तां दृष्ट् वा तुलनां दातुमक्षमा:।
तेन नाम्ना च तुलसीं तां वदन्ति पुराविद:॥

नरनारींनी त्या वनस्पतीला पाहिले आणि त्यांना तिची कोणत्याही वनस्पतीशी तुलना करता येईना. म्हणून पुरातत्त्ववेत्ते तुलसी या नावाने तिला संबोधू लागले, असा वरील ओळींचा अर्थ होतो.

तुळशीचा जन्म

देव-दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनाच्यावेळी जे अमृत निघाले, त्या अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस निघाली. ती तुळस ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना दिली असे स्कंदपुराणात सांगण्यात आले आहे. दुसऱ्या एका कथेप्रमाणे जलंधराची पत्नी वृंदा हिच्यापासून तुलसीचा जन्म झाला असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा<< २२ महिन्यांनी पराक्रमी ग्रहाचा स्वराशीत प्रवेश; अपार धनलाभासह आजपासून ‘या’ राशींवर असणार लक्ष्मी-विष्णुकृपा

तुळशीची लग्नकहाणी

पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असूरांचा राजा जालंधरशी झाले होते. दृष्ट जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असूरांचा राजा जालंधरचा पराभव केला. मात्र वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड बनण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने वृंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले.

(वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi vivah mantra shubh muhurta unknown facts how tulsi name was decided tulshichya lagnachi katha why tulsi is shubh svs