Future of Uddhav Thackeray in Politics 2025 : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरच्या आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल आणि निकाल सगळ्यांसमोर येईल. या निवडणुकीत कुणाच्या पारड्यात काय पडणार, याचा राज्यातील नेते मंडळी आणि त्यांचे पक्ष यांच्या कुंडलीच्या आधारे भविष्य जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या पक्षाच्या भवितव्याचा वेध घेताना लक्षात येते की, अनेकांच्या मनात कुतूहल आहे की, पुन्हा एकदा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभेल का आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा त्यांना स्वतःला व त्यांच्या पक्षाला किती फायदा होईल. पक्ष फुटला, ४६ आमदार निघून गेले, असे असले तरी लोकप्रियता मात्र त्यांच्या पाठीशीच राहिली.
सद्यस्थितीत ग्रहांची मालिका विरोधकांसाठी अनिष्ट आहे. त्याचा फायदा शिवसेनेला सर्वाधिक होण्याची शक्यता ग्रहबळ व्यक्त करते आहे. याला कारण उद्धव ठाकरे यांची सध्याची उत्तम ग्रहस्थिती आहे. चतुर्थात गुरू स्वगृहीचा त्यात चंद्राची अंतर्दशा शुक्राच्या नक्षत्रात तसेच शुक्र भाग्येश व धनेश त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचा हा काळ सुवर्णकाळ ठरेल. मात्र त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूपच जरुरीचं ठरेल. कोणतेही पद न स्वीकारता त्यांनी केवळ संघटना सांभाळली, तिच्याकडे लक्ष पुरवले तर भविष्यात शिवसेनेचं राज्य येण्याची शक्यता त्यांच्या कुंडलीत दिसते आहे.
मात्र, त्यासाठी त्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य ती पदं देऊन पक्षाची उत्तम बांधणी करणे आवश्यक आहे, तर ग्रहांचे पाठबळ लाभेल. कुंडलीमधील ग्रहस्थितीला माणसाच्या कर्तृत्वाचीही जोड मिळाली तरच शक्यता प्रत्यक्षात येतात. दौरे आणि लोकांशी संवाद हे सारं गणित त्यांच्यासाठी लोकप्रिय ठरेल. एकूण मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर २०२४ रोजी रवी, बुध व षष्ठातील शनीची मदत खूपच चांगली ठरेल. शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडीला पुढील वाटचालीसाठी ते खूप उपयुक्त ठरेल. त्यातच पुढे २०२८ नंतर येणारी शनी महादशा यशाचा मार्ग अधिक प्रशस्त करेल, त्यामुळे त्यावेळेस पुन्हा एकदा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभण्याची शक्यता कुंडलीतून व्यक्त होताना दिसते आहे.