Uddhav Thackeray Astrology Prediction: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यामुळे शिंदे सरकार बचावले असले तरी यामागे उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय देताना जर ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करता आले असते असे स्पष्ट केले होते. पण उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर देताना “माझ्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडणे मला मान्य नव्हते म्हणून मी नैतिकतेने राजीनामा दिला, आणि आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नैतिकता असल्यास राजीनामा द्यायला हवा” अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती.
उद्धव ठाकरेंना २०२५ ची ‘ही’ तारीख सर्वात मोठा बदल दाखवणार?
उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत २५ जून २०२५ ते १ जून २०२६ या काळात काही महत्त्वाच्या उलाढालीचे संकेत आहेत ज्यातून संघटनेला वेगळे बळ नक्कीच प्राप्त होईल. कृष्णपक्षातील षष्ठी ते शुक्ल पक्षातील दशमीपर्यंत चंद्रबळ क्षीण असते, तसेच हा चंद्र सिंहराशीत व्यय स्थानात बसला आहे. त्याबरोबर राहू व प्लुटो युती करत आहेत. एकूण ग्रहांची ही स्थिती मानसिक त्रासात भर घालणारी आहे. पण चतुर्थातील स्वगृहीच्या गुरूचे पाठबळ खूपसा दिलासा देईल. त्यातून परिश्रम, मेहनत यातून यशाचा मार्ग दिसू लागेल. विशेष म्हणजे गुरू महादशेत भाग्यातील मंगळाची महादशा खूपशी मानसिक स्थिरता देईल.
उल्हास गुप्ते सांगतात की, चतुर्थात गोचराचे शनी- केतू मानसिक व शारिरीक स्वास्थ बिघडवत होते. कालांतराने पक्षात फूट पडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षचिन्ह व शिवसेना पक्षही दूर गेला, अशा करूण अवस्थेत स्वत:ला सावरून ते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसले. येत्या काळातही उद्धव ठाकरे यांना हेच करावे लागणार आहे. नवीन दौऱ्यांतून, नव्या पिढीचे कार्यकर्ते शोधा ते विश्वासू सापडतील, असे त्यांची पत्रिका सांगते आहे.
हे ही वाचा<< भाजपाच्या विजयाबाबत ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीत पाप ग्रहाने जे मतदार…”
२०२३ ते २०२५ या दोन वर्षात उद्धव ठाकरेंना..
दुसरीकडे ज्योतिषतज्ज्ञ व टॅरो कार्ड अभ्यासक, जयंती अलुरकर यांनी सांगितले की, २०२३ ते २०२५ ही वर्षे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूपच त्रासदायक आणि आर्थिक नुकसानीची सुद्धा आहेत. याकाळात एका मागून एक संकटे त्यांच्या दिशेने येताना दिसत आहेत. हीच वेळ आहे त्यांनी स्वतःला सावरायची. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही उक्ती लक्षात ठेऊन सर्व धुरा त्यांनी स्वतःच्याच हातात ठेवावी. हितशत्रू बरोबर ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे. कोणतीही गोष्ट अधिक ताणल्यास त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान संभवते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)