Vastu Shastra: घरातील ईडा-पिडा बाहेर जाऊदे.. बाहेरची लक्ष्मी घरात येउदे असे म्हणत जवळपास सर्वच घरात सकाळी व संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो. यामागील धार्मिक कारण जरी बाजूला ठेवलं तरी दिव्याच्या प्रकाशामुळे मनालाही प्रसन्न वाटतं, मानसिक शांतीसाठी दिव्यातील अग्नीची उब व प्रकाश फायद्याचा ठरतो. देवासमोर लावलेला दिवा किंवा निरंजन याबाबत अनेक समज- गैरसमज आहेत. यातील मुख्य प्रश्न म्हणजे समजा जर देवासमोरील निरंजन विझलं तर याचा वाईट प्रभाव होतो का? खरंतर अनेक चित्रपटात आपण असा प्रकार पाहिला असेल, एकीकडे निरंजन विझणं आणि चित्रपटाला हिरोने प्राण सोडणं यावरून सामान्यांनाही निरंजन अचानक विझणं खरंच अशुभ असतं का हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आज आपण यावर खरं उत्तर जाणून घेणार आहोत.
धार्मिक पुराणानुसार, पूजेच्या वेळी किंवा नंतर जेव्हा निरंजन विझते तेव्हा हे देवी देवतांच्या नाराजीचे संकेत मानले जातात. यामागे अनेक कारणं असू शकतात पण सर्वात मुख्य म्हणजे जर पूजेच्या वेळी आपले मन स्थिर नसेल किंवा मनात एखाद्याविषयी कलुषित भाव असतील तर अशाप्रकारे देवतांची नाराजी ओढवली जाऊ शकते.
अशावेळी दिवा विझणे हे अशुभाचे संकेत असतीलच असे नाही, उलट आपण आपल्या मानसिक स्थैर्याकडे लक्ष द्यायला हवे हे यातून समजते. पुराणात सांगितल्याप्रमाणे अशावेळी आपण मन शांत ठेवण्याचा निदान प्रयत्न करावा व हात जोडून आपण ज्या शक्तीवर विश्वास ठेवता त्याचे स्मरण करून क्षमा मागणे फायद्याचे ठरू शकते.
Vastu Shastra: पती पत्नीने एका ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी महाभारतात दिलेलं उत्तर पाहा
जर पूजेच्या वेळी तुमचे मन भरकटले असेल तरीही अशा प्रकारे दिवा विझू शकतो. शक्यतो निदान पूजेच्या वेळी मोबाईल किंवा टीव्ही सुरु ठेवू नका जेणेकरून जरी तुमच्या डोक्यात अन्य विचार येत असतील तरी बाहेरचा अडथळा तरी कमी होऊ शकतो.
अनेकदा दिवा विझण्यामागे प्रत्यक्ष समस्या सुद्धा कारण असू शकतात, म्हणजे देव्हाऱ्याच्या वरच अगदी पंखा असेल किंवा समोरच एसी असेल तर त्या वाऱ्यामुळे दिवा विझू शकतो. समजा जर दिव्यात तेल कमी असेल किंवा वात नवीन असेल आणि तेल नीट शोषून घेतले नसेल तर नीट तपासून पाहा. वरील माहितीनुसार दिवा विझण्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचे कारण नाही उलट तुम्हाला आंतरिक व बाह्य परिस्थिती एकदा तपासून घ्यायला हवी.
(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)