Vastu Tips For House: प्रत्येक घरात सहसा आरसा आणि घड्याळ असते. लोक या वस्तू आपल्या आवडीनुसार आणि जागा बघून घरातील भिंतींवर लावतात. पण, वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. कारण वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला महत्त्व आहे, त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये आरसा आणि घड्याळ चुकीच्या दिशेने लावले असेल तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो; याने तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोणत्या दिशेच्या भिंतीवर आरसा आणि घड्याळ लावले पाहिजे जाणून घेऊ…
वास्तूशास्त्रानुसार घरात घड्याळ अन् आरसा लावण्याची योग्य दिशा कोणती? (Mirror and Watch Placement Ss Per Vastu For Home And Office)
‘या’ दिशांना लावा आरसा
आरसा नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील या दोन दिशा आरसा लावण्यासाठी चांगल्या आहेत, कारण उत्तर दिशा ही धन-संपत्तीची दिशा मानली जाते. या दिशेला आरसा लावल्याने घरात शांती राहते आणि संपत्ती वाढते, असे मानले जाते.
‘या’ दिशेला चुकूनही लावू नका आरसा
घराच्या दक्षिण, पश्चिम आणि आग्नेय, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम कोपऱ्यातील भिंतींवर आरसा लावू नये. जर तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या या दिशेला आरसा लावला असेल तर तो तिथून लगेच काढून टाका, कारण ते अशुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते. तसेच वास्तुदोष होऊ शकतात, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
घराच्या ‘या’ दिशांना लावा घड्याळ
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावणे शुभ मानले जाते, कारण देव कुबेर उत्तर दिशेला राज्य करतो आणि सर्व देवांचा राजा पूर्व दिशेला असतो; यामुळे या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते. यासह नवे आर्थिक मार्ग तयार करण्यास मदत होते.
तुमच्या घरात घड्याळ दक्षिण दिशेला चुकूनही ठेवू नका किंवा भिंतीवर लावू नका, कारण ही दिशा यमाची दिशा मानली जाते. अशाने घरात आजार आणि आर्थिक संकट येऊ शकते. अनेक कामात अडथळा जाणवू शकतो.