Vat Savitri Vrat 2024 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे. यावर्षी २१ जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. पण, काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. चला मग जाणून घेऊ, यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आणि या व्रताचे महत्त्व….
वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते.
वट सावित्री व्रत २०२४ ची तारीख
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी – २१ जून रोजी सकाळी ७.३१ वाजता.
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती – २२ जून संध्याकाळी ०५.३७ वाजता.
वटपौर्णिमा व्रताची तारीख – २१ जून २०२४, शुक्रवार
वटपौर्णिमा व्रत २०२४ पूजेची शुभ वेळ
पूजेचा शुभ काळ- २१ जून रोजी सकाळी ०५.२४ ते १०.३० वाजेपर्यंत असेल.
वट सावित्री व्रत का साजरा केले जाते?
हिंदू पौराणिक कथेनुसार, या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानचे प्राण परत आणले होते, त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात.
वट सावित्री व्रताचे महत्त्व
वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात, यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते.