When is Narak Chaturdashi 2024: हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. भारतीयांसाठी दिवाळी हा सर्वांत आवडीचा आणि मोठा सण मानला जातो. दिवाळीत लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशीसह नरक चतुर्दशीचेही खूप खास महत्त्व आहे. या दिवशी पहिली अंघोळ म्हणजेच अभ्यंग स्नान केले जाते. यंदा ३१ ऑक्टोबर रोजी (आज) हा सण साजरा केला जाणार आहे.
नरक चतुर्दशी तिथी आणि शुभ मुहूर्त
पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथीची सुरुवात ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी होणार असून ३१ ऑक्टोबर दुपारी २ वाजून ५३ मिनिटांपर्यंत समाप्त होईल. उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
अभ्यंग स्नान: उदय तिथीनुसार दिवाळीची पहिली अंघोळ (अभ्यंग स्नान) करण्याचा शुभ मुहूर्त ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांपासून ते ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच भारतातील अनेक राज्यांमध्ये या दिवशी अभ्यंग स्नान करून पायाच्या डाव्या अंगठ्याने कारीट चिरडले जाते. कारीट हे कडू फळ नरकासुरास मारण्याचे प्रतीक मानले जाते.
नरक चतुर्दशीची कथा
पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असे म्हटले जाते की, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याच्या तावडीतून १६ हजार स्त्रियांना मुक्त केले होते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी असते. मात्र, यंदा नरक चतुर्दशी तिसऱ्या दिवशी असणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd