Next Kumbh Mela: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ४५ दिवसांचा भव्य महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला. जगातील हा सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा होता. २६ फेब्रुवारी रोजी या महाकुंभ मेळाची सांगता झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांनी महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा महासोहळा यशस्वीपणे पडला, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या ४५ दिवसांमध्ये ६६ कोटी पर्यटकांनी महाकुंभासाठी प्रयागराजला भेट दिल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी केला. आता सर्वांना पुढील कुंभमेळ्याची उत्सुकता लागली आहे. यानंतर कधी कुंभमेळा पार पडणार आणि कुठे आयोजित करण्यात येणार, याविषयी जाणून घ्यायला लोक उत्सुक आहेत. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

पुढील कुंभमेळा कधी आणि कुठे आहे?

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पुढील कुंभमेळा आयोजित करण्यात येणार आहे. १७ जुलै ते १७ ऑगस्ट २०२७ या कालावधीत हा कुंभमेळा पार पडणार आहे. नाशिकपासून जवळपास ३७ किमीवर असलेल्या पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर येथे हा कुंभ पार पडणार आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू-महंतांच्या निवासासाठी गोदावरी नदीच्या काठावर साधुग्राम नगरी वसविण्यात येणार आहे.

कुंभमेळामागील पौराणिक कथा

संस्कृत भाषेक कुंभ या शब्दाचा अर्थ घडा असा होतो. पौराणिक कथेत म्हटल्याप्रमाणे, देवता आणि असुरांनी समुद्रमंथन केलं. तेव्हा धन्वंतरी अमृताने भरलेला घडा घेऊन प्रकट झाले. असुरांच्या हातात अमृत जाऊ नये, म्हणून इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला. त्याला आणि घड्याला वाचवण्यासाठी सूर्य, त्याचा पुत्र शनी, बृहस्पती (ग्रह गुरु) आणि चंद्र यांनी त्याला साथ दिली. जयंत अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी अमृत सांडलं. जयंत १२ दिवस पळत होता आणि देवतांचा एक दिवस म्हणजे मानवांच्या १२ वर्षांसारखा मानला जातो. त्यामुळे कुंभमेळा सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या सापेक्ष स्थितीनुसार दर १२ वर्षांनी या ठिकाणी साजरा केला जातो.

प्रयागराज आणि हरिद्वार येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो. १२ वर्षांनी साजरा होणारा उत्सव पूर्णकुंभ किंवा महाकुंभ म्हणून ओळखला जातो. ही चारही ठिकाणं नद्यांच्या काठावर वसलेली आहेत. हरिद्वारला गंगा, प्रयागराजला गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचा संगम, उज्जैनला क्षिप्रा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी आहे. असं मानलं जातं की, कुंभमेळ्याच्या काळात, ग्रह-ताऱ्यांच्या विशिष्ट स्थितीत या नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते.