Bornahan Significance: नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत, हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. तिळगूळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकूचा कार्यक्रम त्यासाठी वाण देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. याबरोबर आणखी एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते, ते म्हणजे बोरन्हाण. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. पण यामागे कारण काय असते हे काही जणांना माहित नसते. बोरन्हाण का केले जाते आणि ते कसे करावे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोरन्हाण का केले जाते?

बोरन्हान का करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले, त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते.

या पद्धतीने बोरन्हाण करण्यामागे शास्त्र आहे ते असं की, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात. लहान मुलं इतरवेळी ती फळं दिली तर खात नाहीत. पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले जाते.

आणखी वाचा: मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन का करतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

बोरन्हाण कसे करावे?

१ ते ५ वर्षांच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते. पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. एकप्रकारे बाळाला या पदार्थांनी अंघोळ घातली जाते. 

त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाचे तुकडे, शेंगा उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत. बोरन्हाण मध्ये वापरण्यात येणारी फळं मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो.

आणखी वाचा: १४ की १५ जानेवारी? मकर संक्रांत कधी व कोणत्या रूपात येणार? काय केल्यास लाभते पुण्य? उल्हास गुप्तेंकडून जाणून घ्या

याला काही भागात बोरलुट असेही म्हणतात. यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे. अन् त्या त्या ऋतुत येणार्‍या फळांना चाखण्याची सवय ही बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा, बोरन्हाण ही त्याचीच प्रतीक आहेत. बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. बाळ सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेले म्हणजेच सर्वांचे लाडके होउ दे, अशा भावनेने केलेला हा एक संस्कारच होय.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bornahan is celebrated during makar sankrant know reason behind it and its method pns