माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला येणारी शिवरात्री ‘महाशिवरात्री’ म्हणून साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ‘शिवरात्री’ म्हणतात. दरवर्षी सुमारे १२ शिवरात्री वर्षात येतात, या बारा शिवरात्रींमध्ये येणारी महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शंकराने या दिवशी तिला पत्नी म्हणून स्वीकारले, असे सांगितले जाते. वैदिक पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री मंगळवार, १ मार्च रोजी पहाटे ३ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल आणि चतुर्दशी तिथी २ मार्च, बुधवारी सकाळी १० वाजता समाप्त होईल. भारतातील हिंदू धर्माशी संबंधित लोक हा सण मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करतात आणि विशेषत: या दिवशी भगवान भोलेनाथची पूजा करतात. शिवभक्त या दिवशी उपवास करतात. असे मानले जाते की जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांना भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो.
महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो. महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत असेल. रात्रीची पूजा संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी ते रात्री १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत चालणार आहे. शिवरात्रीच्या रात्री चार पहर पूजा केली जाते.
Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला होणाऱ्या रुद्राभिषेकाचं महत्त्व आणि प्रकार जाणून घ्या
महाशिवरात्री चार प्रहर पूजाविधी वेळ
- पहिला प्रहर: १ मार्च २०२२ संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून रात्री ९ वाजून २७ मिनिटांपर्यंत
- दुसरा प्रहर: १ मार्च २०२२ रात्री ९ वाजून २७ मिनिटे ते १२ वाजून ३३ मिनिटे
- तिसरा प्रहर: १ मार्च रात्री १२ वाजून ३३ मिनिटे ते पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे
- चौथा प्रहर: २ मार्च पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे ते सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे
- व्रताची शुभ मुहूर्त: २ मार्च २०२२, बुधवार संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील