-जयंती अलूरकर

Maha Shivratri 2023: महाशिवरात्र हा सण संपूर्ण भारतात आनंदाने आणि उत्साहात साजरा होतो. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची उपासना केली जाते. काही ठिकाणी कडक उपास केला जातो. काही ठिकाणी एकाच वेळेला अन्नग्रहण केले जाते, तर काही ठिकाणी दीड दिवसाचा उपास केला जातो. कोणी पंचामृताने, कोणी दुधाने तर कोणी पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करतात. शिवाला बेल आणि धोत्र्याची फुले वाहिली जातात. काही ठिकाणी महिला दिवस उपास करून रात्री जागरण करून शिवाची आराधना करतात, त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कोणतीही बाधा येत नाही आणि पतीस दीर्घायुष्य मिळते असा यामागची श्रद्धा. काही ठिकाणी असेही म्हणतात की सांबसदाशिव ह्या दिवशी शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. तसेच, ह्याच दिवशी शिव-पार्वती ह्यांचा विवाह सुद्धा झाला होता. म्हणूनच महाशिवरात्रीस विशेष महत्त्व आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशीही महती आहे की ह्या दिवशी शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरते त्यामुळे शरीरात ऊर्जारूपाने शिवाचे हे तत्त्व आपल्याला मिळावे म्हणून जागरण केले जाते. आदीशन्कराचार्य म्हणतात “शिवोहं शिवोहं, शिव: केवलोहं”, अर्थात, शिव हाच कल्याणकारी, शिव हाच सृष्टीचा नियोजनकर्ता, आणि शिव हाच “एकमेवाद्वितीयोसी”. म्हणजेच, शिवपिंडीची फक्त पूजा आणि अभिषेक न करता, शिव हे तत्त्व आत्मसात करण्याचा उत्तम आणि मंगल दिवस म्हणजे महाशिवरात्री.

शिव हा सर्वांचे कल्याण करण्यास सांगतो- “मी आणि माझे” हा भाव सोडून देऊन, “आपण आणि आपले” हे भाव जागृत झाला पाहिजे. शिव नियोजन करतो म्हणजे ह्या सृष्टीतील चराचरात तो आहे. व त्यांची लय राखण्याची जबाबदारी शिव तत्त्वाने घेतलेली आहे. आपण मनुष्यजन्म घेतला असल्याने आपल्या सांसारिक, सामाजिक, धार्मिक, पारंपरिक, आर्थिक जबाबदाऱ्या माणसाने स्वतःच उचलाव्यात असे हे तत्त्व सांगते.

शिवरात्रीच्या कहाणीच्या रूपात तुम्ही पारधी आणि हरणाची कथा खूप वेळा ऐकलेली असेलच. पारधी जेव्हा हरणाची शिकार करायला येतो तेव्हा हरीण त्याकडे थोडा वेळ मागते. काही वेळाने हरीण परत येऊन पारध्यास सांगते की तू आता मला मारू शकतोस कारण पति आणि वडील म्हणून असलेल्या माझ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करून आलेलो आहे. त्यावेळेला हरीणपत्नी पुढे येऊन म्हणते की मला मारा म्हणजे मला माझ्या पत्नीधर्माचे पालन करता येईल. त्याच वेळेला हरणाची ३ पाडसं सुद्धा तिथे येऊन म्हणतात की आमच्यावर मातृ-पितृ ऋण आहे, आम्हाला आमची मुलं म्हणून आमची जबाबदारी पार पाडू दे, तरी तुम्ही आमचाच जीव घ्या. हे पाहून पारधी गहिंवरतो आणि म्हणतो की माझेच काहीतरी चुकत आहे.

जर हे सर्व मात्र प्राणी असून ही आपापल्या जबाबदाऱ्या घेत आहेत तर मनुष्यधर्माचे पालन करून, मी ही ह्यांची शिकार करणार नाही, व त्यांना जीवदान देतो. हा सर्व प्रकार बेलाच्या झाडाखाली असणाऱ्या शिवपिंडीजवळ घडतो, तेव्हा शिवाने प्रसन्न होऊन हरणाला मृगनक्षत्र आणि पारध्याला व्याधनक्षत्र ह्या रूपाने अढळस्थान दिले आहे. त्यामुळे मनुष्याने आपल्या धर्माचे पालन करत राहून, सर्व जबाबदाऱ्या पेलण्यास सज्ज रहावे. शिवतत्त्व म्हणजे कल्याणकारी नियोजन हे लक्षात ठेवा.

“धारणा इति धर्म:”

शिवाने विष प्राशन केल्याने त्याला नीलकंठ हे नाम प्राप्त झाले हे सर्वश्रुत आहेच. पण हे विष म्हणजे तुम्ही आम्ही समजतो ते सापा-नागाचे नसून, ते अनेक धारणांचे प्रतीक आहे.

“मी अनादि आहे”, “मी अनंत आहे”, “मी अपार-अपरंपार आहे”, “मी अथांग आहे”, “मी अपूर्व आहे”, “मी अमूर्त आहे”, “मी अव्यक्त आहे”, “मी नित्य आहे”, “मी नित्यनवीन आहे”, “मी निर्गुण निराकार आहे”, “मी निरवयव आहे”, “मी निर्लेप आहे”, “मी निःसंग आहे”, “मी सर्वव्यापी आहे”, “मी सर्व अंतर्यामी आहे”, “मी सर्वदूर पसरलेलो आहे”, “मी सर्व चराचराला व्यापून उरलेलो आहे”, “मी सत-चित-आनंद-घन आहे”, “मीच आहे आनंदस्वरूप”, “मीच आहे तो परमात्मा”..

हे ही वाचा<< तब्बल ३० वर्षांनी ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत बनले मोठे राजयोग; शनी- शुक्र एकत्र बक्कळ धनलाभासह देतील श्रीमंती?

सर्वच धारणा शिवतत्त्वात लीन आहेत. ह्यांचा सुयोग्य वापर केल्यास ह्या अमृत बनून माणसाची सर्वार्थाने उन्नती करतील, प्रगती करतील, त्याचा उद्धार करतील, पण ह्यांचा अतिरेक झाल्यास किंवा दुरुपयोग केल्यास ह्याच विष बनून मनुष्याचा सर्वनाश करतील. शिवतत्त्व हे ह्या सर्वांना नियंत्रित ठेवते. आणि म्हणूनच ह्या महाशिवरात्री पासून पूजा आणि उपवासा बरोबरच आपण ह्या शिवतत्त्वास अंगिकारायचा प्रयत्न करूया.
।। ओम नमः शिवाय ।।