देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. आज म्हणजेच २५ मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. लखनौच्या एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असं असताना शपथविधीसाठी आजचा दिवस का निवडला यासाठी ज्योतिष जाणकारांमध्ये खलबतं सुरु झाली आहे. ज्योतिषांच्या मते, शपथविधीसाठी २५ मार्च ही तारीख निवडण्यामागे एक विशेष कारण आहे.
१४ मार्चपासून सूर्य ग्रह मीन राशीत असल्याने खरमास सुरू आहे. हा खरमास १४ एप्रिलपर्यंत राहील. खरमासमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. यादरम्यान घरबांधणी, मुंडन, विवाह असे कोणतेही संस्कार कार्य करत नाही अशी मान्यता आहे. पण या सर्व प्रतिकूल योगांमध्ये एक शुभ योगही तयार होत आहे. २४ मार्च रोजी बुध मीन राशीत आल्याने बुधादित्य योग तयार झाला आहे. याला ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हणून संबोधलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि सूर्याचा संयोग बुद्धिमत्ता आणि कौशल्याने सत्ता चालवण्याचे शक्ति प्रदान करतो. खरमास असूनही हा योग शुभ मानला गेला आहे. तर होळीपूर्वी शपथ न घेण्यामागे होलाष्टक असण्याचे कारण सांगण्यात आलं होतं.
नक्षत्राबद्दल बोलायचे झाले तर, २५ तारखेला नक्षत्र खूप चांगले आहे आणि या दिवशी स्थिर योग तयार होत आहे. ज्या दरम्यान केलेले कोणतेही काम स्थिर असते, अशी मान्यता आहे. या दिवशी मूळ नक्षत्र अष्टमी तिथी आहे ज्याला शीतला अष्टमी असेही म्हणतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, अशा वेळी जे काम हाती घेतलं जातं, त्यात कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे२५ तारखेला योगी आदित्यनाथ आपल्या मंत्रिमंडळासह शपथ घेणार आहेत. २०२४ मध्ये केतूच्या महादशानंतर शुक्राची महादशा सुरु होणार आहे. हा काळ योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ असेल.