-जयंती अलूरकर
Working Women Yearly Horoscope: वर्किंग वुमन अर्थात नोकरदार किंवा कष्टकरी महिलांना घर आणि नोकरी अशा दोन्ही आघाड्या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे कधी ओढाताण तर कधी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. म्हणूनच त्यांचा भार हलका करण्यासाठी आणि वाटचालीत नेमकी कशाची काळजी घ्यायची हे त्यांना कळावे यासाठी आम्ही टॅरो कार्डनुसार त्यांचे राशीभविष्य काय असेल ते सांगत आहोत.
मेष (Aries Zodiac)
नोकरदार महिलांनी यार्षी आपल्या रागावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कामाचा भार वाढणार आहे. प्रमोशन किंवा बढती साठी आणखी थोडा वेळ आहे. घाईघाईत उतावीळ होऊन केलेली कामे बिघडण्याचीच शक्यता अधिक आहे. शांत राहून कामावर लक्ष केंद्रित करा. गोष्टी पूर्ण समजून घेऊन नंतरच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करा. सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी वागताना तारतम्य ठेवा. आर्थिक बाजू चांगली राहील.
वृषभ (Taurus Zodiac)
व्यवसाय व नोकरी करणाऱ्या बायकांना घसघशीत यश मिळणार आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे सर्वत्र कौतुक होईल, आर्थिक भरभराट होईल. दूरदृष्टी, चिकाटी, कष्ट व कामावरचे लक्ष्य ढळू देऊ नका किंबहुना वाढवा. मात्र मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका.
मिथुन (Gemini Zodiac)
आपल्या वागण्या-बोलण्याचा ठसा इतरांवर पडत असल्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या. कोणालाही दुखवू नका, अपमानित करू नका. यशाच्या शिखरावर जाण्याकरता चुकीचा मार्ग निवडू नका, अन्यथा बदनामी संभवते. परदेशात नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल, तर ती सुसंधी वर्षाच्या अखेरीस आहे. तोपर्यंत दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कर्क (Cancer Zodiac)
ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्याबद्दल दुःख करत बसण्यात काहीच अर्थ नाही. सगळं झटकून कमला लागा. स्वतःवर विश्वास ठेवा. नव्या व्यक्ती आयुष्यात येणार आहेत. भूतकाळ विसरून वर्तमानात जगा. नवीन नोकरी-व्यवसाय करायचा असल्यास परिश्रम करायला लागतील. कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी मिळून-मिसळून राहा. पैश्यांची काळजी नसावी, तो मिळत राहील. डोकेदुखी वर औषधोपचार वेळेतच करा.
सिंह (Leo Zodiac)
तुमच्यावर कामाचा ताण वाढतो आहे. लोकांच्या कामाचं ओझं स्वतःच्या डोक्यावर ओढवून घेऊ नका. त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरच नाही तर कामावर सुद्धा होतोय. “मी बरा, माझं काम बरं” हा दृष्टिकोन ठेवा. कामात एकसुरीपणा आल्यामुळे कंटाळवाणे होत आहे. थोडा धीर धारा. आत्मपरीक्षणाची गरज आहे- कामातल्या चुका लक्षात येतील आणि यश मिळेल.
कन्या (Virgo Zodiac)
आतापर्यंत केलेल्या कामाचे चीज होणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. वेळ घालवला तर नुकसान होईल. जुन्या गुंतवणुकीतून आणि आधी केलेल्या कामातून धनलाभ. कृतीशून्य होऊ नका- कामावर लक्ष केंद्रित करा. यश हाताशी आहे. घरात आणि कामात तुमचं दुर्लक्ष होत आहे. कंबरदुखीचा त्रास होईल.
तूळ (Libra Zodiac)
यावर्षी सगळीकडे समतोल राखणे गरजेचे आहे. अपेक्षित असलेले प्रमोशन वा बढती थोडी पुढे-मागे होईल, पण मिळेल नक्की. कामाच्या ताणामुळे तब्येत बिघडू देऊ नका. थोडीशी तगमग वाढली आहे कारण घर आणि काम दोन्हीकडे नव्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या आहेत. त्यासाठी शारीरिक आणि भावनिकरीत्या सक्षम होणे गरजेचे आहे. वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे हाताखालच्या व्यक्तींकडून गोड बोलून काम काढून घ्यावे लागेल. आर्थिक लाभ समाधानकारक राहील.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
नवीन करिअर निवडण्यासाठी उत्तम काळ. तुम्ही जे शिकला आहात त्यातच तुमचे करिअर होताना दिसत आहे. भरपूर पैसा, पद आणि प्रसिद्धी मिळतील. यावर्षी कामानिमित्त परदेशवाऱ्या वाढतील, ज्याचा कालावधी ३ महिने ते १ वर्षापर्यंत राहील. नव्या ठिकाणी नव्या कामांचा अनुभव तुम्हाला सर्व दृष्टीने समृद्ध करेल.
धनु (Sagittarius Zodiac)
हे वर्ष आयुष्यात जणूकाही जादूची कांडी फिरावी इतके सुंदर जाणार आहे. हात घालाल त्यात यश मिळवाल पण ते यश सांघिक असेल हे विसरू नका. आर्थिक आणि भावनिक स्थैर्य मिळेल. घरात आणि कामाच्या ठिकाणी खेळीमेळीचे वातावरण असेल. आवडत्या विषयांवर भरपूर वाचन होईल. मैत्रिणींबरोबर सहलीला जाल. मिळणाऱ्या यशाने हुरळून जाउ नका. कामाच्या ठिकाणी सर्वांना सांभाळून घेत पुढे जाल.
मकर (Capricorn Zodiac)
हा काळ खडतर आणि परिश्रमाचा आहे. पूर्ण वर्षभर तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. बुद्धी आणि परिश्रम यांची सुंदर सांगड घाला. घरात मात्र फार वेळ देता येणार आहे- तिथे तणावाचे वातावरण राहील. यातच किशोरवयीन मुलांचे प्रश्न समोर उभे राहतील. संयमपूर्वक आणि शांततेने ते सोडवा. त्रागा करून घेऊन तुमचीच तब्येत बिघडेल. पैसा समाधानकारक मिळेल.
कुंभ (Aquarius Zodiac)
तुम्ही कामावर अत्यंत फोकस्ड आहेत. कामाची व्याप्ती वेगाने वाढत आहे. नवनवीन यशाची शिखरे गाठताना गुणवत्तेचाही विचार होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती विशेष चमकतील. वकील, डॉक्टर यांच्या करता हा काळ भरभराटीचा असेल. तुमच्यातील विशेष चुणुकीमुळे तुम्ही सगळ्यांच्या लक्षात राहाल. यश आणि पैसा भरपूर मिळेल.
मीन (Pisces Zodiac)
कोणतेही काम हातात घेताना त्याची व्यवस्थित माहिती करून घ्या. अर्धवट माहिती आणि अतिउत्साह ह्यांच्यामुळे कामाचे नियोजन आणि गुणवत्ता दोन्ही चुकण्याची शक्यता आहे. मित्र आणि शत्रू ह्यांच्यातील फरक ओळखा. आपली भिस्त दुसऱ्यावर ठेऊन कामे करण्याचा मोह टाळा नाहीतर संकटात सापडाल. आर्थिक बाजू ठीक-ठीक राहील.