साप्ताहिक राशिभविष्य

aries
मेष( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मेष : मंगल कार्य घडेल

दिनांक २९, ३० हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत. म्हणजे या दिवसांत तुमची मानसिकता ही नकारात्मक असू शकते. कोणत्याही गोष्टीत माझेच खरे, मीच बरोबर अशी भूमिका राहील, त्यामुळे समोरच्याला हे पटणारे नसेल. त्यामुळे वादविवाद वाढू शकतात. तेव्हा या दोन दिवसांत कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. स्वत:चे काम स्वत: करा. दिनांक २८ रोजी वसुबारसेचा दिवस अतिशय आनंदाचा असेल.

धनत्रयोदशी दिवशी मात्र सतर्क राहा. लक्ष्मी कुबेर पूजन अगदी आनंदात साजरे कराल. दिवाळी पाडव्याला नवीन गोष्टींचा शुभारंभ होईल. व्यवसायात प्रगती होईल.

खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करा. मित्र-मैत्रिणींशी मनोरंजन होईल. घरामध्ये मंगल कार्य घडेल. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील.

प्रकृती साथ देईल.

शुभ दिनांक : २७, २८

महिलांसाठी : खरेदीचे स्वप्न पूर्ण करताना दूरदृष्टी ठेवा.

taurus
वृषभ( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

वृषभ : श्रमाचे फळ मिळेल

दिनांक ३१ ऑक्टोबर व १, २ नोव्हेंबर या तीन दिवसांचा कालावधी धावपळीचा राहणार आहे. कारण या दिवसांत बाकी राहिलेली कामे करायला वेळच पुरणार नाही इतका कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे तुम्हाला दुसरी कामे करायलाही वेळ मिळणार नाही आणि याच दिवसांत न झेपणारी जबाबदारीसुद्धा पूर्ण करावी लागेल. परिणामी या दिवसांत तुम्हाला थोडासा थकवा जाणवेल. थोडीशी विश्रांती घेतली तर त्रास कमी होईल. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल.

या कालावधीत श्रमाचे फळ मिळेल.

वसुबारसेला तुम्ही ठरवलेल्या कल्पना पूर्ण होतील. धनत्रयोदशी हा तुमच्यासाठी धन देणारा दिवस असेल. लक्ष्मी कुबेर पूजन या दिवशी मात्र संयम ठेवून करा. पाडव्याचा दिवसही चांगला जाईल असाच प्रयत्न करा.

व्यावसायिक लाभ होईल.

आर्थिकदृष्ट्या व्यवहार जपून करा.

घरगुती वातावरण चांगले राहील.

आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : गुंतवणूक फायद्याची ठरेल.

gemini
मिथुन( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मिथुन : उत्साह वाढेल

सध्या सगळे दिवस चांगले आहेत. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. प्रगतीचे शिखर इतरांच्या मदतीशिवाय स्वत:च्या हिमतीवर गाठू शकाल. हे सणासुदीचे सर्व दिवस आनंदात जाणार आहेत, त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. वसुबारस हा सर्वांसोबत आनंदाने साजरा कराल. धनत्रयोदशी दिवशी तुम्ही केलेल्या कामाचे फळ मिळेल. लक्ष्मी कुबेर पूजन अगदी जल्लोषात साजरे कराल. मग आहेत की नाही सर्व दिवस चांगले. व्यवसाय वाढीसाठी केलेली जाहिरात फायद्याची ठरेल. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गाला दिवस चांगले असतील. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. मित्रमंडळींशी संपर्क साधाल. संतती सौख्य लाभेल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांना मदत कराल.

आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : १, २

महिलांसाठी : कामात यश मिळेल.

Cancer
कर्क( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

कर्क : पारडे जड होईल

सप्ताहातील सर्व दिवस अनुकूल आहेत. आता कोणता संघर्ष करावा लागणार नाही हे मात्र तितके सत्य आहे. जे तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे. सध्या कोणतेही काम काढा ते काम पूर्णत्वाला जाणार. इतरांची मदत वेळेत मिळणार. त्यामुळे तुमचाही कामातील उत्साह टिकून राहील. वसुबारस धनस्थानातून होत आहे. धनत्रयोदशी पराक्रमाची आहे असे म्हणायला हरकत नाही. लक्ष्मी कुबेर पूजन घरातील सर्वांसोबत अगदी उत्साहाने साजरे कराल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या पारडे जड होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल.

आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

शुभ दिनांक : २८, २९

महिलांसाठी : सणासुदीचे दिवस आनंदाचे राहतील.

leo
सिंह( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

सिंह : वैवाहिक जीवन सुखाचे

शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. बऱ्याच दिवसापासून तुमच्या मनामध्ये जी गोष्ट घोळत होती ती गोष्ट प्रत्यक्ष स्वप्न रूपात पूर्ण होते की काय असेच वाटेल आणि तुमचे इच्छित स्वप्न पूर्ण होईल. आतापर्यंत त्या गोष्टीसाठी संघर्ष जरी केला असला तरी तो संघर्ष तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत कितीही त्रास झाला तरी हे यश मिळाल्यानंतर तुम्ही आनंदाने हुरळून जाल. वसुबारस तुमच्या राशीतूनच होत आहे. हा दिवस चांगला राहील. धनत्रयोदशी तुमच्या धनस्थानातून होत आहे. हा दिवस धनदायक असेल. लक्ष्मीपूजन कुबेर पूजन पराक्रमाचे असेल. तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन दालनाची सुरुवात कराल. व्यावसायिक वाढ होईल. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवन सुखाचे असेल. आरोग्य चांगले राहील.

शुभ दिनांक :२७, २८

महिलांसाठी : यशस्वी वाटचाल राहील.

gemini
कन्या( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

कन्या : परंपरा जपाल

दिनांक २७, २८ हे दोन दिवस जास्ती वेळ काढून काम करावे लागेल. म्हणजेच कमी वेळेत कामाचा जास्त ताण असेल आणि तो तुम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा पूर्ण करत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचा त्रास होईल. तेव्हा परिस्थिती कशीही असो ती सावरण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत संयम हवा. हा कायमस्वरूपीचा नाही, मात्र या दोन दिवसांत तरी ठेवा. बाकी दिवस उत्तम असतील. वसुबारस हा दिवस धावपळीचा असेल. धनत्रयोदशी दिवस उत्तम असेल. लक्ष्मी कुबेर पूजन धनस्थानातून होत आहे. पाडव्याच्या औचित्य साधून खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. सणासुदीच्या दिवसात परंपरा जोपासायला मागे पडणार नाही. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनाल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहाल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य ठीक राहील.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : अनावश्यक गुंतवणूक करणे टाळा.

libra
तूळ( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

तूळ : वायफळ खर्च टाळा

दिनांक २९, ३० या दोन दिवसांत जे जमणार आहे त्याच गोष्टी करा. ज्या गोष्टींचा ताण येणार आहे. अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या आणि ती जबाबदारी घेऊ नका. इतराने तुम्हाला मदत करावी ही अपेक्षा या दिवसांत तरी करू नका, त्यामुळे त्रास होणार नाही. नियोजन केल्यास या दिवसांत त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. वसुबारस दिवस हा लाभदायक असेल. धनत्रयोदशी दिवशी वायफळ खर्च टाळा. लक्ष्मी कुबेर पूजन तुमच्या राशीतूनच होत आहे. हा दिवस अगदी आनंदाचा असेल. पाडवा हा जणू तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन आला आहे असेच वाटेल. हे सणासुदीचे दिवस आनंदाचे असतील. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. घरगुती वातावरण चांगले राहील. प्रकृती साथ देईल.

शुभ दिनांक : २७, १

महिलांसाठी : महत्त्वाची जबाबदारी इतरांवर टाकू नका.

soc
वृश्‍चिक( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

वृश्चिक : कामात व्यस्त राहा

दिनांक ३१ ऑक्टोबर व दिनांक १ व २ नोव्हेंबर असे हे तीन दिवस चढउताराचे राहणार आहेत. म्हणजेच या दिवसांत सतर्क राहून काम केले पाहिजे आणि आपल्या ज्या गोष्टीशी संबंध नाही अशा गोष्टी अंगलट ओढून घेऊ नका. इतरांनी काय करावे आणि काय करू नये याचा विचार करत बसू नका किंवा ते कोणासमोर स्पष्ट बोलू नका. या दिवसांत कामात व्यस्त राहा. म्हणजे नुकसान होणार नाही. वसुबारस हा दिवस चांगला असेल. धनत्रयोदशी लाभस्थानातून होत आहे. लक्ष्मी कुबेर पूजन व पाडवा आनंदाने कसा साजरा करता येईल एवढेच पाहा. बाकी न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात आवकजावक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्वांशी प्रेमाने वागा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : कोणालाही वचन देऊ नका.

Sagi
धनु( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

धनू : लक्ष्मी प्रसन्न होईल

भाग्य स्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. भाग्य स्थान म्हटले की ऐकायलाही बरे वाटते ना! हो असेच आहे. ही दिवाळी भाग्योदय करणारी असेल. अगदी मनासारख्या गोष्टी घडतील. तुमचा उत्साह टिकून राहील. वसुबारस हा दिवस शुभ गोष्टींची सुरुवात करणार असेल. धनत्रयोदशी दिवशी सामूहिक गोष्टींमध्ये सहभाग राहील. लक्ष्मी कुबेर पूजन लाभस्थानातून होत आहे. लक्ष्मी प्रसन्न राहील. असे म्हणायला हरकत नाही. पाडवा हा एक सुखाचा क्षण आहे याचा अनुभव येईल. अगदी सर्व दिवस मजेत जातील. व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक लाभ होईल. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल.

आरोग्य ठणठणीत राहील.

शुभ दिनांक : २७, १

महिलांसाठी : तुम्ही तुमच्या स्वप्नरंजनात रमून जाल.

capri
मकर( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मकर : अपेक्षित लाभ होईल

दिनांक २७, २८ या दोन दिवसांत विनाकारण भटकंती करणे टाळा. कारण कोणतेही नियोजन नसताना काम करणे आणि त्रास करून घेणे हे या दोन दिवसाचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजन करा. नियोजन केल्याने कामात अडथळे येणार नाही. शिवाय या दोन दिवसांत समोरच्याचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. म्हणजे हे दिवस चांगले जातील. वसुबारस दिवशी संयम ठेवा. धनत्रयोदशी तुमच्या भाग्यस्थानातून होत आहे. लक्ष्मी कुबेर पूजन कुटुंबासमवेत साजरे कराल. पाडवा आनंदाचा असेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी घ्यावी लागेल.

आर्थिक ताणतणाव कमी होईल.

धार्मिक गोष्टींची आवड राहील.

आरोग्य उत्तम असेल.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : विचार करून कृती करा.

Aqua
कुंभ( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

कुंभ :आहार सांभाळा

दिनांक २९, ३० हे दोन दिवस चांगले कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांत नको तो व्याप मागे लागू शकतो. कोणतेही काम करायला जाल तर या दिवसांत अडथळाच येणार असा हा दोन दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे या कालावधीत तुमची चिडचिड होऊ शकते आणि तुम्ही समोरच्याला समजून न घेता स्पष्ट बोलल्यामुळे वातावरण बिघडू शकते. त्यामुळे शांत राहून काम करायचे आहे हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. वसुबारस हा दिवस चांगला राहील. धनत्रयोदशी दिवशी मनात राग न धरता सण साजरा करा. लक्ष्मी कुबेर पूजन भाग्यस्थानातून होत आहे. पाडवाही शुभ असेल. व्यवसायातील फायद्याचे प्रमाण चांगले राहील.

आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल.

कुटुंबाशी हे कनिष्ठ राहा.

आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : १, २

महिलांसाठी : स्वत:वर नियंत्रण ठेवा.

pices
मीन( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मीन : संयम ठेवा

षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण म्हणजे जपूनच पाऊल उचलावे लागते. म्हणजेच मनात आले म्हणून केले असे करून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागेल. काही वेळेस नियोजन करूनही त्या नियोजनानुसार काम होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे महत्त्वाचे काम पुढे ढकललेले केव्हाही चांगले. सध्या एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. वसुबारस हा दिवस धावपळीचा राहील. धनत्रयोदशी हा दिवस तेवढा चांगला राहील. लक्ष्मी कुबेर पूजन व पाडवा आनंदाने साजरा करा. मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले कसे राहील. याकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : इतरांनी काय करायचे आहे यापेक्षा स्वत: बदल करायचे आहेत हे लक्षात ठेवा.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या