डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतीय संविधानच्या मसुदा समितीचे अध्यक्ष’ या एकेकाळच्या पदनामावरून ओळखलं जाण्याऐवजी त्यांना ‘घटनाकार’ म्हणणं हे आर्ष अभ्यासकी दृष्टिकोनातूनही कसं उचित आहे, हे अलीकडेच ‘आंबेडकर्स प्रिअ‍ॅम्बल’ या पुस्तकानं सप्रमाण दाखवून दिलं. आपल्या राज्यघटनेतील प्रत्येक मूल्याची चर्चा डॉ. आंबेडकरांमुळे कशी पूर्णत्वाला गेली आणि या मूल्यांचा उद्घोष अखेर घटनेच्या सरनाम्यात किंवा प्रास्ताविकेत (प्रिअ‍ॅम्बलमध्ये) कसा झाला, याचा ऐतिहासिक आणि तत्त्वचर्चात्मक धांडोळा घेणारं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक आकाशसिंग राठोड हे खरोखरच बहुपेडी व्यक्तिमत्त्व. त्यांची याआधीची पुस्तकं प्लेटो, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्याहीबद्दल आहेत आणि त्यांच्या नावावर असलेल्या सुमारे दहा पुस्तकांपैकी चार ही ‘न्याय’ या संकल्पनेचा अभ्यास करणारी आहेत. मानवी हक्क हाही याच न्यायकल्पनेचा भाग. न्याय ही संकल्पना केवळ कोर्टकचेऱ्या आणि कायदे यांपुरती अर्थातच नाही. खासगी जीवनात ‘नीतिमत्ते’चं जे स्थान ते सार्वजनिक जीवनात न्यायविचाराचं. हा विचार डॉ. आंबेडकर यांनी कसकसा केला होता, कशा प्रकारे मांडला होता याची चिकित्सा करणाऱ्या (म्हणजे गोडवे गाणाऱ्या नव्हे, संदर्भासह उणिवाही दाखवून देणाऱ्या) पाच खंडांच्या संपादनाची जबाबदारी या राठोड यांनी स्वीकारली आहे. ‘बी. आर. आंबेडकर : द क्वेस्ट फॉर जस्टिस’ अशा नावाच्या या पाच खंडांचे प्रकाशक आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस! या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची भारतीय शाखा ही एरवीदेखील भारतविषयक पुस्तकं प्रकाशित करत असतेच.. पण हे पाच खंड भारतीय शाखेतर्फे नव्हे; तर ‘ओयूपी ग्लोबल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य शाखेकडून प्रकाशित होणार आहेत. पाचही खंडांची मिळून पृष्ठसंख्या आहे १४६५!

राजकीय न्याय, सामाजिक न्याय, वैधानिक आणि आर्थिक न्याय, लिंगभावविषयक न्याय आणि वंश/वर्णभेदविषयक न्याय, धर्मविषयक न्याय आणि संस्कृतीविषयक न्याय असे एकंदर आठ विषय येतील. म्हणून हे न्यायअष्टक. पण न्यायविचार हा अन्य चिंतनापासून निराळा काढता येत नाही, याची जाण हा ग्रंथप्रकल्प ठेवतो. त्यामुळेच ही न्यायअष्टकाची चिकित्सा एक प्रकारे, एकंदर आंबेडकरी विचाराचीच चिकित्सा ठरणार आहे.

पाच खंडांत प्रत्येकी नऊ ते १३ लेख असतील. सर्वाधिक लेख ‘राजकीय न्याय’ या भागात असून त्यापैकी ‘डॉ. आंबेडकर आणि लोकशाही’ हा बीजलेखाइतका महत्त्वाचा लेख, प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी लिहिला आहे. डॉ. प्रदीप गोखले यांचा लेख ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ ही (फ्रेंच राज्यक्रांतीपासूनची) मूल्ये आणि डॉ. आंबेडकर यांचा विचार यांची चर्चा करतो. कोसीमो झीने हे मूळचे इटलीचे आणि सध्या लंडनमध्ये शिकवतात, त्यांचा लेख अँटोनिओ ग्रामची आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची तुलना करतो. असे तौलनिक अभ्यास महात्मा गांधी, जॉन डय़ूई यांच्याविषयीही अन्य लेखांमध्ये आहेत. लिंगभाव-न्यायाविषयीच्या खंडामध्ये सुनयना आर्य यांनी ‘डॉ. आंबेडकर : एक स्त्रीवादी तत्त्वज्ञ’ हा लेख लिहिला आहे. याच खंडाचे वैशिष्टय़ असे की, सुकुमार नारायणन, मुश्ताक अहमद मल्ला यांचे लेख हे समकालीन सामाजिक समस्यांच्या संदर्भात डॉ. आंबेडकरांच्या लिंगभावविषयक न्यायविचाराची चर्चा उपस्थित करतात. एक प्रकारे, डॉ. आंबेडकरांच्या चिंतनाची उपयोगिता धसाला लावतात.

अनेक देशांमधील अनेक विद्यापीठांत ‘दलित स्टडीज’ वा आंबेडकरी अभ्यासाची केंद्रे अथवा अध्यासने आहेत. तेथे हे खंड उपयुक्त ठरतील हे नक्कीच; पण डॉ. आंबेडकरांच्या विचारांची इतकी विविधांगी चिकित्सा एकत्रितपणे करणारा ग्रंथप्रकल्प, म्हणून या खंडांची नोंद इतर अभ्यासकही घेतील, अशी आशा आहे.