टीम बुकमार्क loksatta@expressindia.com
‘कास्ट मॅटर्स’ या पेंग्विन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचा लेखक मुंबईत अनेक तरुणांशी संवाद साधतो आहे.. त्यातून तरुणही त्याच्याशी संवाद वाढवत आहेत, असं चित्र गेल्या काही दिवसांत दिसलं. त्याच्या पुस्तकाच्या निमित्तानं त्याच्याशी स्वतंत्रपणे प्रश्नोत्तरं झाली.. त्याचं वावरणंही पाहाता आलं..
सुरज येंगडे. मूळचा नांदेडचा. आता अमेरिकेत असतो. संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमात काम करतो. त्या आधी चार खंड फिरलेला अकादमिक स्कॉलर. मात्र अकादमिक स्कॉलर असला तरी, आपल्या अभ्यासविषयात ‘कार्यकर्ते’पणाकडं झुकलेला. जगभरच्या बडय़ा वर्तमानपत्रांत, माध्यमस्थळांवर त्याचं लेखन प्रसिद्ध होत असतं, त्यातही त्याचं ‘चळवळ्या’ असणं प्रकर्षांनं दिसतंच. जातिव्यवस्था, वंशभेद, मानवी हक्क यांकडे सजगतेनं पाहणाऱ्या जागतिक पातळीवरील विचारवंतांशी त्याचा नेहमीच संवाद सुरू असतो. गत वर्षी आनंद तेलतुंबडे यांच्यासह त्यानं संपादित केलेलं डॉ. आंबेडकरांवरील पुस्तक (‘रॅडिकल इन आंबेडकर’) चर्चेत होतं. तेव्हापासूनच आपल्याकडील वाचकवर्तुळात त्याच्याबद्दल औत्सुक्य निर्माण झालेलं. ते शमविण्याचं काम त्याचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं ‘कास्ट मॅटर्स’ हे पुस्तक करतं. या पुस्तकाच्या निमित्तानंच तो सध्या भारतात आहे. त्याबद्दल इथं तो अनेकांशी संवाद साधतो आहे. या आठवडय़ात त्यासाठीच तो मुंबईत होता. त्यानिमित्तानं त्याला भेटण्याची, त्याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तेव्हा झालेल्या गप्पा या पुस्तकापुरत्याच न राहता, त्याहीपल्याड गेल्या. ‘कास्ट मॅटर्स’चा लेखक ‘असणं’ म्हणजे काय, हे त्या गप्पांतून कळत गेलं..
सफाईदार इंग्रजीत बोलणाऱ्या सुरजनं थेट मराठीतच बोलायला सुरुवात केली. गेली दहाएक वर्षे परदेशांत विविध विद्यापीठांत, अभ्यासकेंद्रात शिकत असूनही मराठी बोलीचा नांदेडी हेल त्याच्या बोलण्यातून सुटलेला नाही. अकादमिक विद्वानांच्या बोलण्यात नेहमीच एक औपचारिक सावधपणा असतो; पण सुरजच्या बोलण्यात तो जराही नव्हता. संवादाची सुरुवात पुस्तकापासूनच झाली. हे पुस्तक लिहिण्यामागची पाश्र्वभूमी तो सांगत होता.. नांदेडमधील दलित कुटुंबातील जन्म. वडील बँकेत चपराशी. दलित पँथरशी जोडलेले. ते राजा ढालेंचे जवळचे सहकारी. इतके की, सुरजचं नाव आधी ‘सहृदय’ असं होतं, जे ढालेंनीच ठेवलं होतं. पण त्या नावाचा उच्चार करताना अनेक जण चुकत, म्हणून सहृदयऐवजी सुरज हेच नाव त्यानं घेतलं. वडील नंतर बामसेफ-बसपाचेही कार्यकर्ते झालेले. ‘वस्तुनिष्ठ विचार’ नावाचं साप्ताहिकही ते चालवत. त्यांना वाचनाची आवड. त्यांच्या आग्रहामुळेच सुरजनं कांशिराम यांचं ‘चमचायुग’ हे पुस्तक वाचलेलं. त्यात आंबेडकरी चळवळीतील ‘चमच्यां’चे सहा प्रकार कांशिराम यांनी सांगितले आहेत. त्यातला सहावा प्रकार हा परदेशी जाऊन शिकून आलेल्यांचा आहे. कांशिराम सांगतात, हे बाहेरून शिकून आलेले लोक स्वत:स प्रतिआंबेडकर समजतात. परंतु कांशिराम वाचल्यामुळे सुरज त्यास अपवाद. आपल्याला काय करायचं आहे आणि कसं, याची पुरेशी स्पष्टता त्याच्याकडं आहे. त्यामुळेच नांदेडच्या विधि महाविद्यालयात सरंजामी वातावरणातही ‘जीएस’ पदाची निवडणूक त्यानं लढवली आणि ती जिंकलाही. परंतु ‘दलितत्वा’वरून त्रास देण्यास सुरुवात झाली, आणि त्यानं तिथून निघण्याचा निर्णय घेतला. मग तो हार्वर्ड केनेडी स्कूलला गेला. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यानं अभ्यास केला. त्यासाठी त्यांच्याबरोबर दोनेक वर्ष राहिला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारा तो पहिला भारतीय दलित विद्यार्थी. अलीकडे तो संयुक्त राष्ट्रांच्या एका उपक्रमात काम करतो आहे.
दोनेक वर्षांपूर्वी सुरजनं हार्वर्ड विद्यापीठातले प्राध्यापक, तत्त्वज्ञ कॉर्नेल वेस्ट यांच्यासह लिहिलेल्या निबंधानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यातल्या प्रा. वेस्ट यांनी १९९४ साली ‘रेस मॅटर्स’ या पुस्तकातून अमेरिकेतल्या वंशभेदावर तिखट भाष्य केलं होतं. (सुरजच्या पुस्तकाचं शीर्षक ‘कास्ट मॅटर्स’ असं आहे.. आणि ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ नावाची चळवळ अमेरिकेत जोर धरते आहे!) प्रा. वेस्ट यांनी दीर्घकाळ ज्यांच्याविषयी संशोधन केलं, त्या आफ्रिकी अमेरिकी समाजाचं दु:ख आणि भारतीय दलितांचं दु:ख सारखंच आहे. सुरजचं म्हणणं आहे की, मग या दोन्ही समाजांनी आता एकत्र येऊन समतेचा लढा लढायला हवा. या दोन्ही समाजांच्या स्थितीगतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासशाखेला आकार देणाऱ्या आश्वासक अभ्यासकांमध्ये सुरजचं नाव घेतलं जातं आहे. या अभ्यासशाखेची म्हणून एक ‘क्रिटिकल थिअरी’ घडवण्याचं काम काही अभ्यासक करताहेत, त्यांत सुरज क्रियाशील आहे.
या अभ्यासशाखेचे पूर्वसुरी म्हणून कोणाकडे पाहायचं, याचा शोध घेणारे प्रश्नही सुरजला विचारले. त्यातून देशी आणि विदेशी विचारधारांचा पीळ उलगडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतरचा दलित-विचार हा प्रामुख्यानं चळवळींतून पुढे जात राहिला आहे. त्यात दलित पँथरचं निराळं महत्त्व आहेच, पण मार्क्स-फुले- आंबेडकर अशी मांडणी शरद् पाटील यांनी केली, कांशीराम यांनी बहुजनवादाचा विचार पुढे नेताना सैद्धान्तिक पायाच दिला. यापुढेही कार्यकर्तेपणा आणि विचार यांची सांगड घालावीच लागेल, असं सुरज सांगतो. स्लावोय झिझेक, नोम चॉम्स्की आणि नेओमी क्लाइन हे आजच्या काळाचे तत्त्वज्ञ आहेत, पण गायत्री चक्रवर्ती- स्पिव्हॅक किंवा अन्य ‘सबाल्टर्न’, ‘वसाहतोत्तर’ अभ्यासकांना दलित, वंचितांची जाणीव कळलेलीच नाही हेही तो सांगतो.
हे सारं ठीक; पण खुद्द त्याला नांदेड ते हार्वर्ड हा पल्ला गाठताना काही अडचणी आल्या नाहीत का, असं विचारल्यावर तो म्हणतो, ‘आल्यात ना! जात कुठेही पाठ सोडत नाही.’ ‘दलितत्वा’ची जाणीव करून देणारे अनुभव त्याला आलेच आणि त्याबद्दल ‘कास्ट मॅटर्स’मध्ये त्यानं लिहिलंही आहे. ‘दलित असणं’ म्हणजे काय, याचा शोध तो त्यात घेतो. पुस्तकातल्या त्याविषयीच्या प्रारंभीच्याच प्रकरणात त्यानं यशवंत मनोहर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांतील ओळी उद्धृत केल्या आहेत. मनोहर म्हणतात त्याप्रमाणं, आपल्याच माणसांत ‘परकेपणा’ची जाणीव करून दिली जाणं, हे किती वेदनादायक असू शकतं, याचे अनेक दाखले सुरजच्या पुस्तकात मिळतात. यासंदर्भात सुरज वसाहतवादाचे टीकाकार एडवर्ड सैद यांच्या ‘युनिकनेस’, विचारवंत जाँ पॉल सात्र्चं अस्तित्वचिंतन आणि हायडेगरनं मांडलेली कालबद्ध-अस्तिव जाणिव या संकल्पना-सिद्धांतांचा विचार करतो. ‘दलितत्वा’चं अस्तित्व हे दलितांपेक्षा दलितेतरांसाठीच आहे, असं तो म्हणतो. हे दलितत्व केव्हा नाहीसं होईल, हे सांगताना तो सॉक्रेटिसचा आधार घेतो. ‘आता तत्त्वज्ञांनीच शासक व्हायला हवं,’ हे सॉक्रेटिसचं मत सुरजला योग्य वाटतं. सुरजच्या ‘चळवळ्या’ असण्यामागचं कारण कोणाला यात सापडू शकतं!
जगभरचे शोषित-वंचित आणि भारतीय दलित यांच्या एकजुटीचं स्वप्न पाहणाऱ्या सुरजला भारतीय दलितांतील पोटभेदांचीही जाणीव आहे. पुस्तकातलं एका प्रकरणात त्यानं याचा वेध घेतला आहेच; पण दलित प्रश्नांवर व्यक्त होतानाही त्याला याचं भान कायम असतं. त्यानं भारतीय दलितांची वर्गवारी केली आहे, ती अशी : (१) दृश्य दलित (२) प्रस्थापित दलित (३) स्वकेंद्री दलित आणि (४) मूलगामी दलित. यातले पहिले तीन प्रकार अन्यायांबाबत मौन बाळगणारे वा सोयीने व्यक्त होणारे, तर चौथ्या प्रकारातले स्वत:च्या मानवी हक्कांबाबत सजग असणारे.
सुरजला चौथ्या प्रकारातले दलित हवे आहेत. याच नजरेतून तो दलितांतील मध्यमवर्गाकडे पाहतो. या दलित मध्यमवर्गाच्या प्रगतीमुळेच देशभरातल्या मधल्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत, असं तो म्हणतो. एकीकडे दलित मध्यमवर्गाविषयी बोलताना, दुसरीकडे तो भारतीय दलितांच्या मानवी गरजांची पूर्तता किती झाली आहे, याचाही आढावा घेतो. त्यासाठी त्यानं एक उदाहरण दिलं आहे. ते आहे २०१५ सालचं. केंद्र सरकारच्या विविध विभागांत सचिव, सहसचिव आणि उपसचिव दर्जाच्या ३९३ पदांमध्ये अनुसूचित जाती-जमातींच्या केवळ ४७ जणांना संधी मिळाली, असं तो सांगतो. या जागा निहीत आरक्षण-कोटय़ाहूनही कमी होत्या. या उदाहरणावरून भारतीय समाजाचा जातीय तोंडवळा ध्यानात येऊ शकतो, असं तो म्हणतो. याची चीड त्याच्या बोलण्यात व्यक्त झालीच; शिवाय जर आरक्षणानं दिलेलं प्रतिनिधीत्वच पूर्ण केलं जात नसेल, तर आरक्षणाविरोधात ओरड करण्यात काय हशील आहे, असं तो म्हणतो.
असे विचार बेधडकपणे कोणत्याही जाती-वर्णाच्या तरुणांपुढे तो मांडतो आहे. प्रश्न विचारतो आहे, प्रश्न मांडतो आहे. उत्तरं माहीत असूनसुद्धा समाजानं मुद्दाम चिघळत ठेवलेले हे प्रश्न त्याच्या तोंडून ऐकल्यानंतर त्यांची तीव्रता तरुणांनाही भिडते आहे. ‘विचार करा’ एवढंच त्याचं आवाहन आहे.
जणू विचार करणं हीच क्रांती.. ते खरंही आहे. ‘फॉरवर्ड’ करणं, लाइक करणं, टॅग करणं.. हे सारं विचार करण्यापेक्षा सोपं असतं. पण विचारही करता येतोच ना? सुरजचा विश्वास तर आणखीच टोकाचा आहे- तरुणांनाच आजच्या जगाचा विचार स्वच्छपणे करता येईल! त्यासाठी अकादमिक स्कॉलर हवे आहेत.. पण तेही तरुणच हवेत.. ‘रॉकस्टार स्कॉलर्स’ हवे आहेत.
सुरज डोक्याचा वापर करतो आहे.. हे इथं अधिकच कळतं.