या पुस्तकाचा भर संघ व संघ परिवाराचे राजकारण यांतून उद्भवलेल्या विचारव्यूहावर असून विस्मृतीत घालविल्या गेलेल्या सावरकरी हिंदुत्वाची चिकित्सा त्यात नाही.. मात्र लव्ह जिहाद’, ‘आंबेडकर आमचेच’, ‘सांस्कृतिक संघटनयांसारख्या नव्या-जुन्या मुद्दय़ांची चर्चा करणारे व त्यातून रा. स्व. संघाच्या हिंदू राष्ट्रवादाचा खरा धोका भारतीय राष्ट्रवादाला कसा आहे, याचा धांडोळा घेणारे हे पुस्तक आहे..

धर्माधारित राष्ट्रवाद हा गेल्या अडीच-तीन दशकांपासून ‘भारतीय राष्ट्रवाद’ म्हणून सातत्याने मांडण्यात येतो आहे आणि अधिकाधिक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी त्या राष्ट्रवादालाच भारतीय राष्ट्रवाद समजू लागले आहेत. नेहरूंना पद्धतशीरपणे बदनाम करत व गांधीजींच्या हाती झाडू देऊन त्यांना स्वच्छतेपुरते मर्यादित करून, त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात रुजविलेली मूल्ये आणि त्यातून निर्माण झालेला भारतीय राष्ट्रवाद बाजूला सारून, ‘हिंदू राष्ट्रवाद’ अत्यंत आक्रमकपणे समोर मांडला जातो आहे. अशा परिस्थितीत भारतीय राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद यांतील फरक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी, हिंदू राष्ट्रवाद आणि फॅसिझम व मूलतत्त्ववाद यांतील साम्य आणि सूक्ष्म फरक समजून घेण्यासाठी राम पुनियानींनी लिहिलेले आणि फारोज मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशनने प्रकाशित केलेले ‘इंडियन नॅशनॅलिझम व्हर्सेस हिंदू नॅशनॅलिझम’ हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.

प्रा. रिचर्ड बॉनी यांचा पुस्तक परिचय आणि लेखकाची प्रस्तावना वाचल्यावर पुस्तकाचा आवाका आणि पाश्र्वभूमी लक्षात येते. याच ठिकाणी लेखकाने फॅसिझम, त्याचा ऐतिहासिक विक्षेपमार्ग, इटली आणि जर्मनीतील फॅसिझम, युरोपातील अन्य फॅसिस्ट चळवळी, नव-फॅसिस्ट चळवळी, मूलतत्त्ववाद या साऱ्यांचा ऊहापोह केला आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच लेखकाने ‘भारतातील जातीयवादाची समस्या ही वसाहतवादी अर्थव्यवस्थेची निष्पत्ती आहे’ असे विधान करून सन १८५७ नंतर ब्रिटिशांनी मुसलमानांच्या तुलनेत हिंदूंना थोडे अधिक महत्त्व दिले असल्याचे मत मांडले आहे. याच अनुषंगाने सर सय्यद अहमदांनी ‘हिंदूंची संघटना’ असे म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केलेला विरोध, त्यातून मुस्लीम लीगची स्थापना आणि क्रमाने हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्थापना हा इतिहास थोडक्या शब्दांत लिहिला आहे. त्याचबरोबर संघाच्या विचारसरणीचा फॅसिस्ट विचारसरणीशी स्पष्ट संबंध दाखविणारी गोळवलकर गुरुजींची उद्धरणे समर्पकपणे दिली आहेत. मीनाक्षीपूरमचे धर्मातर आणि शहाबानो खटल्याच्या चुकीच्या पद्धतीच्या हाताळणीने संघाला सामाजिक हस्तक्षेपाची संधी मिळाली, असे लेखक म्हणतो.

‘फ्रीडम स्ट्रगल, आर.एस.एस. अ‍ॅण्ड हिंदू महासभा’ या प्रकरणात धर्म, वंश, प्रांत, भाषा, लिंग, वर्ग हे सारे भेद विसरून भारतीय स्वातंत्र्यलढय़ात साऱ्या भारतीयांना सामील करून घेणारे आणि त्यासाठी ‘दुसऱ्यांवर प्रेम करा’ या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करणारे महात्मा गांधींचे नेतृत्व उदयास आल्यावर, १९२० नंतर हिंदू जातीयवादी राजकारणाने आपले राजकारण जोराने सुरू केले आणि या जातीयवादाचे तत्त्वज्ञान ‘दुसऱ्याचा द्वेष करा’ हे होते, असे लेखक म्हणतो. याच ठिकाणी लेखकाने १९२३ पासून सावरकरांनी हिंदू महासभेला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली असे सांगत, त्यांचे अंदमानला जाण्याआधीचे कार्य, त्यांनी ब्रिटिशांशी पत्करलेली संपूर्ण शरणागती, त्यांची झालेली सुटका आणि त्यांनतर त्यांनी सातत्याने केलेला काँग्रेस आणि गांधी विरोध या गोष्टी नमूद करून ‘एक काँग्रेसविरोधी संघटना निर्माण करण्यासाठी आणि ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीला परिणामकारकपणे राबविण्यासाठी ब्रिटिश सरकार सावरकरांमध्ये हिंदू जीना शोधत असणे शक्य आहे का?’ हा दुबे आणि रामकृष्णन या अभ्यासकांनी विचारलेला प्रश्न लेखक उद्धृत करतो. रा. स्व. संघाबाबत लिहिताना, लेखकाने हेडगेवारांनी १९३१ नंतर कोणत्याही राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला नाही असे सांगून ‘ब्रिटिशविरोधी असणे म्हणजे देशभक्त आणि राष्ट्रवादी असणे असे समीकरण मांडले जात आहे. या प्रतिक्रियावादी दृष्टीने साऱ्या स्वातंत्र्य आंदोलनावर, त्याच्या नेत्यांवर आणि सर्वसामान्य जनतेवर विनाशकारी परिणाम झाले आहेत,’ हे गोळवलकरांचे उद्धरण नमूद करून संघाची स्वातंत्र्य आंदोलनापासूनची फारकत स्पष्ट केली आहे.

अटलबिहारी वाजपेयींचा १९४२च्या आंदोलनातील सहभाग नेमका कसा होता आणि कोणता कबुलीजबाब देऊन वाजपेयींनी आपली सुटका करून घेतली तेही लेखकाने नोंदवले आहे. त्याचबरोबर गांधीजींचा खून करणारा नथुराम गोडसे हा संघाचाच स्वयंसेवक होता हे गोपाळ गोडसे यांनी २५ जानेवारी १९९८ रोजी दिलेल्या मुलाखतीचा आधार घेऊन स्पष्ट केले आहे.

‘सोशल बेस ऑफ आर.एस.एस. कम्बाइन’ या प्रकरणात ७० आणि ८०च्या दशकातील सामाजिक आणि आर्थिक बदल आणि त्याचा संघाने आपला पाया विस्तृत करण्यासाठी करून घेतलेला वापर स्पष्ट करून धार्मिक राष्ट्रवाद, मूलतत्त्ववाद, फॅसिझम या संकल्पनांची सविस्तर चर्चा केली आहे. हिंदुत्व आणि मूलतत्त्ववाद, हिंदुत्व आणि फॅसिझम यांतील साम्य आणि जुजबी फरक स्पष्ट करणारे तक्ते हे या प्रकरणाचे वैशिष्टय़ आहे.

‘हिंदुत्व अ‍ॅण्ड एक्सप्लॉयटेड, ऑप्रेस्ड सेक्शन्स ऑफ सोसायटी’ या प्रकरणात संघाच्या मुस्लीम आणि ख्रिश्चन विरोधाबरोबरच संघाचे कामगार संघटना, महिला संघटना, दलित आणि आदिवासी यांच्याबद्दलचे विचारही स्पष्ट होतात. तसेच महिलांबाबतचा संघाचा दृष्टिकोन आणि नाझींचा दृष्टिकोन यांतील साम्यही स्पष्ट होते. संघाची दलित-सवर्ण समरसता ही वस्तुत: या दोन समूहांतील अंतर्विरोध लपवून यथास्थिती कायम ठेवणे आहे असे सांगत लेखक डॉ. आंबेडकरांचे ‘या समाजात एकत्र राहण्याची भावना नाही. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अंतर्विरोधामुळे हिंदू एक राष्ट्र म्हणून बनू शकणार नाहीत’ हे विधान उद्धृत करून सावरकर आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांतील फरकही स्पष्ट करतो.

‘आर.एस.एस. आयडियोलॉजी आणि प्रॅक्टिस’ हे प्रकरण या पुस्तकातील सर्वात मोठे प्रकरण आहे. संघ हे राजकीय की सांस्कृतिक संघटन असा प्रश्न विचारून, ज्या संघटनेचा उद्देश हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा आहे, ते संघटन सांस्कृतिक असूच शकत नाही असे लेखक म्हणतो. ‘हिंदुत्ववाद हा धर्म नाही, तो जीवनमार्ग आहे आणि जे हिंदू आहेत ते भारतीय आहेत आणि जे हिंदू नाहीत ते भारतीय असू शकत नाहीत’ या मोहन भागवत यांनी २८ फेब्रुवारी १९१० रोजी केलेल्या विधानाचा समाचार लेखकाने समर्पक अशा अनेक युक्तिवादांनी घेतला आहे. जीवनमार्ग ही फारच व्यापक संकल्पना असून त्यात धार्मिक सूक्ष्मभेद, संस्कृती, खाणे-पिणे, समाज संघटन, उपजीविकेचे मार्ग आणि याहून बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव होतो, असे सांगून लेखक केरळमधील मुसलमानांचा जीवनमार्ग हा केरळी हिंदू आणि केरळी ख्रिश्चन यांच्याशी बराच मिळताजुळता असतो, तर पंजाबी हिंदूंचा जीवनमार्ग हा बंगाली हिंदूंपेक्षा वा मॉरिशस वा लंडनमध्ये स्थायिक झालेल्या हिंदूंपेक्षा फारच वेगळा असू शकतो हा लेखकाचा युक्तिवाद मोहन भागवतांचे वक्तव्य अगदीच निराधार बनवून टाकतो. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र यांचा निर्थक शब्दच्छल जाणीवपूर्वक असून तो राजकीय धोरणाचा भाग असल्याचे सांगत या संज्ञांकडे ऐतिहासिक संदर्भात पाहायला हवे आणि हिंदुत्ववादाचा दावा आजच्या संदर्भात पाहायला हवा, हे लेखकाचे प्रतिपादन आणि त्यासाठीचे विवेचन या शब्दच्छलातील धूर्तपणा उघडा पाडते. संघ आणि अल्पसंख्याक, संघ आणि महिलांचे प्रश्न याबाबतही लेखकाचे प्रतिपादन समर्पक आहे.

उत्तर प्रदेशात २०१३ पासून हिंदू-मुस्लीम आंतरधर्मीय विवाह हे प्रेमातून वा मैत्रीतून होत नसून मुस्लीम संघटनांचा ‘लव्ह जिहाद’ या नावाचा कट आहे, या संघ परिवाराच्या प्रचारातील फोलपणाही लेखकाने न्यायालयाने नियुक्त केलेल्या आणि पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अहवालांतून दाखवून दिला आहे. या ठिकाणी ‘आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहाविरुद्धची अशी अभियाने केवळ आमच्या राष्ट्रीय एकात्मतेविरुद्धच नाहीत तर मुलींच्या जीवनावर नियंत्रण ठेवणारी पितृसत्ताक पद्धती कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे,’ हे चारू गुप्ता यांचे विधानही लेखकाने उद्धृत केले आहे.

‘डॉ. आंबेडकरांचा संघाच्या विचारसरणीवर विश्वास होता,’ या मोहन भागवतांच्या विधानातीलही फोलपणा लेखकाने दाखवून दिला आहे. आंबेडकरांनी हिंदुत्ववादाला ब्राह्मणी धर्मशास्त्र म्हटले. या धर्मात कधीही प्रतिष्ठा आणि न्याय मिळणार नाही म्हणून धर्मातराचा निर्णय घेऊन तो त्यांनी अमलात आणला हे सांगून लेखक ‘जर हिंदू राज्य खरंच प्रत्यक्षात आले तर ते या देशावरील फार मोठे संकट असेल, यात शंकाच नाही. हिंदूंना काहीही म्हणू दे, हिंदुत्ववाद हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. हिंदुत्ववाद हा लोकशाहीशी विसंगत आहे. कोणत्याही किमतीवर हिंदुराज्याला विरोध करायलाच हवा’ हे डॉ. आंबेडकरांचे ‘पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया’मधील विधान उद्धृत करतो.

पुस्तकाच्या शेवटी दिलेले दस्तावेज आणि परिशिष्टे लेखकाच्या प्रतिपादनाला बळकटी देतात. ‘भारतातील जातीयवादाची समस्या ही वसाहतवादी अर्थव्यवस्थेची निष्पत्ती आहे,’ हे लेखकाचे विधान मात्र तितकेसे पटणारे नाही. कारण तसे असते तर ब्रिटिश आगमनापूर्वीच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या प्रयत्नांना काही प्रयोजनच उरत नाही. मग कबीराचीही गरज राहत नाही आणि सुफी परंपरांचीही. त्याचबरोबर अकबराच्या दिन-ए-इलाही या धर्माला विरोध का झाला, हेदेखील सांगता येणार नाही किंवा वहाबी चळवळीचे प्रयोजनच राहणार नाही.

असे असले तरी या पुस्तकातील लेखकाच्या मुख्य प्रतिपादनाला कोणताही बाध येत नाही. म्हणूनच ज्यांना संघाचे अंतरंग समजून घ्यायचे असेल, कार्यपद्धती आणि रणनीती समजून घ्यायची असेल, संघाचे संघटन कौशल्य समजून घ्यायचे असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघापासून खरा धोका कोणता आहे हे समजून घ्यायचे असेल त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

  • ‘इंडियन नॅशनॅलिझम व्हर्सेस हिंदू नॅशनॅलिझम’
  • लेखक : राम पुनियानी
  • प्रकाशक : फारोज मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन
  • पृष्ठे : २३५, किंमत : २५० रुपये

 

– डॉ. विवेक कोरडे

drvivekkorde@gmail.com