बंडखोर बुद्धिप्रामाण्यवादापासून निव्वळ बुद्धिवादीपणा स्वीकारणाऱ्या प्लेबॉयची ही नवी भूमिका आजच्या मासिक उद्योगाच्या बदलत्या चित्राला स्पष्ट करणारी आहे. जुन्या ओळखीवर जे लढवय्या प्लेबॉय साध्य करू शकला, ते नवी ओळख साधून करणार का, हे आत्ताच ठरवता येत नसले, तरी पहिल्या अंकाचे चित्र मात्र आश्वासक नाही..
काही वर्षांपूर्वी ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’ नावाच्या अगदी स्वस्तात बनलेल्या एका भयपटाचे स्थान बॉक्स ऑफिसवरील कमाईबाबत गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले. त्याचे कारण एका साध्या पण चमत्कारिक कल्पनेत होते. हरवलेल्या विद्यार्थ्यांच्या सापडलेल्या ‘व्हिडीओ फूटेज’च्या आधारावर त्याची चित्रकथा बेतली होती. अन् त्यात भयावह असे बेतीव काहीच नव्हते. मानवी मनाला दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या गोष्टींचेच भय अधिक असते, अन् ती न दिसणारी प्रतिमाच त्याच्या मनावर अधिक ठसते या संकल्पनेवर त्याचा भर होता. व्हिडीओ फूटेजमध्ये भूत-प्रेत असे काही नसतानाही अंगावर काटा आणण्याची हुकमत चित्रपटाने साध्य केली होती. स्त्री नग्नतेच्या अस्तित्वामुळे गेली सहा दशके मुख्य प्रवाहाबाहेर राहून लढवय्या राहिलेले अमेरिकी नियतकालिक ‘प्लेबॉय’ या महिन्यापासून सोज्वळ आणि कौटुंबिक झाले. ताज्या अंकाकडे पाहिल्यानंतर मात्र ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’ चित्रपटात वापरण्यात आलेल्या प्रतिमा संकल्पनेची तीव्र आठवण व्हायला लागते.
साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांच्यावर बंडखोरीतून आसूड ओढत असतानाही केवळ अनावृत ललनांच्या दिलखूश छायाचित्रांच्या माऱ्यामुळे प्लेबॉय मासिकाचा १९५३ सालापासून जगभर प्रसार झाला. जागतिकीकरणाआधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून या मासिकाची नोंद केली जाते. अमेरिका घडविणाऱ्या घटकांमध्ये धोरणे ठरविणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे घेता येणे अवघड आहे, पण हिप्पी चळवळ, एलविस प्रेस्ले, मायकेल जॅक्सन, एमटीव्ही हॉलीवूड आणि अर्थात प्लेबॉय निर्मात्या ह्य़ू हेफ्नर यांचा नामोल्लेख आवर्जून करावा लागेल. प्लेबॉयची निर्मिती तद्दन व्यावसायिक होती. जगात कोणत्याही मासिकाला गाठता येणार नाही, इतके खपाचे शिखर प्लेबॉयने हिकमतीने गाठले. अनावृत शरीर छब्यांसोबत वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचा झरा प्लेबॉयने कधी आटू दिला नाही. १९८० नंतर बदलत जाणाऱ्या स्पर्धेचा, इंटरनेटचा आणि नियतकालिक वाचनाच्या घटत्या ओघाचा फटका प्लेबॉयला बसला. आज इंटरनेट आणि समांतररीत्या हॉलीवूडला झाकोळण्याची ताकद निर्माण झालेल्या पोर्न विश्वाने स्त्री नग्नतेची व्याख्या बदलून टाकली आहे. या धर्तीवर आपल्या मासिकाचे एकेकाळी असलेले खपमूल्य झुगारून देऊन मासिकाला कौटुंबिक बनविण्याचा पहिला प्रयत्न फार यशस्वी झाला असे पहिल्याच अंकदर्शनावरून म्हणता येणे कठीण आहे.
यंदाच्या अंकाच्या मुखपृष्ठावर थोर साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे यांची पणती (की खापरपणती?) ड्री हेमिंग्वे स्वीमसुटात पिनअप मॉडेल म्हणून झळकली आहे. आतील पृष्ठांमध्ये तिची छबी अनावृत नसली, तरी अमेरिकेतर जगताला मर्यादेत काहीच जाणवणार नाही. अन् जे नाही दिसत तेच अधिक पाहण्याची ‘ब्लेअर विच’ची संकल्पना येथे पूर्ण होईल. पूर्वीची न्यूडिटी परवडणारी ठरावी, अशी यातील छायाचित्रांची रचना आहे. ती छायाचित्रे उत्तान होणार नाहीत, याची काळजी घेतली असली तरीही.
अनुक्रमणिकेची जवळजवळ १९५३ पासून चालत आलेली, अन् आजच्या डिझाइन युगात कालहत झालेली रचना यंदाच्या अंकात बदलली गेली आहे. उग्र छायाचित्रामध्ये अनुक्रमणिकेचा सोस सोडलेला दिसतो. सदरांचा आराखडा जास्तीतजास्त छायाचित्र आणि कमीतकमी मजकूर असा रचण्यात आला आहे. सध्याच्या ‘एस्क्वायर’ आणि ‘जीक्यू’ या खपाच्या मासिकांना समांतर असलेले हे स्वरूप आहे. गॉगल, शूज, कार यांबाबत टिपांचा सचित्र मारा आहे. जेम्स फ्रॅन्को या तरण्या अभिनेत्या लेखकाचे सिने-टीव्ही जगतातील सेलिब्रेटींच्या मुलाखतींचे ‘फ्रॅन्कोफाइल’ हे सदर आहे. ज्यात ‘वायर’ या भलत्याच विषयासाठी गाजलेल्या टीव्ही मालिकेच्या निर्मात्याशी आटोपशीर चर्चा आहे. या मालिकेत दाखविण्यात आलेल्या सेक्स, ड्रग्ज, हतबल पत्रकारिता आणि राजकारण यांच्यावर सडेतोड गप्पा आहेत.
‘अमेरिकन सायको’ या कादंबरीद्वारे अमेरिकी समाजातील सामान्य माणसाचे नैतिक अध:पतन दाखवून देणाऱ्या आणि आपल्या सलग कादंबऱ्यांतून समाजातील व्यंग टिपणाऱ्या ब्रेट इस्टन एलिस या लेखकाचा ‘मॉडर्न सेक्शुअलिटी : ए केस स्टडी’ हा निबंध मासिकाच्या नवबदलाचेही समर्थन करणारा आहे. त्यात प्लेबॉय आणि नग्नता याबाबत वैयक्तिक आठवणींचा दस्तावेज वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. १९७० सालातील मध्यमवर्गीय मानसिकतेतून ते आज स्मार्टफोन, सेक्स्टिंगच्या काळात बदलत्या कामसंकल्पना यावर या निबंधातून धावती नजर टाकण्यात आली आहे.
कार्ल ओव्ह कनौसगार्ड या नॉर्वेमधील लेखकाने ‘माय स्ट्रगल’ या अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या आत्मचरित्राच्या नावाप्रमाणे आपल्या आयुष्यावर सहा खंडी वादग्रस्त अन् प्रवाही कादंबऱ्या लिहिल्यात.
या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या त्यातील सविस्तर तपशिलासाठी वादग्रस्त असल्या, तरी दर एक पुस्तक त्यातील निवेदनासाठी अधिकाधिक खपत आहे. त्याच्या कादंबरीच्या पाचव्या खंडातील एक भाग अंकामध्ये प्रकाशित झाला असून, त्यात पौगंडावस्थेत घेतलेल्या पहिल्या वहिल्या ‘आत्मप्रेमा’चा नमुना प्लेबॉयने आपल्या ताज्या अंकामध्ये मुद्रित केला आहे. कुठूनही वाचताना वाचकाला थोडाही कंटाळा न आणण्याचे कसब या लेखकाने साध्य केले आहे.
या लेखकासारखीच वाचकाला खिळवून ठेवण्याची लेखनशक्ती असलेल्या डॉन विन्स्लो या गुन्हेगारी लेखकाची कथा यंदाच्या अंकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. प्लेबॉयच्या कथांना अत्यंत उग्र रंगातील आणि अंगावर येणारी चित्रे असतात. यंदा चित्रांचे उग्रपण शाबूत असले, तरी रंग उधळपट्टीवर मर्यादा आणण्यात आली आहे. गुन्हेगारी कथांमधील हत्या, भ्रष्ट पोलीस दलामुळे चुकीच्या व्यक्तीचे त्यात अडकणे आणि अन्याय दूर करण्यासाठी इतर यंत्रणा सक्रिय होणे, अशी कथेची चढती भाजणी प्लेबॉयच्या उत्तमोत्तम कथांची परंपरा जपणारी आहे.
शोधपत्रकारिता किंवा भल्या मोठय़ा दजेदार रिपोर्ताजचा न्यूयॉर्कर, हार्पर्स मॅगझिन, जीक्यू आणि रोलिंग स्टोन आदी नियतकालिकांचा सध्याचा प्रवाह खूप जोमात आहे. प्लेबॉय त्याच्या प्रदीर्घ मुलाखतींसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम सुरू असताना तेथील सर्वात लोकप्रिय राजकीय विश्लेषक, वृत्तनिवेदिका रेचल मेडो यांची लांबोडकी मुलाखत नव्या धाटणीच्या अंकात छापणे प्लेबॉयला गरजेचे वाटले. निवडणुकीपासून व्यक्तिगत विविध मुद्दय़ांवर तिखट आणि स्पष्ट मतांचा पाठपुरावा करणारी ही मुलाखत सध्याच्या अमेरिकी वर्तमानाचा एकप्रकारे दस्तावेज आहे.
स्थलांतरावर गेल्या वर्षभरापासून युरोपातील घटनांमुळे चर्चा सुरू आहे. जेव्हियर व्हालाडेझ या एका मासिकाच्या संपादक, लेखक आणि कलाकाराची कागदपत्रांअभावी अमेरिकेने रातोरात डलासमधून मेक्सिकोमध्ये पाठवणूक कशी केली, त्याची क्रूर सत्यकथा या लेखकाच्याच तोंडून प्लेबॉयने प्रदीर्घ लेखाद्वारे मांडली आहे.
सिनेमा, संगीत, फॅशन आणि महिला लेखिकेकडून प्रथमच लिहून घेतलेला सेक्स कॉलम, बारटेंडर, फोन अ‍ॅडिक्शन आदी अनेक गोष्टी एकपानी ऐवजासाठी प्लेबॉयने राखून ठेवले आहे. अन् त्यात कमीतकमी शब्दांत अधिकाधिक आशय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्लेबॉयचा अंक यंदा पहिल्यांदाच बुक स्टॅण्ड्सवर विक्रीसाठी जाहीरपणे मोकळा ठेवण्यात आला. हा अंक कुठल्याही कव्हरमध्ये बंद न करता मुक्तपणे विक्रेते-ग्राहकांकडून हाताळला गेला. ही गोष्टच कैक दिवस बातमीचा विषय बनली होती. ‘निव्वळ साहित्यमूल्यांसाठी प्लेबॉय वाचतो’, म्हणत तो पाहणाऱ्यांच्या ढोंगी प्रवृत्तींना यापुढे थारा राहणार नाही, असे अंकाचे रुपडे बनविण्यात मात्र प्लेबॉयला यश आले आहे.
बंडखोर बुद्धिप्रामाण्यवादापासून केवळ बुद्धिवादीपणा स्वीकारणाऱ्या प्लेबॉयची ही नवी भूमिका आजच्या मासिक उद्योगाच्या बदलत्या चित्राला स्पष्ट करणारी आहे. गुणवत्ताप्रचुर मजकूर असला, तरी आर्थिक घटकाचा विचार करता समाजाचा कल पाहून लवकरात लवकर बदलाचा निर्णय घेणे सध्या मासिकांसाठी आवश्यक बनलेले आहे. प्लेबॉयला आपल्याकडे असलेल्या मजकुराच्या दर्जाची कधीच चिंता नव्हती. मात्र त्याच्या खपासाठी एकटा मजकूर उपयुक्त ठरत नव्हता.
दुर्दैवाने अनावृत शरीरांची तो मांडत असलेली आरास त्याची मूलभूत ओळख होती. ऑनलाइन होणे, अनेक बडय़ा नियतकालिक संस्थांनी छपाईच्या खर्चाला कात्री मारत मासिकांना बंद करणे, वाचनप्रक्रियेवर बदल घडविणाऱ्या अनेक घटकांमुळे मासिकांचा खप कमी होणे, एकूण मानवी वाचन एकाग्रतेचा बट्टय़ाबोळ होणाऱ्या आजच्या युगात मासिकांसमोर अस्तित्व टिकविण्यासाठी वाटेल त्या पर्यायांचा वापर करणे आदी प्रक्रिया सध्या जगभरातील मासिकांबाबत घडत आहेत. प्लेबॉयने आपली मूलभूत ओळख पुसून सध्या प्रचलित बुद्धिवादी मासिकांच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. जुन्या ओळखीवर जे लढवय्या प्लेबॉय साध्य करू शकला, ते नवी ओळख बनवून करू शकेल की नाही, याचे भाकीत आत्ताच घाईचे. मात्र पहिल्या

पंकज भोसले
अंकातून तरी बदलांच्या खुणा आश्वासक नाहीत. हे खरे.
pankaj.bhosale@expressindia.com

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !