प्रा. अनिल क्षीरसागर

करोना संकटाने भांबावलेले जग तूर्त यातून बाहेर पडण्याच्या धडपडीत असले, तरी या महामारीने बदललेल्या करोनोत्तर जगाचीही प्रारूपे मांडली जाऊ लागली आहेत. मात्र अशा प्रारूपांचा आधार काय असावा, याची दिशा अमिताव घोष यांच्या ‘द सर्कल ऑफ रीझन’ या कादंबरीने आधीच दाखवून दिली आहे..

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या करोना या महामारीने जगाच्या जगण्या-वागण्याचे संदर्भ कमालीचे बदलून टाकले आहेत. जिवंत राहायचे असेल तर- सुरक्षित अंतर ठेवणे, शक्यतोवर घरातच राहणे, कमीत कमी संसाधनांमध्ये गरजा भागवणे, एक-दुसऱ्याला मदत करणे, आरोग्याची काळजी घेणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तथा जीवनशैली अवलंबणे.. अशा एक न् अनेक सवयी तथा मूल्यांचा परिपाठ आणि त्यांचा आग्रह सर्वदूर पाहायला मिळतोय. सर्व काही इतके भीतीदायक झालेय की, तोंडाला मुखपट्टी (मास्क) लावून फिरणे, काळजी घेत वस्तूंना स्पर्श करणे, लगेचच सॅनिटायझरने अथवा साबणाने हात धुणे, बाहेर गेले असाल, अत्यावश्यक सेवेत असाल तर वारंवार हात धुणे, आदी गोष्टी करणे अत्यावश्यक वाटू लागले आहे. हे सर्व करणे मनाला दिलासा देते की, तुम्ही या महामारीपासून दूर राहाल. हे विचित्र पर्व अनुभवत असताना ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भारतीय इंग्रजी लेखक अमिताव घोष यांची ‘द सर्कल ऑफ रीझन’ ही कादंबरी खूपच प्रासंगिक वाटते. कादंबरीचे मुख्य प्रयोजन पाश्चिमात्य विज्ञान आणि विवेकवादाचे टीकात्मक परीक्षण करणे हे आहे. या दोन्हींचेही सार्वत्रिकीकरण करणे चुकीचे आहे, असे मत लेखक या कादंबरीतून मांडतात.

आधुनिक विज्ञान आणि औद्योगिक विकासाची सुरुवात ही युरोपातील प्रबोधन चळवळीतून झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन हा इतर समज व धारणांपेक्षा जास्त महत्त्वाचा झाला. जगणे हे अधिकाधिक विज्ञानआधारित होत गेले. तेच तत्त्वज्ञान वसाहतकर्ते आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडांत घेऊन गेले. ‘आम्ही जगाला दिशा देण्याकरिता आलो आहोत, अंधारातून उजेडात नेण्याकरिता आलो आहोत’ असे भासवून, विज्ञान आणि विवेकाचा दिवा दाखवत या साम्राज्यवादी राष्ट्रांनी जवळजवळ १६० पेक्षा जास्त देशांवर आपले साम्राज्य पसरवले. म्हणजे विज्ञान, विवेकवाद आणि वसाहतीकरण यांचे गुंतागुंतीचे, मात्र जवळचे संबंध राहिले आहेत. आधुनिक विज्ञान आणि विवेकवादाने इतर संस्कृतींच्या पूर्वापार चालत आलेल्या स्थानिक विज्ञान आणि विवेकवादी परंपरेला कमी लेखत, केवळ पाश्चिमात्य मूल्यांचा आग्रह सर्वाना केला. इतरांनीही ते लादून घेतले आणि नंतर सर्व काही त्याच चष्म्यातून पाहू लागले. अमिताव घोष यांच्या मते, केवळ पाश्चिमात्य विज्ञान आणि विवेकवाद जगाच्या समस्या सोडविण्याकरिता पुरेसे नाहीत. आधुनिक जग हे अनेक अर्थानी विस्कळीत झाले आहे, त्याचे निराकरण करण्याकरिता केवळ पाश्चिमात्य विज्ञान व विवेकवादावर निर्भर राहणे हे धोक्याचे ठरेल. आजच्या जागतिक समस्यांवरील उपाय या दोन्हींच्या पलीकडे जाऊन बहुसांस्कृतिक मूल्यांत, मानवतावादात, वैश्विकतावादात, तसेच निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या जीवनशैलीत शोधावे लागतील.

अमिताव घोष ‘द सर्कल ऑफ रीझन’ या कादंबरीत या मांडणीची गुंफण करतात. कादंबरीचा नायक त्याच्या डोक्यावर असलेल्या अनंत गाठींमुळे ‘नचिकेत बोस’ या त्याच्या मूळ नावाने परिचित न होता ‘आलू’ याच नावाने ओळखला जातो. आलू हा त्याच्या पालकांच्या अपघाती मृत्यूनंतर कोलकात्याशेजारील लालपुकर या गावात काका बलराम बोस यांच्याकडे राहण्यास येतो. बलराम हा फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या संशोधनाने प्रचंड प्रभावित असतो. निर्जंतुकीकरण हे आजारांपासून दूर राहण्याकरिता खूप महत्त्वाचे आहे, असा त्याचा ठाम समज असतो. बलरामने त्याच्या महाविद्यालयीन काळात पाश्चिमात्य विज्ञान व विवेकवादापासून प्रेरणा घेत मित्रांसोबत ‘रॅशनॅलिस्ट’ (तर्कवादी) ही महाविद्यालय पातळीवरील संघटनादेखील सुरू केली होती. कथानकात लालपुकर हे सीमेलगतचे ठिकाण असल्यामुळे १९७१ साली बांगलादेश निर्मितीनंतर स्थलांतरितांच्या झुंडीच्या झुंडी तेथे येऊ लागतात. संपूर्ण गाव त्या स्थलांतरित नागरिकांच्या मदतीला धावून जाते. बाहेरून आलेल्या या लोकांमुळे आणि पुरेशा सोयींअभावी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊन साथीचे रोग पसरू शकतात, असे बलरामला वाटते. रामबाण उपाय म्हणून तो मोठय़ा प्रमाणात काबरेलिक आम्ल विकत घेऊन गावात व गावाबाहेर फवारणी करतो. गाव संभावित साथींपासून वाचते, मात्र त्यानंतर बलरामचे काबरेलिक आम्लाचे वेड वाढतच जाते. तो काबरेलिक आम्लाचा प्रचंड साठा करू लागतो. घराच्या अंगणात बरेच ड्रम विकत घेऊन त्यात ते साठवून ठेवू लागतो. पुढे गावातीलच भूदेब रॉय या सावकाराशी निर्माण झालेल्या वैरातून अटीतटीचे प्रसंग उद्भवतात. त्यातूनच एके रात्री हल्ला-प्रतिहल्ला सुरू असताना काबरेलिक आम्लाने भरलेले ड्रम पेट घेतात आणि होणाऱ्या स्फोटात संपूर्ण घर उद्ध्वस्त होते. आलू काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे वाचतो. मात्र पोलिसी ससेमिरा पाठीमागे लागल्यामुळे तो तिथून पळ काढून पश्चिम आशियातील अल-गझिरा या आखाती शहरात जातो. तिथे अवैध कामगार म्हणून काम करू लागतो. भारतातून पळून जातानाच भारतीय पोलीस आलूच्या मागावर आहेत. आलू दहशतवादी असावा असा पोलिसांचा कयास असतो. कादंबरीतील अल-गझिरा हे शहर काल्पनिक असले, तरी त्याकडे आधुनिक आखाती देशांमधील दुबईसारखे शहर म्हणून बघता येईल.

या अल-गझिरावर ब्रिटिशांचा वसाहतवजा ताबा असतो. तेथील तेल लुटण्याच्या उद्देशाने ब्रिटिश अनेक खेळी करून तेथे राजकीय अस्थिरता निर्माण करतात. आलू एका मोठय़ा इमारतीत रंगकाम करत असताना ती इमारत कोसळते. कोसळणारी इमारत ही भ्रष्ट भांडवलवादी व्यवस्थेचे प्रतीक म्हणून लेखक चित्रित करतो. सुदैवाने आलू इमारतीच्या मलब्याखाली चमत्कारिकरीत्या वाचतो. त्याला किंचितही इजा होत नाही. चार दिवसांनंतर त्याला त्याचे सहकारी व मित्र सुखरूप बाहेर काढतात. आलूचा जणू काही पुनर्जन्म झाला आहे असे मानून ते लोक त्याला वस्तीत आणतात. त्याचे बोलणे ऐकावे म्हणून समोर येऊन बसतात. आलू त्यांना सांगतो की, चार दिवस तो केवळ जीवघेणे विषाणू व अस्वच्छता यांबद्दल विचार करत होता. विचारांती यावर उपाय सापडला आहे, असा दावा तो करतो. रोग पसरवणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म जंतूंपासून सुटका मिळवायची असेल तर पैशापासून दूर राहावे लागेल, असा विचित्र सल्ला तो लोकांना देतो. विषाणू हे पैशावर बसलेले असतात, आपण दिवसभर पैशामागे पळत असतो आणि म्हणूनच आपण विषाणूबाधित होतो, असे ठाम मत तो व्यक्त करतो. या ठिकाणी आलू सामाजिक अर्थशास्त्राचे एक क्रांतिकारी प्रारूप सर्वासमोर मांडतो : वस्तीतील सर्व लोकांनी जे काही काम व व्यवसाय करत असतील ते नियमितपणे सुरू ठेवावेत, मात्र आठवडय़ाकाठी येणारा पगार त्यांनी त्यांच्यातीलच एक लोकनियुक्त लेखापालाकडे जमा करावा. लेखापाल सर्वासाठी दररोज लागणाऱ्या गोष्टींची एकत्रित ठोक भावाने खरेदी करेल. याने सर्वाचा पैसा मोठय़ा प्रमाणात वाचेल आणि जंतूंचा प्रसारही थांबेल.. वस्तीतील लोक अतिसामान्य आणि बहुतांश अशिक्षित असले तरी आलूचे म्हणणे त्यांना पटते.

आलूने सुचविलेले कल्याणकारी अर्थशास्त्रीय प्रारूप हे प्रतीकात्मक पद्धतीने घेतल्यास लक्षात येते की, तो नकळतपणे साम्यवादी आणि भांडवलवादी या दोन्ही अर्थव्यवस्थांचा प्रमाणशीर मेळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. या नवीन व्यवस्थेमध्ये लोक त्यांना जमेल ते काम, त्यांना जमेल तेवढा वेळ करू शकतील. जो जास्त काम करेल तो जास्त पैसा कमावेल, मात्र अखेरीस मिळालेला पैसा लेखापालाकडे जमा करणे आवश्यक असेल. याने पैसे साठवण्याचे वेड निश्चितच लागणार नाही. आवश्यकता असेल तेव्हा लोक पैसे घेऊ शकतील. तेही एका कागदी पाकिटात मिळतील. बाकी जीवनावश्यक गोष्टींची खरेदी समूहातच करावी लागेल. आलूने सुचविलेल्या प्रारूपात ‘व्यक्तीकेंद्रित भांडवलवादी व्यवस्थे’ऐवजी ‘समाजकेंद्रित मवाळ भांडवलवादी व्यवस्था’ हा पर्याय पुढे येताना दिसतो. या पर्यायी व्यवस्थेत अधिकतम साम्यवाद आणि न्यूनतम भांडवलवाद यांचा मेळ पाहावयास मिळतो.

कादंबरीतील पहिल्या भागात- बलराम हा साथवजा आजारांना कारणीभूत असणाऱ्या जीवघेण्या विषाणूंविरोधात काबरेलिक आम्ल फवारणीचे अभियान राबवतो, तर दुसऱ्या भागात- त्याचा पुतण्या आलू हा भांडवलशाहीमधील पैसारूपी विषाणूच्या विरोधात क्रांतीचे शंख फुंकतो (या भागाच्या शेवटी भांडवलवादी व्यवस्थेकडून ही क्रांती चिरडली जाते). तिसऱ्या भागात कादंबरीचा शेवट होतो. क्रांती चिरडली गेल्यानंतर आलू सहारा वाळवंटातील फ्रें च वसाहत असलेल्या एका छोटय़ा शहरात पळून जातो. भारतीय पोलीस त्याच्या मागावर आहेतच. पोलिसांना शेवटी पटते की, आलू हा दहशतवादी गटाशी संबंधित नाही. त्यानंतर तो भारताकडे येण्यासाठी निघतो.

करोनाच्या पार्श्वभूमीवर घोष यांच्या या कादंबरीच्या प्रासंगिकतेबद्दल लिहायचे, तर आज करोनाविरोधातील पाश्चिमात्य विज्ञानाचे शस्त्र भांबावलेले दिसते. १ मे रोजीच्या आकडेवारीनुसार जगभरात ३३ लाखांहून लोक करोनाबाधित असून, सव्वादोन लाखांहून अधिकांनी जीव गमावला आहे. ही झाली केवळ करोनाची आकडेवारी. याव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या आजारांनी लोक लाखोंच्या संख्येने दिवसाकाठी मरत आहेतच. हे पाहता, विज्ञानाला अधिक जटिल समस्या भविष्यात भेडसावतील. करोनायुक्त वर्तमान भविष्यासाठी संकेत समजायचा का?

सध्याच्या सॅनिटायझर वापराबद्दलच्या आग्रहाकडे पाहिले की, कादंबरीतल्या बलरामचे काबरेलिक आम्लाचे वेड विक्षिप्तपण वाटत नसला, तरी कुठलाही व्यापक विचार न करता घेतलेला तात्पुरता पर्याय आहे असेच वाटते. मात्र हे विचित्र पर्व केवळ काबरेलिक आम्लाने अथवा इतर निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधांनी थांबणार आहे का? यावर पर्याय सापडलाच तरी नवनवीन संकटे यायचे थांबणार नाही. आधुनिक आणि उत्तरआधुनिक जगाने निसर्गचक्राशी मोठी खेळ केला आहे. पाश्चिमात्य विज्ञान आणि विवेकवादातून जन्माला आलेल्या या आधुनिकतेने किती समस्या सोडवल्या आणि किती वाढवल्या, याचा आढावा कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या पाश्चिमात्य परंपरेने आणि त्यातूनच जन्माला आलेल्या भांडवलवाद आणि चंगळवादाने सर्वाचे डोळे झाकून टाकले आहेत. तात्कालिक व्यवस्था शाश्वत उपाय सुचवू शकेल याबद्दल शंका वाटण्यास पूर्ण वाव आहे.

अमिताव घोष हे भूमिका घेणारे लेखक आहेत, मात्र या कादंबरीत ते सरळ सरळ कोणताही एक पर्याय न सुचवता निर्णय वाचकांवर (म्हणजे लोक आणि राष्ट्रांवर) सोडून देतात. आलूने सुचविलेला पर्याय हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय होऊ शकतो. असे अनेक पर्याय पुढे येऊ शकतात. सुप्रसिद्ध इंग्रजी कवी डी. एच. लॉरेन्स यांनी त्यांच्या ‘मनी मॅडनेस’ या भांडवलशाही आणि चंगळवादावर सडकून टीका करणाऱ्या सुप्रसिद्ध कवितेच्या शेवटात म्हटले आहे- आपण पैशाबद्दलचे आपले शहाणपण लवकरात लवकर मिळवणे नितांत गरजेचे आहे, नाही तर लोक एकमेकांच्या नरडीचा घोट घेतील, पैशाचे वेड आणि विनाश ही दोन्हीही एकच आहेत.

‘द सर्कल ऑफ रीझन’ या कादंबरीतून घोष जे सुचवू इच्छितात ते असे की, आपण पाश्चिमात्य विज्ञान आणि विवेकवादाच्या पलीकडे जाऊन शाश्वत मानवी प्रगतीबद्दल मंथन करणे गरजेचे झाले आहे. राष्ट्रांनी एकमेकांशी अनारोग्यदायी स्पर्धा न करता सोबत प्रवास करता येऊ शकतो याबद्दल गांभीर्याने विचार करणे आणि एकमेकांना आधार देत मानवतावादी प्रवास करणे हे जास्त सयुक्तिक ठरेल. तसेच निसर्गाशी जवळीकता साधत प्रगतीची पुनव्र्याख्या आणि पुनर्रचना करावी लागेल. वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने आपल्या भेदभावयुक्त धारणा, चंगळवादयुक्त वर्तवणूक आणि निसर्गविरोधी कृत्ये यांबद्दल स्वत:ला तपासून पाहावे लागेल. त्याने भविष्यातील बऱ्याच संभाव्य संकटांना टाळता येऊ शकेल. किमान येणाऱ्या संकटांना एकदिलाने आणि धीराने सामोरे जाता येईल!

‘द सर्कल ऑफ रीझन’

लेखक : अमिताव घोष

प्रकाशक : पेंग्विन इंडिया

पृष्ठे : ४७२,

किंमत : ४९९ रुपये

anilfkshirsagar31@gmail.com

Story img Loader