साल १८६१. स्थळ मुंबई. इंग्लंडमधल्या फिरत्या नाटक मंडळींबरोबर येथे आलेल्या फेअरक्लॉग या नटाने ‘हॅम्लेट’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. तो पाहण्यासाठी इथला नव्याने इंग्रजी शिकलेला तरुण वर्ग हातात शेक्सपिअरच्या नाटकाचे पुस्तक घेऊन बसला होता. पुस्तक आणि प्रयोग दोहोंच्या साहाय्याने ते शेक्सपिअरशी पहिल्यांदाच परिचय करून घेत होते. तेव्हाच्या ‘बॉम्बे गॅझेट’ने हे सारे विस्ताराने नमूद करून ठेवले आहे. आणि ही सर्व माहिती आली आहे ती- डॉ. कुमुद मेहता यांच्या ‘एकोणिसाव्या शतकातील मुंबईतील इंग्रजी रंगभूमी’ या मुंबई विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधात.
सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये जन्मलेला विल्यम शेक्सपिअर. यंदा त्याच्या जन्माचे चारशेवे वर्ष. पण या स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून आजही शेक्सपिअर सर्वव्यापी उरून राहिला आहे. त्याची नाटकं आजही जागतिक रंगभूमीवर अधिराज्य गाजवत आहेत. मराठी रंगभूमीही त्याला अपवाद नाहीच. एकोणिसाव्या शतकामध्ये वर सांगितल्याप्रमाणे शेक्सपिअरच्या नाटकांचा परिचय झाल्यापासून मराठी नाटकांवर त्याचा प्रभाव आहे. के. रं. शिरवाडकर, रवींद्र किंबहुने, डॉ. आनंद पाटील, प्रभाकर देशपांडे यांच्यासारख्या अभ्यासकांच्या लेखनातून मराठी वाचकांना याची माहिती आहेच.
शेक्सपिअर, नाटक, मुंबई, मराठी रंगभूमी याविषयीचे हे सारं इथे सांगण्याचं कारणही तसेच खास आहे. ते म्हणजे मुंबईतल्या एशियाटिक लायब्ररीच्या लिटररी क्लबने मंगळवारी, २८ फेब्रुवारीला आयोजित केलेले व्याख्यान. ‘शेक्सपिअर इन महाराष्ट्र’ हा त्या व्याख्यानाचा विषय आणि त्यावर बोलणार आहेत पुष्पा भावे. नाटय़भाषा आणि सामाजिकशास्त्रांची स्वत:ची अशी अभ्यासदृष्टी हे भावे यांच्या एकूणच नाटय़विषयक लेखनाचं वैशिष्टय़. ते सर्व अनुभवण्याची संधी एशियाटिक लायब्ररीने आयोजित केलेल्या या व्याख्यानामुळे मिळणार आहे.