आम्लयुक्त पाणी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा ते ओढे, नदी, नाले यांच्यातून वाहात जाऊन जलाशयांत जमा होते. यावेळी तेथील अल्कधर्मी क्षारांशी त्याचा संपर्क आला की पाण्यातील आम्लाचे उदासीनीकरण होते. त्यामुळे पावसाच्या पाण्याची आम्लता कमी असेल आणि मातीत अल्कधर्मी क्षार असतील तर आम्लीय पावसाचे फारसे दुष्परिणाम जाणवत नाहीत. परंतु पाण्याची आम्लता वाढली किंवा जमिनीत असलेल्या अल्कधर्मी क्षारांचे प्रमाण कमी झाले तर मात्र समस्या निर्माण होऊ शकतात.