टाळेबंदीमुळे जालना येथील सळई निर्मिती कारखान्यात उत्पादन थांबविण्यात आल्याने मध्य प्रदेशात पायी जाण्यासाठी निघालेल्या १६ मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

हे सर्व मजूर मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे रुळांवरून चालत होते. रात्रभर चालून थकल्याने ते रुळांवरच झोपले होते. शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास जाणाऱ्या मालगाडीखाली ते चिरडले गेले. औरंगाबाद शहराजवळील करमाड गावाजवळ ही दुर्घटना घडली.

रुळाच्या बाजूस निजलेले तिघे जण यातून वाचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. याशिवाय मजुरांनी हतबल न होता सरकारच्या मदतीच्या आधारेच आपापल्या राज्यांत जावे. यासाठी विविध राज्यांशी आणि केंद्र सरकारशीही समन्वय ठेवला जात असल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले.

सर्व मजूर हे मध्य प्रदेशातील शाहडोल आणि उमरिया जिल्ह्य़ांतील मूळ रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी  मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली .

अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश सरकारचे प्रमुख अधिकारी विशेष विमानाने औरंगाबाद येथे आले. यामध्ये मध्य प्रदेश सरकारमधील आदिवासी कल्याणमंत्री मीणासिंग व मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. अपघातामधील  मृतदेह  जबलपूरला जाणाऱ्या रेल्वेला  स्वतंत्र डबे जोडून  नेले जाणार आहेत.  त्यांच्याबरोबर अपघातातून वाचलेले दोघे जण असतील.

मानवाधिकार आयोगाकडून नोटिसा

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) या दुर्घटनेची दखल घेत शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी यांना नोटिसा जारी केल्या. या घटनेबाबत ४ आठवडय़ांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

झाले काय?

जालना येथील सळई उद्योगांमधील २० मजूर औरंगाबादच्या वाटेने मध्य प्रदेशमधील आपल्या गावाकडे निघाले होते. सर्वानी रेल्वे रुळांवरून पायी प्रवास करीत काही अंतर कापले. गुरुवारी मध्यरात्री हे मजूर करमाड गावाजवळील साटाणा शिवारजवळ आले आणि त्यांनी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि तेथील रुळांवरच ते झोपले. पहाटे पाचच्या सुमारास गाढ निद्रेत असताना १६ जणांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने सर्वाच्या देहाच्या चिंधडय़ा उडाल्या.