अपर पोलीस महासंचालकांचे आदेश

औरंगाबाद:  राज्यातील  तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने करोना संसर्गाची  स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत.  ४६ कारागृहांची बंदिवान ठेवण्याची क्षमता २३ हजार २१७ एवढी असून सद्याच्या स्थितीमध्ये ३४ हजार ८९६ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा ११ हजार ६७९ कैदी अधिक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कारागृहात संसर्ग वाढू शकतो असे लक्षात आले असल्याने आरोपीची अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे निर्देशित करण्यात आले आहे.

करोना संसर्ग वाढत असल्याने  एप्रिल महिन्यापर्यंत २ हजार ६६४ जणांना तातडीने पॅरोल मंजूर करण्यात आले होते.  नाशिक, औरंगाबाद, येरवडा, पैठण येथील खुले कारागृह येथून तीनशेपेक्षा अधिक जणांना सुटीवर जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अजूनही तुरुंग भरलेले आहेत. सर्वाधिक कैदी पुणे  येथील येरवडा कारागृहात असून या कारागृहाची क्षमता २४४९ असून सध्या या कारागृहात सहा हजार ८८ कैदी आहेत. अशीच स्थिती  सातारा, कोल्हापूर , सांगली, सोलापूर, मुंबई, ठाणे, तळोजा, कल्याण येथील कारागृहांतील संख्या क्षमतेपेक्षा खूप अधिक आहे. अशा स्थितीमध्ये करोना संसर्ग झाला तर आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येईल हे लक्षात घेऊन अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे आदेश बजावण्यात आले आहेत. या अनुषंगाने बोलताना एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, सर्वसाधारणपणे अटक केलेल्या आरोपीस आता पोलीस कोठडी मिळत आहे. त्यामुळे अधिक काळापर्यंत कारागृहात व्यक्ती ठेवण्याची वेळ येत नाही.  अटक करण्याची एक प्रक्रिया असते. कायद्याप्रमाणे ती प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पण अत्यावश्यक असेल तरच अटक करा, असे आदेश देण्यात आले आहेत.