इंजेक्शनच्या फेरवाटपाबाबत आरोग्य विभागाशी चर्चा; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

औरंगाबाद : करोनातील दुसऱ्या लाटेतील मृत्युदराबरोबरच म्युकरमायकोसिसमुळे  झालेले मृत्यू चिंताजनक असल्याचे सोमवारी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यत ३४५ म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ६०८ रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळले असून त्यापैकी २०६ जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५७ मृत्यू झाले आहेत.  या रुग्णांना आवश्यक उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनच्या फेरवाटपाबाबत आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी नुकतीच चर्चा झाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत सोमवारी सांगितले.

दरम्यान औरंगाबाद शहरातून ४०० विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाणार असून त्यांचे लसीकरण लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिली. आमदार अतुल सावे यांनी परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने करण्याची मागणी केली होती.

म्युकरमायकोसिस इंजेक्शनच्या वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत सोमवारी करण्यात आली.  म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असून या आजाराची स्थिती चिंताजनक असल्याने हा आजार होऊ नये आणि झाल्यास तत्परतेने औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जनजागृती केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोविड रुग्णांची संख्या  कमी होत असली तरी फेब्रुवारी २०२१ पासून ५.१ टक्के दर असल्याचे सांगण्यात आले. नव्या नियमानुसार उद्यापासून काही निर्बंधही शिथिल होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यत ३६० रुग्णवाहिका, मुबलक प्रमाणात आवश्यक खाटांची उपलब्धता, गृहविलगीकरण, प्राणवायू साठवण क्षमता, प्राणवायू सिलिंडर रिफिलिंग आदीबाबतही प्रशासन दक्ष असल्याचा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला.

बैठकीस खासदार भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ आदींची उपस्थिती होती.