औरंगाबादमधील करोनामुक्त डॉक्टरचा अनुभव

औरंगाबाद : करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच आता कुटुंबातील सदस्यांना बाधा होणार नाही ना, यासह अनेक प्रश्नांचे काहूर माजले. मात्र, कुटुंबातील सर्वाच्या चाचणीचे नकारात्मक अहवाल आल्यानंतर आणि समुपदेशनातून मानसिक बळ मिळाले. त्यानंतर पथ्ये पालनानंतर काही दिवसांतच करोनावर मात केली, असा अनुभव औरंगाबादमधील एका करोनामुक्त डॉक्टरने सांगितला.

शहरात हे डॉक्टर खासगी वैद्यकीय व्यवसाय करतात. भारतात करोनाचा फारसा प्रसार नव्हता तेव्हा एक महिला रुग्ण त्यांच्याकडे आली होती. त्या वेळी या महिलेने घरातल्या व्यक्तींनी कुठे परदेश प्रवास वगैरे केला का, याबाबतची माहिती दिली नव्हती. पुढे तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉक्टरांसह तिच्या संपर्कातील सर्वाची करोना चाचणी करण्यात आली. त्यात हे डॉक्टरही करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

आपल्याला करोना झाला. मात्र, आता आपल्या घरच्यांचे काय, असा प्रश्न सतावू लागला. ५ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीत सारे जग अंधकारमय भासू लागले. मात्र, सहा वर्षांची मुलगी आणि ७० वर्षांच्या आईसह घरातील कोणालाही लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोठा धीर मिळाला. करोना आपले काही बिघडवणार नाही, असा विश्वास निर्माण झाला. पहाटे पाच वाजता प्राणायाम, योगा आणि पथ्यांचे पालन करत होतो, असे या डॉक्टरांनी सांगितले.

समुपदेशनाची साथ

या काळात जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी समुपदेशन केले. सरकारी रुग्णालयात भरती व्हावे की नाही, याबाबतही शंका होत्या. पण या रुग्णालयात अतिशय चांगली काळजी घेतली जाते. उपचाराबरोबरच समुपदेशनातून मानसिक कणखरता लाभली आणि या आजारावर मात केली, असे या करोनामुक्त डॉक्टरने सांगितले.

Story img Loader