औरंगाबाद : जाधववाडी बाजार समितीतील भाजीचा असो की शहागंजमधील फळांचा बाजार असो, नागरिकांची गर्दी काही केल्या हटायचे नाव घेत नाही. हजार-पाचशे लोकांच्या समूहाने होणारी ही गर्दी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत असून त्यावर आता ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
औरंगाबादमधील अनेक नागरिक भाजी बाजारात, फळ बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. शनिवारी शहागंजमधील फळ बाजारातही खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली स्थिती होती. दुपारच्या रणरणत्या उन्हातही ही गर्दी ओसरताना दिसली नाही. शहरात दुपारी दीड वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू केलेली असतानाही काही भागात नागरिक घराबाहेर पडून फळे, भाजी खरेदी करताना दिसत आहेत.
जाधववाडीसह इतरही ठिकाणी महापालिकेच्या मोकळ्या मैदानांवर भाजी-फळ विक्रीची मुभा देण्यात आली असली तरी करोना विषाणू फैलावणार नाही, याची खबरदारी न घेताच तेथेही नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. करोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका दिवसेंदिवस औरंगाबादेत वाढत असून बाधितांची संख्या ५१ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे वाढती गर्दी रोखण्याचे एक आव्हान पोलीस व महानगरपालिका प्रशासनापुढे राहिले असून या पार्श्वभूमीवर आता पोलीस आयुक्तालयाकडून ड्रोन फिरवण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले की, मुंबईहून चांगल्या प्रकारचे ड्रोन मागवण्यात आलेले आहेत. विशेषत ज्या भागात गर्दी होते तेथे ड्रोन फिरवून लक्ष ठेवले जाणार आहे. काही भागात दुपारनंतरही नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. बंदोबस्तावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांची तपासणीही करून घेण्यात येत आहे. त्यासाठी महानगरपालिकेकडून तपासणीसाठी एक चमू मिळालेला आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे स्क्रिनिंग करण्यात आलेले आहे. त्यांना मास्क, सॅनिटायझर्स देण्यात आलेले आहेत. शिवाय होमिओपॅथीच्या औषधांचा दुसराही डोस देण्यात आलेला आहे. पहिला डोस एक महिन्यापूर्वी दिलेला आहे. पोलीस कर्मचारी दिवसा-रात्रीच्या सत्रातही आपले कर्तव्य निभावत असून अनेक कठीण प्रसंगातही त्यांना भूमिका निभावावी लागते. त्यामुळे कुटुंबीयांचीही काळजी घेतली जात आहे.