मुस्लिमांविना भाजपविरोधातील आघाडी अशक्य; खासदार जलील यांचा दावा

औरंगाबाद : मुस्लिमांविना भाजप विरोधी आघाडी उभी करता येणे अशक्य आहे. शरद पवार जम्मू-काश्मीरचे फारुक अब्दुला यांना घेऊन गणित जुळवता येते का हे पाहत आहेत. पण मुस्लिमांचा पाठिंबा एमआयएमला आहे, हे त्यांना माहीत नसेल तर त्यांनी एकदा औरंगाबादला आल्यावर आपल्यामागे किती येतात हे कळेल, असा टोला लगावत खासदार  इम्तियाज जलील यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात निवडणुकांसाठी जोरदार तयारी करणार असल्याचे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या दोन्ही राज्यात किती जागांवर निवडणुका लढविणार हे अद्याप ठरले नसले तरी केवळ उत्तर प्रदेशच नाही, तर दिल्लीतही निवडणुकांमध्ये उतरू, कारण आम आदमी पार्टी आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका त्यांनी केली.

बिहारच्या सीमांचल भागात यश आल्यानंतर पश्चिम बंगालमध्येही इजलिस- ए-इत्तेहादुल मुसलमीन ( एमआयएम) निवडणुकांमध्ये उतरेल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ऐनवेळी निवडणुकीतून या पक्षाने माघार घेतली. आता उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये पक्ष जोरदारपणे उतरेल तसेच दिल्ली येथेही निवडणुकीत उतरणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय सूची  नोंदी आणि राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलना दरम्यान आणि त्या दरम्यानच्या हिंसाचाराच्या वेळी आम आदमी पार्टीने पक्षपाती भूमिका घेतली होती. भाजप आणि ‘आप’ एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका करत दिल्ली निवडणुकीत उतरणार असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.  राष्ट्रीय मंचच्या वतीने भाजप विरोधी आघाडी करताना ती मुस्लिमांविना होणार नाही, असे स्पष्ट करून शरद पवार आणि फारुक अब्दुला असे समीकरणही  राष्ट्रीय राजकारणात चालणार नाही. जर राष्ट्रवादीला मुस्लीम समाजातील ताकद आजमावयाची असेल तर शरद पवार यांनी औरंगाबादचा दौरा करावा, त्यात किती मुस्लीम मागे येतील हे पाहावे, असेही ते तिरकसपणे म्हणाले.

Story img Loader