राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन औरंगाबाद शहरात पुरोहित आणि संभाजी ब्रिगड यांच्यात जुंपली आहे. ब्राह्मण आणि हिंदू परंपरांचा अपमान केल्याचे सांगत ब्राह्मण महासंघ आणि पैठणमधील पुरोहितांनी या चित्रपटाला दर्शवला होता. या सर्व प्रकरणात चित्रपटाच्या बाबतीत एका दिवसात निर्णय देणे शक्य नसल्याचे सांगत न्यायालयाने हस्तक्षेप करणे टाळल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे ‘दशक्रिया’ प्रदर्शित होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं.
शुक्रवारी औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलच्या चित्रपटगृहात ‘दशक्रिया’चा पहिला शो प्रदर्शित करण्यात आला. मात्र, चित्रपटाला विरोध करत पुरोहितांकडून शो बंद पाडण्यात आला. मात्र, यावेळी संभाजी ब्रिगेडने चित्रपटाच्या प्रदर्शनाला संरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाले.