औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 24 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३२१ झाली आहे. यातील दहा जणांचे मृत्यू झाले असुन २४ जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

जयभीम नगर (२१), अजब नगर (१), संजय नगर (१), बौद्ध नगर (१), या परिसरातील २४ नवे रूग्ण आढळले आहेत. यामध्ये १४ पुरूष आणि दहा महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. २७ एप्रिलपासून शहरात दररोज २० पेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्यामुळे दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.

औरंगाबादमध्ये १५ मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर मागील दीड महिन्यात ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलपासून २९,२७,२१,४९,३९, ४०, २७, १४, २४ अशी दर दिवशी अनुक्रमे रूग्णांमध्ये वाढ झाली.

भ्रमणध्वनीद्वारे हालचालींवर लक्ष

करोनाबाधितांकडून कोण कोणाच्या संपर्कात आले होते,याची माहिती काढून घेणे हे काम जिकिरीचे बनत असल्याने आता सर्व बाधित रुग्णांच्या हालचाली भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या माध्यमातून मिळविल्या जात आहेत. विषाणूचा सुप्त अवस्थेतील कालावधी १४ दिवसाचा असल्याने तो व्यक्ती नक्की कोठे फिरला याची माहिती प्रत्येकाच्या लक्षात राहणे शक्य नसते. काही भागातून माहिती देण्यास विरोधही होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येत होते. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यावरुन कोण कोणाच्या संपर्कात होते, याची यादी केली जात असून त्या आधारे लाळेचे नमुने घेतले जात आहेत. जास्तीत जास्त चाचण्या करुन बाधितांना शोधणे आणि त्यांच्यावर उपचार केला तरच हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत अवलंबली जात असल्याचे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

विषम दिवशी पूर्ण बंद

रुग्णसंख्या वाढत असल्याने टाळेबंदी अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ३ मे पासून ते १७ मे या कालावधीमध्ये विषम तारखेस शहर पूर्ण बंद राहणार असून सम तारखांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ११ पर्यंतच मुभा देण्यात आली आहे. यामध्ये औषधी दुकाने तेवढी वगळण्यात आली आहेत. या कालावधीशिवाय कोणी फिरताना आढळल्यास गाडी जप्त करुन गुन्हे दाखल केले जातील. तसेच ड्रोनच्या माध्यमातूनही पाहणी केली जाणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी कळविले आहे.

Story img Loader