चारा छावण्यांमध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर असतानाही छावण्यांच्या मागणीसाठी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाचा सुळसुळाट सुरू आहे. प्रशासनाविरोधात लोकसेवकांचे आंदोलन आणि चारा छावणीचालकांविरोधात प्रशासनाची कुरघोडी असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मागील आठवडय़ात झालेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर एकटय़ा भूम तालुक्यातील ८ चारा छावण्यांना दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने मान्यता दिलेल्या छावण्यांत दैनंदिन विविध शासकीय योजनांची माहिती देणे, छावणीत जनावरांची तपासणी, या बरोबरच पशुपालकांचीही भूम तालुक्यात आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय पशुपालकांना या छावणीत त्यांनी त्यांची जनावरे दाखल करावीत, या साठी स्वागत अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यास पशुपालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र, या बरोबरच मान्यता देऊनही ज्या छावणीमालकांनी पशुधनाची व्यवस्थित जोपासना केली नाही अथवा त्यांना ठरवून दिलेल्या निकषांचे पालन केले नाही, अशा छावणीमालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. भूम तालुक्यातील आठ छावण्यांना प्रशासनाने निकषांची पूर्तता न केल्याप्रकरणी दंड ठोठावला.
टंचाई स्थिती लक्षात घेऊन आणि चाऱ्याची उपलब्धता पाहून मंडळनिहाय व तेथील पशुधन विचारात घेऊन प्रशासनाने छावण्यांना मंजुरी देण्याचे धोरण स्वीकारले. या धर्तीवर आवश्यक त्या ठिकाणी छावण्यांना मंजुरीही देण्यात आली. सध्या ३१ छावण्यांना भूम तालुक्यात मंजुरी देण्यात आली.
यांना ठोठावला दंड
छावणीचे सर्व प्रकारचे रेकॉर्ड, शेड उभारणी, जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यात बदल न करणे, झोला आणि हायड्रोफोनिक्स नसणे, कडबाकुट्टी नसणे, चाऱ्याची रक्कम धनादेशाने न वाटणे, विजेची सोय नसणे, चारा कार्ड अद्ययावत न ठेवणे, शेणाची विल्हेवाट आणि जनावरांची वाढीव संख्या दाखवणे अशा कारणांवरून चारा छावणीमालकांना दंड ठोठावण्यात आला. हांडोग्री येथील चारा छावणीस ७८ लाख ७७ हजार ६३४ रुपये, वडमाऊली येथील छावणीस २२ लाख ६२ हजार ७३२ रुपये, कपिला चारा छावणी ८ लाख ३२ हजार ९७४ रुपये, ज्योतिबाचीवाडी येथील छावणीस २५ लाख ४६ हजार ८३५ रुपये, आंदरुड येथील चारा छावणीस ६ लाख ६३ हजार ६३२ रुपये, हिवर्डा येथील छावणीस ६ लाख ७६ हजार ५४४ रुपये, जेजला येथील छावणीस ६ लाख ६९ हजार २३७ रुपये आणि आनंदवाडी येथील छावणीस ५ लाख ८४ हजार ५१९ दंड आकारण्यात आला.

Story img Loader