लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांसाठी ६४४ परीक्षा केंद्र आहेत. तर १ लाख ८८ हजार ७७७ नियमित विद्यार्थी असल्याची माहिती मंडळाकडून मिळाली.
छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना व हिंगोली या पाच जिल्ह्यातील २ हजार ७३७ शाळांच्या संख्येतून ६४४ परीक्षा केंद्र असून, यासाठी ६४ परिरक्षक केंद्र राहणार आहे. २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत परीक्षा चालणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९५३ शाळांसाठी २३८ परीक्षा केंद्र आणि २२ परिरक्षक केंद्र आहेत. यामध्ये ६७ हजार ९७८ नियमित विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बीडमध्ये ६७३ शाळांसाठी १५६ परीक्षा केंद्र असून, १५ परिरक्षक केंद्र, तर ४२ हजार ७२८ विद्यार्थी आहेत. परभणीत ४५२ शाळांसाठी ९४ परीक्षा केंद्र तर १० परिरक्षक केंद्र राहणार असून, २९ हजार ६७६ विद्यार्थी असतील. जालन्यात ४२१ शाळांसाठी १०२ परीक्षा केंद्र, तर ११ परिरक्षक केंद्र आहेत. तसेच ३२ हजार २४३ विद्यार्थी असतील. हिंगोलीत २३८ शाळांसाठी ५४ केंद्र असून, ७ परिरक्षक केंद्र आहेत. तर १६ हजार १५२ विद्यार्थी असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथके परीक्षेच्या आधी एक तास व नंतरही एक तास उपस्थित राहतील. शिक्षण विभागाची ७ भरारी पथके केंद्रांना भेटी देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. महसूल विभागाची १० पथके, तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय संपर्क अधिकारी म्हणून खाते प्रमुखांच्या नेमणुका केल्या आहेत. केंद्रांवर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनीही भेटी देण्याचे नियोजन आहे. ज्या केंद्रांवर वस्तुनिष्ठ प्रश्न सांगण्यात येतील तेथील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त राहणार असून, केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही. तर कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.