डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेतील निकालांमध्ये घोळ

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तरच्या ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांच्या निकालात घोळ झाल्याचा आरोप होत असून बी. कॉम प्रथम वर्षांच्या १३ हजार ३०५ पैकी ११ हजार १२१ विद्यार्थी एकाच विषयात अनुत्तीर्ण झाल्याकडे विद्यार्थी संघटनांनी लक्ष वेधले आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निकालातील घोळ मिटवण्याची मागणी केली आहे.

भारतीय विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची विद्यापीठातील त्यांच्या दालनात भेट घेतली. पदवी, पदव्युत्तर परीक्षांच्या निकालातील घोळ दूर करण्याची त्यांनी मागणी केली. यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निकालात घोळ असल्याकडे लक्ष वेधून एका विद्यार्थ्यांला एकाच परीक्षेचे तीन-तीन गुणपत्रक प्राप्त झाल्याचे उदाहरण निवेदनातून मांडले. भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ यांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेने केलेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या. प्रशासनाने विद्यार्थ्यांचा छळ बंद करावा. अन्यायग्रस्त सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व आदर्श उत्तरतालिका मोफत द्याव्यात, परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, हनुमान शिंदे, संदीप लिंगायत आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे सराफ यांनी सांगितले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन दिले आहे. अभाविपने निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाने बी. कॉम प्रथम वर्षांचा निकाल तीनवेळा लावला आहे. पहिल्या निकालात सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण, नंतर उत्तीर्ण व आता पुन्हा अनुत्तीर्ण केले असून हा घोळ मिटवून दोन दिवसात सुधारित निकाल लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Story img Loader