चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी वाळूज परिसरातील सिडको महानगर १ येथे ही घटना घडली आहे. ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरात टीव्हीवर चित्रपट सुरु होता. सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात विकासचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.
वाळूज परिसरात राहणाऱ्या विकास मछिद्र पवारला (वय ११ वर्ष) दोन बहिणी आहेत. त्याचे आई- वडील औद्योगिक वसाहतीत नोकरीला आहेत. बुधवारी सकाळी ते कामावर गेले होते. तर दोन्ही बहिणी शाळेत गेल्या होत्या. विकास घरी एकटाच होता.
संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास दोन्ही बहिणी शाळेतून घरी आल्यावर विकासने ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला असल्याचे त्यांनी पाहिले. लहान भावाला अशा आवस्थेत पाहून दोन्ही मुली भेदरल्या, त्यांनी लागलीच वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. वडिलांनी तातडीने घरी पोहोचत विकासला फासावरून खाली उतरवत हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता.
विकासने आत्महत्या केली की हा अपघात होता, याबाबत संभ्रम कायम आहे. घरातील टीव्हीवर चित्रपट सुरु होता, या चित्रपटातील एखाद्या दृष्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न विकासने केला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश आंतरप हे करीत आहेत.