छत्रपती संभाजीनगर : एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या आठ हजार मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्यानंतर ७५ हजार रुपयांपेक्षा पाणीपट्टी थकलेल्या चार हजार ८२४ नळजोडणीधारकांची यादी काढण्यात आली आहे. त्यांच्याकडे १२१ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. पाणीपट्टीची ही थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कारवाई केली जाईल असे मालमत्ता करनिर्धारक व संकलक अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मालमत्ता कराच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी पाचशे कोटी रुपये करवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी झोननिहाय पथक स्थापन करून दैनंदिन वसुलीचा आढावा घेतला जात आहे. एक लाखापेक्षा अधिक मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या शहरातील ८ हजारापेक्षा अधिक मालमत्ताधारकांना नियमाप्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मालमत्ताधारकांची प्रकरणे विधि प्राधिकरणाकडे सादर केली आहेत. या कारवाईच्या धास्तीने साडेपाचशे मालमत्ताधारकांकडून ७ कोटीची कराची वसुली झाली आहे. त्यापाठोपाठ आता ७५ हजार रुपयापेक्षा अधिक पाणीपट्टी थकबाकी असलेल्या नळकनेक्शनधारकांची झोननिहाय यादी काढण्यात आली आहे.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दहा महिने उलटूनही कराची वसुली अपेक्षित झालेली नाही. गुगल शीटवरून बहुतांश कर्मचाऱ्यांची वसुली समाधानकारक नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासकांनी दिला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत साधारणपणे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची वसुली होईल असे ठरविले जात आहे.