छत्रपती संभाजीनगर: चांगले काम करूनही  मला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. तेव्हाच आपण यापुढे ‘मातोश्री’ची पायरीही चढणार नसल्याची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाहीररीत्या पहिली बंडखोरी आपण केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि शिवसेनेतील आमदारांचे मत परिवर्तन करण्यासाठी राज्यात तब्बल १५० बैठका घेतल्या. सोबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंनेही त्यासाठी मोठी साथ दिली होती. त्यामुळेच ठाकरे सरकार वळविण्यात आपल्याला यश मिळाले, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान सावंत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी आपण व्यूहरचना आखली असल्याचा जाहीररीत्या गौप्यस्फोट  केला. उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असतानाही शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. आणि जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही मला स्थान दिले नाही. त्यामुळे मी मातोश्रीवर जाऊन त्यांनाह्ण सांगून आलो की मी आता पुन्हा  पायरी चढणार नाही.  मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यातूनही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दूर ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन व आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला राज्यात पहिली  बंडखोरी केली. भाजपच्या साथीने जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सलग दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास १००-१५० बैठका झाल्या.

या काळात विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना सर्व काही स्पष्ट सांगून त्यांचे मतपरिवर्तन केले.  महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आपला कसलाही सहभाग नव्हता असा दावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात होता तो दावाही सावंत यांच्या या गौप्यस्फोटामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. फडणवीस यांच्या आदेशानेच हे घडत होते असे सांगत मंत्री सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 150 meetings in two years to the topple thackeray government health minister tanaji sawant ysh