केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी या वर्षी रेल्वे अंदाजपत्रकात केवळ २०० कोटींच्या तरतुदीवरच बोळवण झाली. हा मार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचे भाजपचे नेते सांगत असले, तरी या वर्षी झालेल्या तरतुदीवरून हा मार्ग कसा पूर्ण होणार? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
तब्बल वीस वर्षांपासून रखडलेल्या या मार्गावर केवळ तेरा किलोमीटर अंतरापर्यंत रुळ अंथरण्याचे काम झाले. मागील वर्षभरात कामाने गती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातल्यामुळे या मार्गाला पसा कमी पडणार नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
बीड जिल्ह्यासाठी तब्बल २० वर्षांपासून स्वप्न ठरलेल्या परळी-बीड-नगर या २६१ किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून अर्धा खर्च करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी केंद्र सरकारच्या रेल्वे अंदाजपत्रकात होणाऱ्या तरतुदीप्रमाणेच राज्य सरकार निधी देणार आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या पुढाकारातून मागील वर्षी राज्य मंत्रिमंडळात २ हजार ८०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली. मागील वर्षभरात ३०० कोटींच्या निविदा निघून बीड आणि नगर या दोन्ही बाजूंनी कामाला सुरुवात झाली. भाजपचे नेते २०१९ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे सांगत असल्यामुळे या वर्षी अंदाजपत्रकात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाच्या अंदाजपत्रकात या मार्गासाठी केवळ दोनशे कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यानुसार राज्य सरकार दोनशे कोटी रुपये देणार असल्याने या वर्षांत एकूण चारशे कोटी रुपये मिळणार आहेत. या गतीने तरतूद झाली तर तीन वर्षांत या रेल्वेमार्गाचे काम कसे पूर्ण होणार? हा प्रश्नच आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना मिळालेली तरतुदही पुन्हा एकदा निराशाजनक आहे.
अपेक्षा पूर्ण करणारे रेल्वे अंदाजपत्रक – खासदार मुंडे
परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी यावर्षी रेल्वे अंदाजपत्रकात दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने राज्य सरकारचे मिळून चारशे कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. मागील वर्षी या कामावर १५९ कोटी खर्च झाला असल्याने आता या कामाला चांगली गती मिळेल. या वर्षीचे अंदाजपत्रक प्रवासी व मालवाहतुकीच्या दरात कोणतीही वाढ नसल्यामुळे सामान्य माणसांच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे.
जुन्याच कढीला ऊत – धनंजय मुंडे
रेल्वे अंदाजपत्रकात यावर्षी काहीही नवीन तरतूद नसल्याने जुन्या कढीला ऊत असून फक्त वायफाय देणारे बजेट आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना केवळ परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी झालेली तरतूद नाममात्र असल्याने या रेल्वेमार्गाच्या कामाला गती कशी मिळणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाची यंदाही २०० कोटींवर बोळवण
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी या वर्षी रेल्वे अंदाजपत्रकात केवळ २०० कोटींच्या तरतुदीवरच बोळवण झाली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-02-2016 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 cr railway route of parli beed nagar