छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील विठ्ठल ढमाले पाटील यांच्यासह धोंदलगाव व परिसरातील शेतकरी खूश आहेत. कारण त्यांना आता दिवसा वीज मिळू लागली आहे. धोंदलगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाला आहे. ते म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून रात्री शेतात पाणी द्यायला थांबावे लागत नाही. परिणामी साप चावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे सारे एका गावापुरते मर्यादित राहिलेले नाही. मराठवाड्यात मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनीच्या ५२ प्रकल्पांतून २२५ मेगावॉट वीजनिर्मितीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तसेच ‘कुसुम’ योजनेंतर्गत ९६ हजार ७९५ शेतकऱ्यांना सौरपंपही देण्यात आले आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. खरे तर कृषी वाहिनी योजनेतून अजून ८८६ प्रकल्पांतून २ हजार ३५६ मेगावॉट वीज निर्मितीसाठीचे इरादापत्र देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांकडून वीजदेयक भरलेच जात नसल्याने महावितरणचे मोठे नुकसान होत होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सौर वाहिनी करून शेतीचे पाणी सौर ऊर्जा प्रकल्पातून उपसा व्हावे, या हेतूने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. राज्यात सुमारे २२ टक्के वीज शेतीसाठी लागते. त्याचे सुमारे ४५ लाख ग्राहक आहेत. दोन ते १० मेगावॉट ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात वैजापूर तालुक्यात सौर कृषी वाहिनीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. आता त्याची व्याप्ती वाढत आहे. या योजनेत सर्वाधिक सौर प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. मात्र, त्याच्या कामाचा वेग कमी असल्याचे दिसून येत आहे. मार्च २०२६ पर्यंत राज्यात १ हजार ६०० हजार मेगावॉट वीजनिर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. जालन्यातील खांडवी भागातील प्रकल्पातून आता १ हजार १८० कृषी पंपाना वीजपुरवठा केला जात आहे. सिल्लोड तालुक्यातील रहिमगड भागातील ९००, वैजापूर तालुक्यातील बाहेगावसह अनेक ठिकाणी आता कृषी पंपाना वीजपुरवठा केला जात आहे. याचे सकारात्मक परिणाम काही भागांत दिसू लागले आहेत.
कृषी सौरपंपामध्येही अनेक शेतकऱ्यांना पात्र ठरविल्याने बऱ्याच गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. धोंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गौरव कदम म्हणाले, की गेल्या वर्ष-दीड वर्षात या केंद्रामध्ये सर्पदंशाचे प्रमाण तसे दिसले नाही. नांदेड जिल्ह्यात मुखेड परिसरात सर्पदंशावर उपचार करणारे निष्णात डॉ. दिलीप पुंड यांनी मात्र, सर्पदंशावर उपचार करावे लागणारी संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असे म्हणता येणार नाही असे सांगितले. पण सध्या भारनियमन किंवा वीजकपात होत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गेल्या दोन वर्षांतील सर्पदंशाची आकडेवारी तपासली असता त्यातही फारशी घट झाल्याचे दिसून आले नाही. मात्र, जून ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये सर्पदंशाचे वाढते प्रमाण पुढील वर्षात लक्षात येईल, असा दावा केला जात आहे.