औरंगाबादमध्ये करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच चालाल आहे. शहरातील पाच भागात २३ नवे करोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. २३ नव्या रूग्णांसह शहरातील करोनाबाधितांची संख्या २३९ वर पोहचली आहे. शनिवारी सकाळी २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये नूर कॉलनी पाच, बायजीपुरा ११, कैलाशनगर तीन, समतानगर दोन, जयभीमनगर येथील दोन रूग्णांचा समावेश असल्याचे डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

शुक्रवारी दिवसभरात ३९ रूग्णांची वाढ झाली होती. आज शनिवारी त्यात २३ जणांची भर पडली. शुक्रवारपर्यंत औरंगाबादमघ्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील दोघांना लागण

शहरातील चिकलठाणा भागात व मसनतपूर भागातील दोघेही जिल्हा रुग्णालयात काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता करोनाची बाधा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही झाल्याचे पुढे आले आहे. भवानीनगर वॉर्डातील दत्तनगरमधील वाहनचालकासही करोनाची लागण झाल्याने या सर्वाच्या संपर्कातील ७० जणांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती कोविड कार्यबल गटाच्या प्रमुख अ‍ॅड. अपर्णा थिटे यांनी दिली. परभणी येथून गारखेडा भागात आलेल्या व्यक्तीस शोधण्याचा दूरध्वनी परभणी प्रशासनाकडून आल्यानंतर इंदिरानगर भागात तिचा शोध घेण्यात आला. मात्र, तिचा शोध लागला नाही. मात्र, तिच्या संपर्कातील पाच जणांचेही विलगीकरण करण्यात आले.

८१ कोटीचा निधी

दुपारनंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी करोना विषयक आढावा घेऊन पोलिसांनी ज्या भागात रुग्ण आहेत तिथे अधिक कडक टाळेबंदी करावी. दरम्यान, जिल्हा आराखडय़ातील ८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. औरंगाबादमधील शेंद्रा आणि वाळूज या दोन्ही औद्योगिक वसाहतींमधून उत्पादनाचा नवा आदर्श घडविण्याचा विचार आहे. तसे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून केले जात असल्याचेही सुषाष देसाई म्हणाले.