बिपिन देशपांडे

औरंगाबाद शहरातील प्रत्येक भागातून फिरताना एक पाटी दर पाच-दहा घरांच्या अंतराने हमखास पाहायला मिळेल. ‘‘घर भाडय़ाने/किरायाने देणे आहे’’ किंवा ‘‘टू लेट’’, अशा पाटय़ा नजरेसमोर येत जातात. आमची घरे ओस पडली आहेत, तुम्ही राहायला या, अशी सादच त्या घालताना दिसत असून घरमालक, दुकानमालकांचे हे ‘रिकामपण’ अस्वस्थ शहराचे वर्तमानच सांगत आहेत. शहरातील २५ ते ३० टक्के घरांमधील खोल्या भाडेकरूविना रिकाम्या असून १५ ते २० टक्के दुकानेही शटरबंद अवस्थेत आहेत.

करोनाच्या संकटात अर्थकारणाची सारी चाकेच खिळखिळी करून टाकली. सामान्य माणूस चोहोबाजूने खिंडीत पकडला गेला. नोकरी गेली. भाडय़ाने राहणाऱ्यांना घरभाडे देणेही दुरापास्त झाले. घरमालकही अडचणीत सापडले. निव्वळ घरभाडय़ावर अर्थार्जन असलेले तर अधिकच कोंडीत सापडले असून काहींचे भाडे थकीत आहे तर काहींचे भाडेकरू शहर सोडून गावी परतले आहेत. काही घरमालक मिळेल त्या भाडय़ात समाधान मानून घेत आहेत. शहराचे अर्थकारण अजूनही सुरळीत झाले नसल्याचेच हे सारे निदर्शक आहे.

औरंगाबाद शहराचे अर्थकारण हे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रावर बरेचसे अवलंबून आहे. अनेक उद्योग बंद आहेत. कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अनेक परप्रांतीय कामगार आपआपल्या गावी परतले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लॉ सह इतरही खासगी विद्यापीठांसारख्या शैक्षणिक संस्था, खासगी शिकवण्या घेणाऱ्या संस्थांच्या टोलेजंग इमारतीमधून चालणारे शिक्षण, यासाठी विद्यार्थी, त्यांचे पालक औरंगाबादेतच स्थलांतरित होतात. औद्योगिक, शैक्षणिक संस्थांच्या आसपासच्या भागात किरायाने घर करून राहणारा हा वर्ग आता शहरात वास्तव्यास नाही. मागील सहा महिन्यांपासून गावी परतलेले नागरिक, विद्यार्थी अद्यापही शहरात परत येण्याचा विचार करत नाहीत. परिणामी येथे ते राहात असलेली घरे ओस पडलेली आहेत.

परप्रांतात गेलेली माणसे आपल्या गावातूनच फोन करून घरभाडे देणे होणार नाही म्हणून घरमालकाला सांगतात. नोकरी गेलेल्यांनीही पुन्हा नोकरी मिळून पैसा हाती येत नाही तोपर्यंत घरभाडे देणे जमणार नाही, असे स्पष्टपणे मालकांना सांगितले जात आहे. शाळा, महाविद्यालये, उद्योगांचे चक्र पुन्हा गतिमान होणार नाही तोपर्यंत शहरातून त्यांच्या-त्यांच्या गावी गेलेली मंडळी येथे येऊन वास्तव्य करणार नाहीत. आमच्यासारख्यांनाही तेव्हाच दिलासा मिळेल, असे घर-दुकाने किरायाने-भाडय़ाने देणाऱ्या व्यवसायातील मंडळींचे म्हणणे आहे.

घरमालक अस्वस्थ

एका ज्येष्ठ व्यक्तीचे घर येणाऱ्या भाडय़ावरच चालते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या घराच्या खोल्या रिकाम्या आहेत. वयोमानपरत्वे आजारही आहेत. जवळ पैसा नाही. अशावेळी शेजार-पाजाऱ्यांनी त्यांचे घर चालवण्यापासून ते औषधोपचारापर्यंतचा खर्च भागवला. सर्वसामान्य वर्गातील घरमालक खूपच अस्वस्थ असल्याचे तोणगिरे सांगतात.

शहरातील विष्णुनगर, शिवशंकरनगर, औरंगपुरा, नूतन कॉलनी, सिडको, देवगिरीचा परिसर, उस्मानपुरा या भागात विद्यार्थी वर्ग मोठय़ा संख्येने राहतो. काही पालकांसोबत राहतात. हा वर्ग सध्या गावी परतलेला आहे. खानावळी बंद आहेत. काही परप्रांतीय कामगारही त्यांच्या-त्यांच्या प्रांतात परत गेले आहेत. ही मंडळी राहणारी घरे, दुकाने सध्या रिकामीच आहेत. साडेतीन ते चार लाख घरांपैकी २५ ते ३० टक्के ठिकाणी भाडेकरू नाहीत. जो वर्ग कामावर आहे त्यांच्याही वेतनात कपात झालेली आहे. असा वर्ग ऐसपैस घर सोडून कमी किमतीत मिळणाऱ्या घरांमध्ये राहायला गेला. काही गावी गेले. काही घरमालक खोल्या रिकाम्या राहण्यापेक्षा भाडे कमी करून घर देताना दिसतात.

– राजू तोणगिरे, व्यावसायिक